गोर बंजारा समाज नाईक नाही नायक आहे.

गोर बंजारा समाज नाईक नाही नायक आहे.

दि. 10-5-2022 गोर बंजारा समाज नाईक नाही नायक आहे. वंदनीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांचे कुळ नाव, वंशीय नाव हे मुळात नाईक नसून नायक होते. जातीवाद्यांनी त्यांचे कुळ, वंशीय, वर्गीय नाव मुख्यमंत्री झाल्यानंतर नायक न म्हणता नाईक म्हणणे सुरू केले. नाईक हे कुळ नाव बंजारा समाजात नाही. नायक हे पद नाव तांडा प्रमुखाचे आहे. नायक हे विशेषण कुळ अथवा वंशीय सुद्धा नाही. कोणत्याही तांड्याचा प्रमुख हा नायक या पदनावाने किंवा पदवीने संबोधला जातो. नायक या पदवी, सन्मानपदाचा अर्थ तांडाप्रमुख, नेता, पुढारी, मार्गदर्शक, न्यायदाता, सर्वांचा पिता, पालक संरक्षक असा आहे. अनेक तांड्याच्या प्रमुखाला महानायक म्हणतात. नाईक हे कुळ किंवा वंश नाव, पदनाव ब्राह्मण वर्गात आहे. वंदनीय वसंतरावजी नायकांनी ब्राह्मण वर्गाच्या मुलीशी प्रेमलग्न केले होते. म्हणून ब्राह्मण वर्गाने नायक साहेबाचे पदनाव नायक न घोषित करता नाईक घोषित करून गोर बंजारा समाजाचे व आदरणीय वसंतरावजी नायक साहेबाचे ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. दुसरे म्हणजे न्यायालयात सुद्धा एका निम्न कर्मचारी वर्गाला नाईक या नावाने संबोधले जाते. तेव्हा आदरणीय नायक साहेबांना नाईक नावाने संबोधून त्यांचा अवमान करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला असावा. हेतु असा की, वंदनीय नायक साहेबांना नाईक या नावाने संबोधल्या गेल्यामुळे गोर बंजारा समाजातील काही नेते स्वत:ला नाईक संबोधून घेतात व आपल्या नावापुढे नाईक लिहितात. वस्तुत: गोर बंजारा माणूस हा नाईक नसून नायक आहे. वंदनीय वसंतरावजी यांना नाईक संबोधले गेले, म्हणून ते ब्राह्मण किंवा निम्न पद कर्मचारी नव्हते. ते महाराष्ट्राचे शिल्पकार होते. हरितक्रांतीचे प्रणेते, लोकनेते होते. पण ते खरे नाईक नव्हते तर ते नायकच होते. म्हणून यापुढे कोणत्याही गोर बंजारा पुरुषाने व स्त्रीने सुद्धा आपल्या नावापुढे क्रमश: नायक व नायकण हेच पदनाव लावावे, लिहावे अशी माझी सर्वांना विनंती आहे. आजही तांडा प्रमुखाला आपण नायक, नायकणच म्हणतो. म्हणून आपण आपल्या पारंपरिक धाटी पद्धतीचा त्याग करू नये. नायक हे पदनाम भिल्ल समाजात व महार समाजात सुद्धा आहे. भिल्ल समाजाचे नेतृत्व 1700-1800 शतकात गोविंद गीर (गोर) यांनी केले होते. गोविंद गीर हा गोर बंजारा होता. म्हणून भिल्लांनी नायक या पदाचा वापर केला असावा. महार समाजात सुद्धा नाक पदनाम आहे. नाक हा शब्द (पदनाम) नायक या पदनामाचाच संक्षिप्त रूप आहे. भिल्ल, महार व गोर बंजारा हे तिन्ही समाज मुस्लीम, पेशवे व ब्रिटिशांविरोधात संघटितपणे लढले असावेत. म्हणून या तिन्ही समाजाचे पदनाम नायक म्हणून आजही दिसून येतात. म्हणून या तिन्ही समाजांनी आजही संघटित राहून इतर वंचित समुहाला जोडण्याचे प्रयत्न करावेत व आपल्या हक्क अधिकारासाठी संघर्ष करून सत्ताधारी वर्ग बनण्याचे प्रयत्न करावे असे नम्रपणे सांगावेसे वाटते. इति. प्राचार्य ग. ह. राठोड जय भारत - जय संविधान - जय बहुजन टिप - मोगल, पेशवे, ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करून क्रांती घडविणारे व स्वातंत्र्य मिळविणारे सर्व बहुजन/आदिवसी/मुळनिवासीच होते म्हणून वर्तमान काळात आपण सर्वांनी संघटित होणे ही काळाची गरज आहे याची जाणीव असु द्यावी.

G H Rathod

162 Blog posts

Comments