1) गोर समाजाची ओळख -
गोर बंजारा संस्कृती ही जगातील आदर्श मानवतावादी, समतावादी, मातृसत्ताक, श्रमण (समन)वादी म्हणजे कष्ट करणारी, प्रकृती (निसर्ग) प्रिय, स्वच्छंदी, गीत, नृत्य, अलंकार, भडक पोशाख, शिकार, युद्ध, बहादुरी, कृषिव्यापार, शिल्पकारी, पशुप्रिय समुह जमात आहे. थोडक्यात हा समाज अष्टपैलू, जात, धर्म, देव, ब्राह्मणमुक्त, अवर्णीय, भटका, गांव-शहरांपासून दूर माळमाथ्यावर डोंगर, पर्वताच्या पायथ्याशी राहणारा, सर्व प्रकारच्या नागरी व शासकीय सोयी सवलतींपासून वंचित असुनही हा भीकमुक्त, निडर, समोर येईल ते काम करणारा, अत्यंत स्वावलंबी, स्वाभिमानी, लोकशाहीप्रिय, तांडावस्ती पंचायत व न्यायप्रिय, स्वातंत्र्यप्रिय समाज आहे. या समाजात शिखसमुहांबरोबर राहणारा व शिख समाजासाठी सर्वस्व अर्पण करणारा सोळाव्या शतकात लाखा बंजारा नावाचा एक जागतिक स्तरावरचा धनवान व्यापारी योद्धा होऊन गेला. आजचा दिल्ली शहराचा क्षेत हा त्याच्याच मालकीचा होता, जो शासनाने संसदभवन व इतर कामांसाठी ताब्यात घेतलेला आहे. यापूर्वीच्या या समाजाच्या महापुरुषांचा इतिहास उपलब्ध नाही. हा तथागत सिद्धार्थ गोैतम ‘बुद्धा’ पूर्वीचा सिंधू संस्कृतीचा निर्माता समाज आहे. याचे ठोस प्रमाण म्हणजे सिंधूघाटी उत्खननात ज्या वस्तु सापडलेल्या आहेत, त्यापैकी ऐंशी टक्के वस्तु ह्या गोर बंजारा समाजाच्या वापराच्या आहेत. सिंधूघाटी संस्कृतीचा हा काळ बुद्धापूर्वीचा 5000 ते 4000 पूर्वीचा आहे. यावरुन हा समाज अति प्राचीन व भारताचा मुळनिवासी असल्याचे समजते. विशेष म्हणजे, प्राचीन वेद ग्रंथात या समाजाचा उल्लेख पणी या नावाने झालेला असून इंद्रदेवाबरोबर गाई चोरल्या म्हणून संघर्ष व पराभव झाल्याचे सुद्धा इतिहास उपलब्ध आहे. डॉ. प. रा. देशमुख, डॉ. निरज साळुंके, डॉ. नवल वियोगी, डॉ. स्वपन कुमार विश्वास, डॉ. प्रताप चाटसे, डॉ. राहुल सांस्कृत्यान वगैरे इतिहासकारांनी या सत्याला दुजोरा दिलेला आहे. पणी व इंद्रामध्ये झालेल्या संघर्षावरुन आर्यांचा विरोधक पणी आजचा गोर बंजारा समाजच होता, हे सहज कळून येते. कारण आर्य देव-दैव, कर्मकांडी होते तर पणी (गोर बंजारा) हे प्रकृतीपूजक नव्हे तर वंदक होता. अवर्ण समाज होता. याच कारणामुळे पणी व आर्य प्रमुख इंद्रामध्ये संघर्ष झाला होता. परंतु संघर्षात पराभव झाल्यामुळे आर्यापासून बचाव करण्यासाठी हे देशाच्या चारही दिशेला जेथे आर्याचे शत्रू सहजासहजी पोहचू शकणार नाही, अशा ठिकाणी माळमाथ्यावर, डोंगराच्या कुशीत व पर्वतरांगांच्या पायथ्याशी विसावले. पुढे उदरनिर्वाहाचे साधन नसल्यामुळे ते वन्यसंपत्ती, शिकार, पशुपालन करुन सोयीच्या ठिकाणी लहान-लहान अस्थाई वस्त्या करुन राहू लागले. जे आज ‘तांडे’ नावाने संबोधले जात आहे. पणी समुह पराभवामुळे विस्थापित झाला खरा; पण त्यांनी त्यांचा सांस्कृतिक वारसा आजपर्यंत सांभाळून सुरक्षित ठेवल्यामुळे तो पूर्ण भारतातच नव्हे तर जगात एकसंघ असल्याचे दिसून येत आहे. कारण त्यांच्या राहणीमानात, बोलीभाषेत व सांस्कृतिक जीवनात लिखित साहित्य नसतांना देखील व जागतिक स्तरावर राहत असतांना सुद्धा मोठ्या प्रमाणात समानता (धर्मांतर होऊनही) दिसून येते, हे एक जागतिक आश्चर्यच मानावे लागेल. गोर बंजारा समाज हा वेद काळापासूनचा असुनही समाजाचा प्राचीन ते आजपर्यंतचा सविस्तर इतिहास का उपलब्ध नाही ही एक सर्वांसाठी चिंतनीय बाब आहे. पण सोळाव्या शतकापासून अलीकडच्या काळातील ज्या काही कर्तृत्ववान पुरुषांचा संक्षिप्त इतिहास सापडतो, त्यांनी सर्व समाजाशी सलोख्याचे, जवळचे आणि सहकार्याचे संबंध ठेवल्याचे दिसून येते.
लाखा बंजारा, संत सेवालाल महाराज, गोविंद गुरु (गोर), वसंतराव नायक, सुधाकरराव नायक या सर्वांनी सर्व समाजाबरोबर मिळून उल्लेखनीय कामे केल्याचे थोडक्यात दिसून येते. शीख, भिल्ल व इतर आदिवासी, मुगल-मुसलीम, राजपूत, मराठा यांच्याबरोबर मिळून मिसळून संघर्ष व सामाजिक कार्य केल्याचे दिसून येते. पण आर्य ब्राह्मणाबरोबर राहिल्याचा उल्लेख कुठेच सापडत नाही. 1960 पर्यंत ब्राह्मण गोर बंजारांचा तीळइतका सुद्धा संबंध नव्हता. गोर बंजारा समाज गांव-शहरापासून दूर जंगलात तांडा वस्तीत राहत होता. ब्राह्मणच नव्हे तर (भटके वगळून) मराठा-मुसलीम, शीख, इसाई, पारसी, सिंधी, गुजराती वगैरेंशी विशेष संबंध व ओळख सुद्धा नव्हती. महाराष्ट्रात फक्त मराठा, बनिया, गुजराती वगैरेंशी ब्राह्मणांचा संबंध होता. हाच वर्ग ब्राह्मणी कर्मकांडाचा गुलाम होता. अस्पृश्य, इतर मागास, भटक्याचा (बंजार्याचा) ब्राह्मणी कर्मकांडांशी संबंध नव्हता. तुरळक गोर बंजारांचा शिखांशी आणि भटक्यांशी नेहमीचाच संबंध होता. सर्व भटके, अस्पृश्य हे गोर बंजारांचे भाऊबंदच होते, असे मानण्यास हरकत नाही. कारण अस्पृश्य, भटके, आदिवासी, हे परस्परांना सहकार्य करीत होते. ब्राह्मण, बनिया, गुजराती, मराठा, ठाकुर, राजपूत वरील वर्गांना अस्पृश्य मानत होता. वरील प्रस्थापित वर्ग हा ब्राह्मणी कर्मकांडाचा गुलाम आणि पोषक होता. ब्राह्मणी कर्मकांडाचा शोषक रोग हळूहळू अस्पृश्य, आदिवासी, भटके, इतर मागास वर्गात झिरपला. या रोगापासून मुक्त होण्याचा उपदेश बहुजन समाजसुधारकांनी आणि संतांनी खूप मोठ्या प्रमाणात केला. अलीकडच्या काळात छ. शिवाजी, रा. शाहू महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम, उपरेकाका या सर्वांनी ब्राह्मणी कर्मकांडांपासून व ब्राह्मणांपासून मुक्त करण्याचे मोलाचे कार्य व उपदेश केले. पण बहुजनांच्या डोक्यात घुसलेला ब्राह्मणी कर्मकांडाचा रोग अद्यापही बाहेर निघू लागलेला नाही. उलट वाढत असून ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ या म्हणीप्रमाणे बहुजन समाज बहुजन उपदेशांचे पालन न करता शोषक, परोपजीवी ब्राह्मणी संघटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू परिषद, बजरंग दल वगैरे संघटनेत घुसून ब्राह्मणांचे समर्थन करीत असून आपल्याच स्वहाताने आपल्या पायावर कुर्हाड मारुन घेत आहे, ही एक शोकांतिका आहे.
2) गोर व शिखांच्या मैत्रीचे कारण :-
गोर बंजारा आणि शिखांच्या मैत्रीला एक ऐतिहासिक कारण आहे. सिंधू संस्कृती काळापासून गोर बंजारा आणि ब्राह्मणी संस्कृती या परस्परविरोधी होत्या. गोर बंजारा हा भौतिकवादी होता तर ब्राह्मण समाज हा अध्यात्मिकवादी, कर्मकांडी, लौकिकवादी होता. यामुळे ते परस्परांचे शत्रू होते. चौदाव्या शतकातील शीख समाज हा सुद्धा भौतिकवादी व ब्राह्मण विरोधी होता. शत्रुचा शत्रू हा आपला मित्र या न्यायाने गोर बंजारा समाजाने शीख समाजाला सर्वोपरी सहकार्य केले. दोनही समाज बहादूर व लढवय्ये होते व विचाराने एक होते. म्हणून त्यांची घट्ट मैत्री झाली. पुढच्या काळात छ. शिवाजी महाराज, शाहू महाराज, म. फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वगैरे तर ब्राह्मणी विचारधारा विरोधी होते. यामुळे बंजारा समाजाने या सर्वांना तन-मन-धनाने सहकार्य केले. राजपूत हे ब्राह्मण धार्जिण्य होते पण बहादूर होते. गोर बंजारा सुद्धा बहादूर व लढवय्या समाज होता. मोगलांना टक्कर देत असतांना राजपुतांना बहादूर बंजारांची गरज भासली. म्हणून त्यांनी बंजारा समाजाला जवळ केले व त्यांना सैन्यात व राजपदावर अनेक मानाच्या पदव्या दिल्या. मोगल, ब्राह्मण व इंग्रजांच्या अन्यायातून बचाव करण्यासाठी गोर बंजारांना सुद्धा शासक वर्गाचा आश्रय व मदतीची समान वागणुकीची गरज होती. म्हणून ते राजपूत राजाशी हातमिळवणी करुन राहिले. पण त्यांचा सांस्कृतिक वारसा त्यांनी जपून ठेवला. गोर बंजारांनी आपल्या मुली स्वार्थासाठी मुस्लीमांना दिल्या नाही. तसेच बालविवाह, सतीप्रथा, दासीप्रथा सारख्या परंपरांचे पालन त्यांनी कधीच केले नाही. गोर बंजारांनी त्यांचा सांस्कृतिक वारसा अनेक संकटे आली तरी स्वतंत्रपणे जपून ठेवला, तो आजपर्यंत जसाच तसाच आहे. राज्याची बोलीभाषा, अलंकार, पोशाख, स्त्री-पुरुषांची नावे, पारंपरिक परंपरा, रीतिरिवाज रुढींमध्ये थोडाफार फरक पडलेला आहे. हा फरक स्थानिक संस्कारामुळे प्रत्येक राज्यात दिसून येतो. पण गोर बंजारा जमात (समुह) असल्याचे ते कधी नाकारत नाही. स्वयं समुहाचा नेहमी आदर करतात व सहकार्य सुद्धा करतात व बेटी व्यवहार सुद्धा करतात, हे वैशिष्ट्य कोणालाही नाकारता येत नाही. एकूणच समाज आदर्शवादी, समतावादी, सहकारवादी व श्रमप्रधान दिसून येतो. मात्र उच्च शिक्षण, मोठे उद्योग, राजसत्ता, सामाजिक संघटन, सांस्कृतिक लिखित इतिहास, साहित्यक्षेत्र, क्रीडा क्षेत्र, चित्रपट सृष्टी, मोठे पद, विदेशी व्यापार, नौकरी पासून तसेच गांव-शहर वस्तीपासून अद्यापही वंचित आहे.
3) गोर बंजारा समाज आणि समाज सुधारक :-
गोर बंजारा समाजात सिंधू संस्कृती काळापासून अनेक समाज सुधारक, संतजन, राजा-महाराजा होऊन गेलेले आहेत. परंतु त्यांची सविस्तर माहिती किंवा इतिहास उपलब्ध नाही. इतिहासकारांच्या काही ग्रंथात अल्पशी व ओझरती माहिती सापडते. सिद्धार्थ बुद्धाच्या काळात गोर बंजारा समाजाचा इतिहास सार्थवाह, वैदेहिक, विदेही, व्यापारी, वाहक वगैरे नावाने ओळखले जात होते. सिद्धार्थ बुद्धांपूर्वी सिंधू संस्कृती काळात पणी, द्रविड, नागवंशी वगैरे नावाने ओळखले जात होते. उत्तर वेदकाळात (पौराणिक) काळात सर्वच सिंधूवासी, मुळनिवासी, राक्षस, दैत्य, दानव, असुर वगैरे नावाने संबोधले जात होते. मुसलीम काळातील व नंतरची नावे सर्वांनाच माहीत आहेत. वर्तमान काळात हा समाज बंजारा, वंजारा, गंवार, गवारिया, गोर बंजारा, लमानी, लमान, लभाना, लबाना, लमानी, लंबाडा, लंबाडी, गराशिया, लदणीया वगैरे नावाने पूर्ण भारतात ओळखला जातो. सिंधू संस्कृतीचे पतन झाल्यापासून हा नगर निर्माता, नगरनिवासी, सधन विश्व व्यापारी, शेतकरी, पशुपालक, शिल्पकार, कशीदाकार, कारागीरी, युध्दप्रिय, जहाजा चालवणारा, कष्टप्रिय, कलाप्रिय, नागरी जीवनाचा त्याग करुन जंगलात तांडावस्तीत राहत आहे. आर्याशी झालेल्या लढाईत त्याचा पराभव झाल्यामुळे व व्यापार, शेती, नागरी जीवनापासून दुरावल्यामुळे मिळेल ती कामे करुन हा समाज जगू लागला. गौतम बुद्धांच्या काळातही हा समाज जागतिक स्तरावरचा व्यापार करीत होता. सिंधूस्थळ सोडल्यापासून या समाजाने पशुपालन, शिकारी बरोबरच कोळसा, व्यापार, गेरुचा व्यापार, मिठाचा व्यापार, मसाला, सुकामेवा विक्रीचा, जनावरे विक्रीचा व्यापार केला. आज तो काही प्रमाणात शेती, पशुपालनचा, रस्ते, इमारती, तळे, विहीरी निर्माणाचे, उसतोडीचे कामे करुन जीवन जगत आहे. विदेशात स्थाईक झालेला बंजारा रोमा, जिप्सी नावाने ओळखला जातो. भारतीय बंजारापेक्षाही रोमा-जिप्सीचे जीवन जास्त वाईट आहे. आदिवासी, भटक्या समुहाचे सर्व समुह, उपसमुह हे याच बंजारा समुहाचे दुरावलेले, संकरण झालेले समुह आहेत. कारण या सर्व समुहांची जीवनशैली समान असून हे वर्णबाह्य समुह असल्यामुळे हिंदू धर्माच्या सुद्धा बाहेरचे, श्रमण संस्कृतीचे, जात, धमृ, देवता निरपेक्ष समुह आहेत. त्यांचा इतिहास नष्ट केला गेल्यामुळे व ब्राह्मणी वर्चस्व व संस्कारामुळे ते चुकीने स्वत:ला हिंदू समजतात व ब्राह्मणी (हिंदूची) गुलामी करतात. व्यापार, अन्नधान्य, शस्त्रे व इतर सव वनावश्यक वस्तुंचा पशुंच्या पाठीवर व बैलगाडीवर पुरवठा करुन संपूर्ण जगाची भारताची सेवा करणार्या या समाजाला मनोहर पर्रीकर, किरण बेदी, खरगे, नेमाडे, ना.धो. महानोर, अमित शहा, मोटू सिंदाळे सारखे माथेफिरु, विकृत विचारी, मानवद्रोही लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे, हा देशद्रोहाचा गुन्हा मानावा लागेल.
4) गोर बंजारा समाजाचा धर्म :-
प्रथम भारतीय मेहरगड आणि नंतरच्या सिंधू अर्थात मोहेंजोदडो व हरप्पा संस्कृतीच्या काळात जाती व धर्म संकल्पना अस्तित्वात नव्हत्या. त्या काळात सामाजिक नियम होते. परंपरा होती. जात व धर्माची, मुर्तीपूजा, मंदिर निर्माण, क्षेत्र निर्माण व धार्मिक कर्मकांडांची निर्मिती ही विदेशी आर्य भारतात आल्यानंतरची आहे. इसवीसनापूर्वी आर्य, जैन व बौद्ध समाजाची नीती होती. यात आर्य नीती ही आमनवी आणि जैन, बौद्धनीती ही मानवी नीती होती. नीती म्हणजेच नियम, धोरण, पद्धत, परंपरा, चालीरीती वगैरे म्हणता येईल. जात, धर्म, कर्मफळ, भाग्य, भगवान, कर्मकांड, तीर्थयात्रा, दान-दक्षिणा, वर्णव्यवस्था या सर्व संकल्पना इसवीसनापासून अलीकडच्या काळात अस्तित्वात आलेल्या असून या संकल्पना विदेशी अश्रमी, परोपजीवी आर्य ब्राह्मणांनी विना कष्आचा, व्यापार धंदा म्हणून निर्माण केलेल्या आहे. आर्य आगमना पूर्वकाळात लोक प्रकृती तत्त्वांना, पूर्वजांना, पाळीव जीवांना, वृक्ष-वेली, नदी, डोंगर, चंद्र, सूर्य, तारका वगैरेंना वंदन, नमस्कार करीत होते. आदर करीत होते. पूजा प्रार्थना, आरती, अभिषेक, तीर्थयात्रा, मूर्तीपूजा, मंत्र जप असे निरर्थक प्रकार नव्हते. यामुळे आर्य आगमनापूर्वी गोर समाज आजचे कोणतेच धर्म मानीत नव्हता. केवळ परंपरागत नैतिक नियमांचे पालन करीत होता. या नैतिक, कल्याणकारी, न्यायी नियमांना, परंपरांनाच गोर समाज धाटी या नावाने संबोधत होता. धाटीमध्ये समाजाला घातक, बाधक ठरेल, विषमता, अन्याय,अत्याचार वाढेल, सामाजिक व्यवस्था व शांतता भंग पावेल, असे कोणतेही नियम नव्हते. स्थळ, काळ, प्रसंगानुसार या सामाजिक नियमांमध्ये बदल करण्याचे अधिकार जनतेकडून तांडा पंचायतला होते. तांडा पंचायत किंवा महापंचायत ही वस्तुत: आजची राज्य व केंद्रीय स्तरावरची मंत्रीमंडळच होती. आजच्या धर्मांतर्गत असलेले स्वार्थपुरक असे कोणतेही नियम धाटी नियमांमध्ये नव्हते. गोर बंजारा समाज प्राचीन काळापासून धाटी नियमानेच जीवन जगत होता. जातीतील भेदभाव व धर्म या संकल्पनेशी ते अपरिचित होते. कारण गोर समाज हा व्यापाराच्या निमित्ताने विश्व भ्रमण करणारा समाज होता. यामुळे धर्मबंधन त्याला मान्य नव्हते. म्हणून ते हिंदू, मुस्लीम, इसाई, शीख, जैन, पारसी, या धर्मतत्त्वाने वागत नव्हते. या सर्व धर्माची इसवीसनाच्या सुरुवातीपासून त्यांना माहितही नव्हते. गोर व इतर सर्व बहुजन इसवीसनापूर्वी धम्म मार्गाने वागत होते. इसवीसनानंतर ज्या धर्मसमुहाचे, राजे-महाराजे, समाज व शासन व्यवस्था होती. त्यानुसार त्यांना मिळते जुळते घ्यावे लागले. कालांतराने अज्ञान, धाक, दबाव व प्रबळ संस्कार, अन्याय, अत्याचार वगैरे कारणामुळे ज्या धर्म समुहाकडून त्यांना संरक्षण, सहाय्य व सहानुभूती मिळत गेली, त्या त्या धर्म समुहाकडे ते आकर्षित झाले, त्या समुहात मिसळून गेले. याच कारणामुळे या समुहाला धाटीचा विसर पडला व आज ते अन्य अन्यायी धर्माला चिकटून राहिलेले आहे. याचे प्रमुख कारण ते आपल्या पूर्वजांचा प्राचीन आदर्श, मानवी, पराक्रमी इतिहास विसरुन गेल्यामुळे त्यांना आज अमानवी, विकृत धर्मवादी जीवनशैलीचे समर्थन करावे लागत आहे.
इसवीसनापूर्वी धर्म नव्हते. जैन, बौद्ध (धम्म) नावाचे पंथ होते. म्हणून तद्पूर्वी लोक प्राकृतिक व पूर्वजांच्या जीवनशैलीचे अनुकरण करीत होते. सिद्धार्थ गौतम बुद्धांपूर्वी 27 बुद्ध झाल्याचे प्रमाण मिळतात. याचा अर्थ बुद्धांपूर्वी लोक धम्मतत्त्वाने, विचारधारेने जीवन जगत होते. या धम्म तत्त्वज्ञानाचा जगात प्रचार प्रसार करण्याचे खरे श्रेय गोर बंजारा समाजाकडे जाते. कारण गोर बंजारा विश्व व्यापार करीत होता. म्हणून त्यांना विश्वाच्या सर्व देशाचे रस्ते माहीत होते व याच कारणामुळे सर्व बौद्ध भिक्खू हे या विश्व व्यापारी गोर समाजाची साथ, मदत घेऊन संपूर्ण जगात फिरले व जगात बौद्ध धम्माचा प्रचार, प्रसार केला. विश्व व्यापारी गोर बंजारा समाज नसता तर कदाचित बौद्ध धम्म हा भारतापुरताच मर्यादित राहिला असता. बौद्ध भिक्खू व गोर बंजारा समाजाचे बौद्ध भिक्खूंशी घनिष्ट संबंध होते. म्हणून गोर समाजाचा संबंध बौद्ध धम्माशी जवळचा होता, असे मानणे गैर ठरत नाही.
विशेष म्हणजे धम्म शब्द हा धाटीचाच पर्यायी असला पाहिजे असे माझे मत आहे. नंतरच्या काळात सिद्धार्थ गौतमाने या धाटी जीवनशैलीचीच प्रस्थापना धम्म स्वरुपात केली असावी. जर माझे हे मत खरे ठरत असेल तर गोर बंजारा समाज हा तथागत सिद्धार्थ गौतमचा गुरु मानणे योग्य ठरेल. कारण बुद्धांपूर्वी 27 बुद्ध मानले जातात, त्यापैकी बहुसंख्य बुद्ध हे गोर बंजारापैकीच असावेत असा निष्कर्ष निघतो.
जय भारत - जय संविधान
प्रा. ग. ह. राठोड