विमुक्त गुन्हेगार भटक्यांनी 31 ऑगस्ट हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करावा.
दि. 29/8/2023
विमुक्त गुन्हेगार भटक्यांनी 31 ऑगस्ट हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करावा.
विमुक्त गुन्हेगार, भटक्या भावा-बहिणींनो,
सर्वांना जय भीम-जय संविधान, जय मुळनिवासी!
आपण सर्व मागास म्हणजे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास (बलुतेदार-आलुतेदार), भटके, गुन्हेगार, विमुक्त, विशेष मागास, अल्पसंख्य, धर्मांतरीत सर्वच सर्व भारताचे मुळनिवासी आपण सर्व मालक, शासक होतो. सप्तसिंधू व परिक्षेत्रात राहत असल्यामुळे आपण सिंधूजन होतो. विदेशी आर्यांनी व मुगलांनी आपल्यावर शासन केल्यामुळे नंतरच्या काळात या शासनकर्त्यांनी आपल्या सर्व मुळनिवासी सिंधूजनांना हिंदूजन म्हणून संबोधून आपली फसवणूक व आपल्या पूर्वजांचा इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न करून हिंदूधर्माच्या नावाने मनुचा ब्राह्मणी धर्म लादण्याचे डावपेच खेळत आहे. आर्य-मुगल-मुसलीमांच्या सत्ता प्राप्तीनंतर ब्रिटिश भारताचे शासक बनले आणि ब्राह्मणांच्या सहकारी, भागीदार हे भारतावर राज्य करू लागले. ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी ब्राह्मण-मुगल, मुसलीमांच्या काळात वरील सर्व मागासवर्गांचे भारतात जवळ जवळ 2650 राजे म्हणजे संस्थानिक होते व त्याचा ब्राह्मण-मुगलांवर चांगलाच दाब होता. कारण हे सर्व संस्थानिक बहादूर, लढवय्ये होते. आर्य ब्राह्मण, मुगल त्यांना भीत होते. पण ब्रिटिशांनी ब्राह्मणांच्या भागीदारांनी सर्व संस्थानिकांचे राजांचे अधिकार नष्ट केले व भारतावर ब्रिटिश राज्य स्थापन केले. परंतु ब्राह्मणांना भागीदार बनविले. सर्व ब्राह्मण व मुळनिवासींची शत्रूता कायम होतीच. यामुळे ब्राह्मणांनी ब्रिटिशांना पटवून 1871 मध्ये मागासवर्गांपैकी भटक्या वर्गांवर एकूण 14+28=42 जमातींवर गुन्हेगारीचा कायदा लावला व त्यांना एकूण 52 तारेच्या कंपनामध्ये बंद करून त्यांच्या मर्जीप्रमाणे त्यांना पशुसमान राबवून व वापरून घेण्यात आले. या 52 तार बंद कुंपनातील त्यांचे 1871 ते 1952 पर्यंतचे एकूण 81 वर्षांचे व जवळ जवळ तीन पिढींचे त्यांचे जीवन नरकमय होते.
1871 चा गुन्हेगारी कायदा लावण्यापूर्वी पेशवाई म्हणजे ब्राह्मणांनी व ब्रिटिशांनी संगनमताने भटक्यांची राजेशाही, त्यांची शेती, बंगले, घरे दारे, पशुधन हक्क अधिकार, स्वातंत्र्य सर्व नष्ट केले होते. त्याचे शोषण होऊन, अन्याय, अत्याचार, गुलामी, बेकारी, उपासमार, व्याभिचार अमर्याद वाढले होते. हे सर्व अन्याय व दु:ख असहनीय झाल्यामुळे सर्व भटक्यांनी मिळून पेशवाई व ब्रिटिशांविरुद्ध 1857 चा उठाव, संघर्ष अथवा लढा दिला होता. हा स्वातंत्र्याचा व हक्क, अधिकार प्राप्तीसाठीचा हा मुळनिवासी गुन्हेगार ठरविल्या गेलेल्या सर्व भटक्यांचा हा लढा होता. म्हणून ब्राह्मण-ब्रिटिशांनी मिळून एका विचाराने भटक्यांचा हा विरोध चिरडून टाकला होता. हे संघटित बहादूर भटके लोक भविष्यात दोघांनाही शासन करू देणार नाही, वठणीला येणार नाही. भविष्यात होणार्या भटक्यांच्या संघर्षात त्यांचा पराभव ठरलेला होता. म्हणून डावपेचाचा एक भाग ठरवून दोन्ही शत्रुंनी एकत्रित पण 1871 मध्ये भटक्यांना गुन्हेगार ठरवून पुढील 81 वर्षे तारबंद कुंपनात ठेवले होते. 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा 1951 पर्यंत गुन्हेगारी कायदा नेहरुंनी हटविला नाही. शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न व दबाव निर्माण केल्यानंतर हा कायदा 31 ऑगस्ट 1952 ला हटविण्यात आला. पण संवयीचे गुन्हेगार म्हणून हा कायदा अद्यापही अस्तित्वात आहे. संवयीचे गुन्हेगार हा कायदा न हटविल्यामुळे व 31 ऑगस्ट 1952 गुन्हेगारी कायदा हटवून गुन्हेगार जमातीला गुन्हेगार कायद्यातून मुक्त केल्याचे जाहीर केले असले तरी आजही या समुहाला संवयीचे गुन्हेगार मानूून सरकार/पोलीस कुठेही गुन्हा/अपराध घडला तर खर्या सवर्ण गुन्हेगाराला गुन्हेगार न ठरविता, न पकडता अथवा शोधता या समुहाच्या निरापराध व्यक्ती अथवा कुटुंबाला अपराधी ठरवून पकडून नेले जाते. त्यांना दंड अथवा शिक्षा, जेल दिली जाते व घोर अन्याय केला जातो. असे हजारो-लाखो गरीब, निरापराध व्यक्ती, कुटुंब आज शिक्षा भोगत असून, खरे गुन्हेगार उजळ माथ्याने समाजात फिरत असून निरापराध भटका समाज उद्ध्वस्त होत आहे. या अन्यायावर आजही सरकार विचार करण्यास तयार नाही, ही एक शोकांतिका आहे. गुन्हेगार ठरविलेला समूह संख्येने संपूर्ण भारतात 15-20 कोटी असून तो स्थिर नसून भटका आहे. त्यांचे भटकंतीचे कारण जीवन जगण्याचे कोणतेही साधन नसणे, असंघटीत, अस्थिर, निरक्षरपणा, अडाणी, बेकारी, निराधारपणा, भित्रेपणा, भूमिहीन वगैरे आहेत.
स्वातंत्र्यानंतर सरकारने या सर्व भटक्या जमातींची जनगणना करून त्यांची भटकंती कमी करण्यासाठी त्यांचे स्थिरीकरण करण्याची गरज होती. भटक्या समुहांच्या स्थिर वस्त्या निर्माण करून त्यांना त्या ठिकाणी आजच्या सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या असत्या तर हा समूह गुन्हेगार न बनता, तो सवर्ण समुहांच्या बरोबरीने आला असता. आज त्यांच्यावर केला जाणारा अन्याय व खर्च देखील कमी होऊन त्यांची शक्ती आज देश समृद्धीच्या कामाला आली असती. निरक्षर, बेकार, अनाथ, निराधार, दु:खी, कष्टी, भटके या सर्वांची प्रगती करणे, त्यांना पुढारलेल्या समुहांबरोबर आणणे हे सरकारचे कर्तव्य असून याची तरतूद देशाच्या घटनेत केली आहे. सरकारने या समुहांची जनगणना करणे, त्यांना संघटीत करून त्यांच्या वस्त्या निर्माण करून, त्यांचे शिक्षण, स्वास्थ्य, नोकर्या, व्यवसाय वगैरेंची व्यवस्था करण्याची जबाबदारी स्वीकार करायला हवी. पण आजपर्यंतची सर्वच सरकारे ही जाती, धर्मवादी, देव, दैव, कर्मकांडवादी, भांडवलदारवादी, स्वार्थी, भ्रष्टाचारवादी निघाल्यामुळे व घटनेवर तंतोतंत अंमलबजावणी करीत नसल्यामुळे जबाबदारीचे भान नसल्याने व सामाजिक बांधिलकी, देशनिष्ठेचा अभाव, यामुळे आज 20 कोटी भटक्या विमुक्त समुहाला पशुसमान, अमानवीय, कष्टमय जीवन जगावे लागत आहे. म्हणून सर्व भटके विमुक्तांनी 31 ऑगस्ट हा विमुक्त दिन साजरा न करता काळा दिवस म्हणून साजरा करावा व काळ्या टोप्या घालून आजच्या शासनाचा जाहीर निषेध करावा, असे नम्र आवाहन करावे.
जय भारत- जय संविधान
प्रा. ग.ह. राठोड