प्राचीन कालीन पणि (बंजारा) जनसमुहाची जीवनशैली

प्राचीन कालीन पणि (बंजारा) जनसमुहाची जीवनशैली

1) पणी जनसमुहाची ओळख : इसवीसनापूर्वीचा साडेचार हजार वर्षाचा काळ अर्थात आजपासून आठ हजार वर्षाच्या भूतकाळाच्या अलिकडच्या काळात वर्तमान पाकिस्तान देशातील सिंधु नदीच्या काठावर पणि नांवाच्या जनसमुहाने मोहेंजोदारो आणि हरप्पा नांवाची दोन शहरे वसविली होती. या दोन्ही शहरात व आजूबाजूच्या ग्रामीण क्षेत्रात वसलेला संपूर्ण जनसमुह हा पणि जनसमुह नावाने ओळखला जात होता. हा जनसमुह वस्तुत: नाग आणि द्रविड वंशीय आणि श्रमण संस्कृतिचा जनसमुह मानला जात होता. हा जनसमुह पशुपालन, शेती, शिल्पकारी व विशेषत: नाग आणि द्रविड वंशीय आणि श्रमण संस्कृतिचा जनसमुह मानला जात होता. हा जनसमुह पशुपालन, शेती, शिल्पकारी व विशेषत: आंतरराष्ट्रीय व्यापारी जनसमुह होता. या श्रमप्रधान व्यवसायामुळेच हा जनसमुह श्रमण संस्कृतीचा जनसमुह मानला जात होता. या श्रमप्रधान लोकांच्या श्रमामुळेच वरील दोन्ही शहरे ही वैभवाच्या शिखरावर होती. एवढेच नव्हे तर या दोन्ही शहरापेक्षाही अति उत्तम आणि परिपूर्ण होती. संरक्षण व परिवहन व्यवस्था देखील आधुनिक शहरांना लाजवेल अशी होती. शहरी व व्यापरी लोक श्रीमंतीचे व वैभवशाली, शांतीचे, समृध्दीचे, सुखाचे, जात, वर्ण, धर्म, देव-देवी निरपेक्ष व कर्मकांडमुक्त जीवन जगत होते. हा पणि जनसमुह इसवीसन पूर्व 1500 मध्ये भारतात आलेल्या (बाहेरच्या देशातुन) युरेशियन ब्राह्मण अर्थात आर्य लोकांचा नंबर एकचा प्रखर शत्रु होता. आर्य पणि लोकांना अनार्य म्हणजे आर्य नसलेले मानत होते. कारण या दोन्ही जनसमुहाच्या संस्कृती, सभ्यता, जीवनशैलीमध्ये जमीन असमानाचा फरक होता. पणि (अनार्य) जात-धर्म, देव-देवी कर्मकांडमुक्त होते. तर आर्य हे जाती-धर्म, देव-देवी व कर्मकांडवादी होते. थोडक्यात पणि जनसमुह हा कष्ट करणारा, पुरुषार्थी आणि निसर्ग वंदक होता. या उलट आर्य लोक हे आळशी, परोपजीवी देव-देवी, दैव, धर्म, वर्ण जातीवादी, कर्मकांडी, दान-धर्म भिक्षा मागणारे, लुटारु, लढावू, शोषक, विषमतावादी, अन्यायी, अत्याचारी होते. अनार्य (पणि) लोक मात्र शांतता प्रेमी, समतावादी, न्यायी व लोकतंत्रवादी, स्वावलंबी, सधन, भीक न मागणारे, जात, धर्म, देव-देवी, दैव न मानणारे व कोणतेही कर्मकांड, पूजा, प्रार्थना न करणारे होते. अर्थात आर्य लोक पूजक व भिक्षूक होते व अनार्य हे वंदक व भीक न मागणारे स्वावलंबी, स्वाभिमानी मेहनती लोक होते. आर्य लोक राजा महाराजांना, शेतकरी, श्रीमंत, सामान्य लोकांना लुटून, संव्हार करुन, जीवन जगत होते तर अनार्य पणि लोक पशुपालन, शेती, व्यापार व बलुतेदारांची, आलुतेदारांची कामे करुन जीवन जगत होते. प्राचीन पणि लोकांच्या संस्कृतीमध्ये धर्म, देव-देवी, दैव, मूर्ति पूजा, क्षेत्र दर्शन, ग्रंथ वाचन, प्रार्थना, आरती, अभिषेक, शुभ-अशुभ, मुहूर्त, ग्रहपीडा, मंत्र-तंत्र, यज्ञयाग, सर्वज्ञ, सर्वव्याप्त, सर्वशक्तिमान, संकटमोचक, दयाळू, अवतार, पूर्वजन्म, पुन:र्जन्म, पाप-पूण्य, स्वर्ग-नरक, सत्यनारायण, वास्तुशांती, दहावा, तेरवी, श्राध्द, शिवरात्र, कृष्ण आष्टमी, एकादशी, भिक्षुंकी, मंगल आष्टका, दही हंडी, गणपती मेळावा, लक्ष्मी पूजन, होळी, दिवाळी, रक्षा बंधन, गुडी पाडवा, नागपंचमी, दसरा, वर्ण-व्यवस्था या संकल्पना अस्तित्वात नव्हत्या. वरील सर्व संकल्पना आणि कर्मकांड हे आर्याच्या (वैदिक) काळातील आहेत. वरील सर्व कर्मकांडाशी पणि जनसमुहाचा तीळमात्र संबंध नव्हता. वरील सर्व कर्मकांडाची निर्मिती आर्य (वैदिकांनी) पणि लोकांचे शोषण करण्यासाठी निर्माण केले होते व आजही अस्तित्वात आहेत. 2) तथागत बुध्द व धम्म : आर्यांच्या (वैदिकांच्या) संपूर्ण जीवनशैलीचा अर्थात सर्व प्रकारच्या देवी-देवतांचा, दैवताचा, विधी आणि कर्मकांडाचा सण-उत्सवांचा तथागत बुध्दांनी निषेध विरोध व त्याग करुन प्राचीन पणि जनसमुहाची जीवनशैली, संस्कृती सभ्यता व विचार तपस्या व चिंतना अंती परिस्कृत परिवर्तीत स्वरुपात प्रचार आणि प्रसार करुन खर्‍या मानवतावादाची पुनर स्थापन केल्याचे दिसून येते. प्राचीन पणि सभ्यता, संस्कृति, इतिहास आणि साहित्याचा आर्यांनी पूर्णत: विध्वंस केल्यामुळे तथागत बुध्दाच्या धम्म स्थापनेपर्यंत पणि जनसमुह हा स्व सभ्यता व संस्कृति विसरुन आर्यमय, वैदिकमय म्हणजे आजचा ब्राह्मणमय हिंदूमय झालेला होता व आजही तो ब्राह्मणमय, हिंदूमयच आहे. वस्तुत: त्यानी तथागतांनी पुनरस्थापित केलेल्या धम्म सभ्यता, संस्कृति व जीवनशैलीत प्रवेश केल्यासारखे किंवा आपली मुळ मातृ-पितृ पणि सभ्यता, संस्कृती जीवनशैली स्वीकार करुन भाड्याच्या घरात न राहता स्वत:च्या घरात प्रवेश केल्याचा आनंद आणि सर्व मानवी मूल्य स्वीकारल्याचा आनंद सोहळा साजरा करायला हवा. पण पणि जनसमुह अद्यापही त्यांचा खरा व सत्य इतिहास समजून घेऊ लागलेला नाही ही एक शोकांतिका आहे. पणि (सिंधू) सभ्यता नष्ट झाल्यानंतर तथागताच्या धम्म (मानवतावाद, नैतिक मुल्य) स्थापनेपर्यंत पणि, नाग, श्रमण लोकांचे जीवन पूर्णपणे गुलामीचे व पशुमय होते. अंधकारमय होते. परंतू धम्माचा स्वीकार करणार्‍याच्या जीवनात प्रकाश किरणे दिसते आहे. सर्वांनी पूर्ण धम्माचा स्वीकार केल्यास सर्वांच्या जीवनात प्रखर सूर्य तेज निर्माण होईल यात शंका नाही. 3) प्राचीन पणी व वेदांचा संबंध: पणि जनसमुह आर्यपूर्व काळात आर्य, वैदिक, ब्राह्मण, हिंदू नव्हता, तो आर्य आगमनपूर्व नाग, द्रविड, श्रमण सभ्यताचा होता. आर्य, वैदिकांनी, ब्राह्मणांनी पणि लोकांना अव्रत, अपव्रत, अन्यव्रत, अनिंद्र, अयाज्ञिक, अदेववू, अदेवस्य, अब्राह्मण: अंधश्रध्दान, अकर्मण: असुर, असुन्वत: दैत्य-दानव राक्षस, दस्यु, दास, वगैरे नावाने त्यांच्या वेद ग्रंथात संबोधले आहे. तसेच पणिला अरी, सार्थवाह, वैदेही, विदेह, वहिका, तक्षक, टाक, डोम वगैरे नावांनी सुध्दा संबोधले आहे. अव्रत म्हणजे कोणतेही व्रत न करणारे, अपव्रत म्हणजे चुकीचे व्रत करणारे, अन्यव्रत म्हणजे ब्राह्मणी व्रत सोडून दुसरे व्रत करणारे, अनिंद्र म्हणजे इंदाला व इंद्र समुहाला न मानणारे अयाज्ञिक म्हणजे यज्ञ करणारे अथवा पशुबळी न देणारे, अदेववु आणि अदेवस्य म्हणजे देव देवी न मानणारे अब्राह्मण: म्हणजे ब्राह्मणांना न मानणारे, अंधश्रध्दान म्हणजे देवावर श्रध्दा न ठेवणारे, अकर्मण: म्हणजे कोणतेही कर्मकांड न करणारे, असुर म्हणजे सुरापान (दारु) न पिणारे, असुन्वत: म्हणजे दारु न गाळणारे दैत्य, दानव, राक्षस म्हणजे अगडबंब व विचित्र देहयष्टी असणारे व मानव मांसभक्षी, दस्यु, दास म्हणजे गुलाम, अहिअरि म्हणजे शत्रुजन, सार्थवाह, वहिका, विदेह म्हणजे पशुच्या पाठीवर व्यापार करणारे, टाक, डोम म्हणजे शुद्र असा अर्थ वेदात ब्राह्मणांकडून देण्यात आला आहे. वरील संबोधनानुसार व अर्थानुसार पणि जनसमुह हा आर्य, वैदिक, ब्राह्मण वर्गापासून पूर्ण वेगळा अईश्‍वर व अकर्मकांडवादी व आर्याचा खरोखरच शत्रु होता हे सहज प्रमाणित होते. तेव्हा प्राचीन अईश्‍वरवादी व अकर्मकांडवादी पणि जनसमुहानी (एस.सी., एस.टी., ओबीसी, भटके विमुक्तांनी, आर्यांचे, ब्राह्मणांचे, वैदिकाचे देव देवी, सण, उत्सव, कर्मकांड मानणे हे अज्ञान व अंधश्रध्दा, आर्याची गुलामी स्वीकारल्यासारखे आहे. पणि जनसमुह कष्ट करुन जगतो व आर्य, वैदिक, ब्राह्मण हा जनसमुह मात्र खोट्या देव-देवीच्या माध्यमाने, तीर्थक्षेत्राच्या माध्यमाने देव देवीच्या मंदिरात रोख रक्कम, सोने, चांदी, हिरे, मोती, माणिक, पशु, जमीन, खाद्य पदार्थ जमा करुन त्याचा उपयोग करुन विनाकष्ट ऐश आरामाचे व विलासी जीवन जगतो. देवाच्या व कर्मकांडाच्या माध्यमाने अब्राह्मणांचे शोषण, लुट करण्यात त्यांना वाईट तर वाटतच नाही उलट आनंदाच्या उकळ्या येतात. अब्राह्मण (बहुजन) मात्र अज्ञान व अंधश्रध्देमुळे दान-धर्म, पूजा-भक्ति करुनही दु:ख कष्टाचे पशुमय जीवन जगत राहतो. अब्राह्मण (बहुजन) समाज अज्ञानी, निरक्षर, अंधश्रध्द राहून खोट्या व काल्पनिक देव-देवीला व कर्मकांडाला मानीत राहावा व त्यांची देवाची तिजोरी रिकामी राहू नये म्हणून ब्राह्मणांनी खोटे व अमानवी देव-देवीच्या व कर्मकांडाच्या उदारीकरणासाठी प्रचार-प्रसार करण्यासाठी चार वेद, पुराण, उपनिषद, मनुस्मृती व अनेक धर्म ग्रंथ व भोंदु साधू संतांचा ताफा तयार करुन मोक्ष, मुक्ति, अध्यात्म वगैरेच्या नावाने बहुजनांना भ्रमित करुन त्यांची लुट व शोषण करीत आहे. प्राचीन काळचा विज्ञाननिष्ठ बहुजन समाज ब्राह्मणांचे कर्मकांड, साहित्य, आयतखाऊ संताच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे आज निव्वळ नंदी बैल बनून ब्राह्मणांची, ब्राह्मण साहित्य, संस्कृति, आणि भोंदू परोपजीवी साधू-संत व ब्राह्मणांची गुलामी करीत आहे. नामदेव, तुकाराम, रोहिदास, कबीर, शाहु महाराज, म. फुले, आंबेडकर या सर्व महान संतांन व महापुरुषांनी बहुजनांना ब्राह्मणी संस्कृतीचा त्याग करण्याचे मोलाचे मार्गदर्शन व धडे दिले. पण बहुजन हितचिंतकाच्या प्रबोधनाकडे दुर्लक्ष करुन शत्रुचे अनुकरण करीत आहे ही एक महान शोकांतिका व बौध्दिक गुलामी आहे. 4) वर्तमान कालीन गोर वंजारा-बंजारा जनसमुह व प्राचीन कालीन पणी जनसमुहाचा संबंध : डॉ. नवल वियोगी, डॉ. पु. श्री. सदार, मा.प.रा. देशमुख, प्रा. निरज सोळुंखे, मा. स्वपन कुमार बिश्‍वास वगैरे इतिहासकारांचे म्हणने आहे की, प्राचीन काळाचे पणी नावाने ओळखले जाणारे लोक हेच वर्तमान काळाचे वंजारे व बंजारे आहेत. प्राचीन काळाच्या पणी लोकांचे जे व्यवसाय होते हेच व्यवसाय पशुपालन व पशुच्या पाठीवर सामान लादून देश परदेशात व्यापार 75 ते 100 वर्षांपूर्वी पर्यंत वर्तमान कालीन वंजारे व बंजारे करीत होते. वंजारा व बंजारा हा एकच समाज आहे. पण मराठी बोलीत वंजारा व हिंदी बोलीत बंजारा असा उच्चार केला जातो. पाली भाषेतील प अक्षराचा उच्चार संस्कृतमध्ये व आणि हिंदीमध्ये ब असा होतो. म्हणून नंतरच्या काळात पणी या शब्दाचे रुपांतर वणी व बनी मध्ये झाले. वणी व बनी या शब्दांचा विस्तार होत होत काळाच्या प्रवाहात वणीचे रुपांतर वणीज, वाणाी, वाणिज्य, वाणिज्यकार व शेवटी वंजारामध्ये झाले व बनीचे रुपांतर बनीज, बणी, बाणिज्य, बाणिज्यकार व शेवटी बंजारामध्ये झालेले आहे असे वरील इतिहासकारांचे म्हणने आहे. वणीज आणि बनिज या दोन्ही शब्दाचा अर्थ व्यापार होतो. पणी हे प्राचीन काळचे पशुपालक व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे श्रीमंत व्यापारी होते. तर वर्तमान कालीन वंजारा बंजारा हे देखील देशभर बैलाच्या पाठीवर व्यापार करणारे भटके गरीब व मध्यम व्यापारी होते. परंतु इंग्रजांच्या शासन काळापासून ते भटके व गुन्हेगार ठरविण्यात आले होते. आज मात्र भटका, विमुक्त आदिवासी जनसमुह मानला जातो. अशा प्रकारे पशुपालन, व्यापार, राहणीमान वगैरेंच्या आधारावर पणी, वंजारा व बंजारा जनसमुह एकच असल्याचा वरील इतिहासकारांचे म्हणने तर्कशुध्द व सुसंगत वाटते. भारतातील प्राचीन कालीन पणी व वर्तमान काळातील वंजारा व बंजारा जनसमुह व्यवसायाच्या आधारावर अनेक उपनावाने (जोड-नावाने) ओळखला जात आहे. विदेशात जाऊन स्थायीक झालेला जनसमुह मात्र रोमा-जिप्सी नावाने ओळखला जातो. 5) पणी नावाचा इतिहास: पणी लोक व्यापारी तर होतेच, परंतु ते मोठे पशुपालक व शेतकरी सुध्दा होते. हजारोंच्या संख्येत असलेल्या गुराढोरांना व शेतीला जीवंत पाण्याशिवाय ते जगूच शकत नव्हते. म्हणून पशुपालक व शेतीनिष्ठ पणी लोक जीवंत पाण्याच्या म्हणजे बारामाही वाहत्या नदीच्या काठी व कधीही न आटणार्‍या तळ्याच्या काठी हे लोक उंच टेकड्यावर वस्ती करुन राहत होते. जनावरांना मोकळे पाणी पिता यावे व शेतीला पुरेसे पाणी मिळून अन्न व पशु चार्‍याची व्यवस्था व्हावी हा या वस्ती मागचा हेतु होता. पण जीवंत पाण्याच्या काठावर वस्ती केल्यामुळे किंवा नगर वस्तीच्या चोहोबाजूंनी खंदकात पाणी खेळविल्यामुळे वाहत्या पाण्याच्या संरक्षणात राहत असल्यामुळे (पाण्याच्या संबंधा) मुळे ते पणी म्हणले गेले असावे. दुसरे कारण व्यापाराचा अर्थ सुध्दा पणी होतो. ते व्यापरी तर होतेच. म्हणून व्यापारीच्या अर्थी ते पणी म्हणले गेले असावे. तिसरे कारण म्हणजे पैसा, रोकड, नाणे असाही होतो. पणी लोक सधन व्यापारी होते. त्यांच्याजवळ अमाप नाणे (पण) होते. अर्थाने संबोधले जात असावे. चौथे कारण म्हणजे पणी लोक सत्यवादी, प्रतिज्ञा पूर्ण करणारे होते. पणचा अर्थ प्रतिज्ञा असाही होतो. पणाचे (प्रतिज्ञेचे पालन करणारे) म्हणून देखील त्यांना पणी या नावाने संबोधले जात असावे. पाचवे कारण असे की पणी व पणीया या शब्दांचा अर्थ सावकारीन व सावकार असा देखील आहे. आर्यांनी वेदामध्ये पणींना बेकनाटा म्हणजे सावकार, व्याजाचा धंदा करणारे असेही संबोधले आहे. यावरुन पणीचा अर्थ सावकारही होतो हे प्रमाणित होते. सहावे कारण पण पासून पणन शब्दाची निर्मिती झालेली आहे. पणन म्हणजे व्यापारी संघ असा होतो. तसेच सातवे कारण म्हणजे पण्य अर्थात व्यापारी वस्तु, विक्रीयोग्य वस्तु असाही अर्थ होतो. व्यापारी वस्तुंचा व्यापार करणारे ते पण्य, असाही अर्थ ध्वनीत होतो. एकूणच पणी लोकांचा घनिष्ट संबंध, पाणी, पैसा, व्यापार, सावकारी, श्रीमंती, प्रतिज्ञा म्हणजे सत्यवादी, व्यापारी संघ, व्यापारी वस्तु इत्यादीने सर्वाधिक येतो. याच कारणामुळे ते पणी या नावाने आर्यांकडून संबोधले गेले असावेत यात शंका नाही. वरील नावांशिवाय गोर बंजारा समाजात स्त्रीचे नाव पणी व पुरुषाचे नाव पणीया बहुसंख्य आहेत, हे पणी आणिा पणीया दोन्हीही नावे प्रतिकात्मक स्वरुपात सावकारीन व सावकारासाठीच वापरले गेले असावेत असे माझे मत आहे. पण पणीयाचा आनरवीही एक अर्थ पाण्यात पोहणारे, पाण्यात जहाज चालविणारे, पाण्यावर नियंत्रण ठेवणारे किंवा पाणीवाहक असाही निघतो. विदेशामध्ये पणी या नावाचा विस्तार प्युनिक, फोनिक, फिनिक्स, फोनिशियन, फोनिशिया असाही झाल्याचे काही इतिहासकार सांगतात, काहीही असो, पणि लोक प्राचीन काळी वैभवाच्या आणि प्रतिष्ठेच्या शिखरावर असावेत असे खात्रीने सांगता येण्यासारखा पणींचा इतिहास आहे. यास्तव पणी लोकांचा खरा इतिहास शोधून काढण्याची काळाची गरज आहे. संशोधक व जिज्ञासु तरुण हे कार्य करतील अशी अपेक्षा आहे. 6) प्राचीन कालीन पणी व वर्तमान कालीन गोर वंजारा-बंजारा हा तथागत बुध्द धम्मीय का व कसा: प्राचीन कालीन पणी लोक निसर्गवादी व देव, देवी, आणि कर्मकांडमुक्त होते. याच बरोबर ते वर्ण, जात, धर्मनिरपेक्ष परंतु लोकशाहीवादी होते ते आर्य, वैदिक, ब्राह्मण व वर्तमानकालीन देव-देवी, सण-उत्सव आणि हिंदू धर्म मानणारे नव्हते. ते निसर्गपूजक नव्हे तर वंदक होते. पूजेला साधन सामुग्रीची गरज असते. वंदन फक्त हात जोडून व नतमस्तक होऊन कृतज्ञता व आदर-सन्मान व्यक्त करण्याची कृती असते. पूजेला ब्राह्मणाची व ब्राह्मणाला दान-दक्षिणाची गरज असते. वंदनाला ब्राह्मण, दान-दक्षिणा, नारळ, फुल, उद अगरबत्ती, गुलाल, तांदुळ वगैरेची गरज नसते. यास्तव पूजा व वंदन यामधील फरक व व्यावसायिक हेतु समजून घेण्याची खरी आवश्यकता आहे. पणी लोक निसर्गाची म्हणजे वृक्षवल्ली, नदी-समुद्र, सूर्य, चंद्र, तारका, अग्नि, वायु, मातृभूमि वगैरेला वंदन करीत होते. ते उपयुक्त पाळीव पशुला सुध्दा वंदन करीत होते. ते मूर्ति वंदक व मंदिर समर्थक नव्हते. पणी समुहाची समाज व्यवस्था श्रम, लोकशाही तत्वावर आणि नैतिक व न्याय तत्वावर आधारीत होती. पणी जनसमुहाप्रमाणेच तथागत बुध्द नाईश्‍वरवादी होते. तथागत, आत्मा, परमात्मा, अवतार, नशीब, पूर्वजन्म, पुन:र्जन्म, स्वर्ग-नरक, पूजा, प्रार्थना, अभिषेक, आरती, मूर्ति स्थापना, मूर्तिपूजा, तंत्र-मंत्र, यज्ञयाग, पूजापाठ, ग्रंथ पारायण, नामस्मरण, क्षेत्र दर्शन, ब्राह्मणांची मध्यस्थी अथवा दलाली, विविध कर्मकांड हे सर्वच सर्व थोतांड व शोषणाचे, भोंदूगीरीचे प्रकार मानत होते. बुध्दाचा धम्म नावाचा धर्म पूर्णत: नीतीतत्वाचा धर्म असून या नीती तत्वाद्वारे कोणाचेही शोषण होत नाही. धम्माचे पालन करणार्‍या प्रत्येक अनुयायाला त्रिशरण, चार आर्य सत्य, पंचशील, आष्टांग मार्ग व दहा पारमिताचे पालन करुन निष्कलंक, चारित्र्यवान अनुयायी बनता येते. या नीती तत्वात जात, वर्ण, धर्माच्या व श्रेष्ठ आणि कनिष्ठपणाचा संबंध येत नाही. शिवाशिवी, रोटी बेटी बंद, व्यवसाय, शिक्षण, संपत्ती, सत्ता, शस्त्र बंदी वगैरे कोणताही प्रकार धम्माच्या नीतीतत्वात नाही, स्त्री-पुरुष सर्व समान समजले जातात. धम्मात सर्वज्ञ, सर्वव्याप्त, सर्वशक्तिमान, संकट मोचक, दयाळू, अवतार वगैरे खोट्या संकल्पना नाहीत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र, अतिशुद्र असाही प्रकार नाही. बुध्द स्वत:ला एक सामान्य माणुस व मार्गदर्शक मानतो. धम्मात अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, व्याभिचार, मद्यप्राशन, शोषण, गुलामीला स्थान नाही. प्राचीन पणी लोकांची जीवनशैली, विचार, तत्वज्ञान, नीती, देवधर्म, कर्मकांड, समजूती, जात, वर्ण, धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरुष समानता हे सर्व काही तंतोतंत बुध्दासमान आहेत. एवढेच नव्हे तर तथागत बुध्दांनी तपस्या, चिंतन अनुभव या सर्व प्रक्रियातून बुध्द धम्माचा अति सुधारीत, विस्तारीत नैतिकतापूर्ण, संपूर्ण मानव समुहासाठी कल्याणदायी धम्माचं स्वरुप सर्व जगासाठी पुनरस्थापित केला आहे. संपूर्ण जगाने सुध्दा हा धम्म स्वीकारलेला आहे. धम्मामुळे समता, बंधूता, स्वातंत्र्य आणि न्यायी समाज व्यवस्था निर्माण झालेली आहे. विषमता, शोषण, अन्याय, गुलामी कमी होऊन वेळ, पैसा, व मानवशक्तिची बचत झालेली आहे. बुध्द धम्मात भोंदूगीरी, फसवेगीरी, लुटमार जवळ जवळ नाहीच. याचप्रमाणे पणी जनसमुहाची प्राचीन सभ्यता, संस्कृती, साहित्य आणि जीवनशैली ही आजच्या बुध्द धम्म तत्वावरच आधारीत होती. अर्थात प्राचीन पणी, नाग, द्रविड, गोर बंजारा हा समुह बुध्दा पूर्वीपासून बुध्द तत्वज्ञानी होता. मधल्या काळात हा जनसमुह आर्य ब्राह्मणामागे भरकटला होता व आजही हिंदू धर्माच्या नावाने तो ब्राह्मण समर्थकच आहे. आजचा ब्राह्मण म्हणजे हिंदू धर्म ही ब्राह्मणांची शेती व त्या शेतीत राबणारे बहुजन हे त्यांचे बैल आहेत. बैलांना चाराही मिळत नाही. पण ब्राह्मण मात्र देवाच्या नावाने तिजोरीतील जमा पैसा, सोने, चांदी, खाद्यपेय पदार्थाचा उपयोग करुन तुपाशिवाय खात नाही. तेव्हा बहुजनांनी या लुटारु धर्मातून बाहेेर पडून बुध्दांनी पुनर स्थापित केलेल्या धम्म नामक आपल्या प्राचीन पणी लोकांच्या धर्मात प्रवेश केल्याचा आनंद घ्यावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे. पणी जनसमुहाची प्राचीन सिंधू नदीकाठची संस्कृती नष्ट झाल्यानंतर तो जंगलात राहायला गेल्यानंतर आपली संस्कृती विसरुन मधल्या काळात तो ब्राह्मणमय, हिंदूमय झाला होता. पण तथागत बुध्दाच्या काळात तो बुध्दाचा अनुयायी होता हे पणी (बंजारा) समुहाच्या स्त्री पुरुषाच्या नावावरुन प्रमाणित होते. गोर बंजारा समाजात बुध्दा नायक, बुध्दीबाई, भीका, नायक, भिकीबाई, गोपा नायक, गोपीबाई, धुम्मा नायक, धम्मीबाई, धामा नायक, दामा नायक, पिंपळाबाई, संगा नायक, छगन नायक, छन्नु नायक, धनसंग नायक, राहेमल नायक, वगैरे नाव आजही सर्वत्र ऐकावयास मिळतात. ही सर्व नावे तथागत बुध्द काळाचीच असावी व त्यांचा बुध्दाशी व बुध्द धम्माशी संबंध असावा असे मला निश्‍चितपणे वाटते. तथागत बुध्दाशी व बुध्द संबंध अथवा अनुयायित्व असल्याशिवाय गोर बंजारा समाजात अशी नावे असण्याचे दुसरे विशेष कारण दिसून येत नाही. तथागत बुध्दांच्या नावामुळेच बुध्दा नायक व बोधीवृक्ष (पिंपळाच्या) वृक्षामुळे बुध्दिबाई व पिंपळाबाई हे नाव गोर समाजात आजही आहेत. बुध्दाच्या धम्मामुळेच, धुम्मा नायक, धामा नायक, क्षमा नायक, व धम्मीबाई हे नाव प्रचलनात आले असावेत. बुध्द धम्म प्रचारक भिक्खुच्या नावामुळेच भीका नायक, भीकीबाई हे नाव प्रचलनात आले आहे. तसेच बुध्द संघामुळे संघानाईक, छंदक नावामुळे छन्नु नायक, छगन नायक, तसेच गोपा नायक, गोपीबाई, राहुल वरुन राहेमल, अशी नावे गोर बंजारा समाजात प्रचलनात आली असावी असे निश्‍चितपणे सांगता येते. दुसर्‍या कोणत्याही समाजात अशी नावे सापडत नाही. यावरुन प्राचीन काळापासून बुध्द धम्माशी, बुध्द जीवनशैलीशी व तथागत बुध्दाशी गोर बंजारा समाजाचा घनिष्ट संबंध होता हे सहज सिध्द अथवा प्रमाणित होते. तथागत बुध्द व त्याचे वडील शुध्दोदन हे राजा व शेतकरी होते. गोर बंजारा देखील प्राचीन काळी राजा, शेतकरी, पशुपालक, व्यापारी शिल्पक होते. या सर्व कारणामुळे बुध्दाचा, बुध्द धम्माचा आणि गोर बंजारा समाजाचा संबंध कोणालाही नाकारण्यासारखा नाही असे मला खात्रीने वाटते. म्हणूनच गोर बंजारा बांधवांनी हिंदुत्वाचा, ब्राह्मणत्वाचा त्याग करुन बुध्दत्वाकडे वळावे असे नम्रपणे सुचवावेसे वाटते. गोर समाज 1947 पर्यंत जंगलात राहत होता. हिंदू धर्म व देवी, देवताशी व कर्मकांडाशी त्याचा संबंध नव्हता. हिंदू समाज गोर समाजाला शिवू देत नव्हता. पंगतीला बसू देत नव्हता. रोटी बेटी व्यवहार करीत नव्हता. गांव-शहरात राहू देत नव्हता. मग असा धर्म आपला कसा असू शकतो. बुध्दाचा खरा अर्थ ज्ञानी असा आहे. बुध्द धम्म स्वीकारणे म्हणजे ज्ञानी, नीतीवान होणे असा आहे. महारांनी बुध्दत्व स्वीकारल्यामुळे ते ज्ञानी, विद्वान झालेले आहेत ही विचारणीय बाब आहे. विचार करा व विचारी बना एवढीच अपेक्षा. जयभारत-जयसंविधान प्रा. ग. ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments