गोर बंजारा धर्म संवाद

गोर बंजारा धर्म संवाद

17-3-2022 गोर बंजारा धर्म संवाद एप्रिल 1916 पासून गोर बंजारा समाजात धर्म, धाटी व धम्म विचारधारेबाबत उलट सुलट किंवा साधक बाधक चर्चा, संवाद, विवाद चालू आहे. 1947 ला भारताला सत्ता प्राप्त होण्यापूर्वी सर्व भारतीयांसाठी सर्व जाती, जमाती, भटक्या, इतर मागास वर्गांनी मिळून एक मताने भारताची ‘जगश्रेष्ठ’ घटना निर्माण केली. या घटनेला, कायद्याला, नियमाला भारतीय लोक संविधान म्हणून ओळखतात व या संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही सर्व भारतीयांसाठी समतेच्या मार्गाने चालण्याची सर्व भारतीयांनी शपथ घेतली आहे, प्रतिज्ञा केलेली आहे. ज्या दिवशी ही शपथ घेतली, प्रतिज्ञा केली, त्याच दिवशी सर्वांनी धर्म, जाती, वेगवेगळे देवी-देवता, निरर्थक कर्मकांड यांच्या सीमारेषा, ज्या त्या समाजासाठी सार्वजनिक हिताला बाधा येणार नाही, अशा ठरविल्या होत्या. थोडक्यात जाती, धर्म व धर्मांध कर्मकांडांची अंत्याष्टीच केली होती. पण हजारो वर्षांपासून जाती, धर्म व कर्मकांडात गुंतलेल्या समाजाला वैज्ञानिक दृष्टी येईपर्यंत मोकळीक दिली होती. पण विज्ञान युगात मानव समुह चंद्रावर पोहचला, तरी त्याच्या डोक्यातून देव, धर्म, जातीचा दुर्गंध, कचरा कमी होत नसल्यामुळे आज संपूर्ण भारतातील जनता विषमता, अन्याय व अत्याचाराच्या खड्ड्यात लोटली जात असून पुन्हा विदेशी आक्रमकांचे राज्य भारतावर स्थापन होण्याचे व बहुजनांचा सर्वनाश होण्याची, संव्हार होण्याची लक्षणे दिसत आहे. धर्माच्या अंतर्गत जाती, वर्ण व्यवस्था, देव-देवी, कर्मकांडे, मंदिर, तिर्थक्षेत्रे, धर्मगुरु, धर्मग्रंथ, धर्मक्षेत्रे व त्यांच्याशी निगडीत अनेकानेक स्वार्थ, यामुळे देव व देशाची जनता विनाशाच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. तरी सुद्धा भारतीय जातसमूह धर्मनिरपेक्ष या शासन-प्रशासनाबद्दल विचार न करता गाढवासारख्या लाथाळ्या मारीत आहे, ही एक शोकांतिका आहे. आर्य भारतात येण्यापूर्वी भारत देश श्रमप्रधान, धर्म, जाती, वर्णमुक्त, शेतीप्रधान होता. पण आज देश धर्म, जाती, निरर्थक शोषक कर्मकांडे, धर्मगुरु, धर्मग्रंथ, धर्मक्षेत्र, श्रेष्ठ-कनिष्ठ व भांडखोर प्रधान झाला असून देश समुद्राच्या काठावर असल्याची जाणीव होत आहे. एक मोठा धक्का लागताच देश समुद्रात बुडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आर्य भारतात आले नसते तर भारत धर्म, जात, वर्ण, देव-देवी, कर्मकांड, मंदिर तीर्थक्षेत्र, धर्मगुरु, धर्मग्रंथ, श्रेष्ठ-कनिष्ठमुक्त, स्त्री-पुरुष समतावादी, श्रमप्रधान, कृषिप्रधान असता व सर्वांना सर्व प्रकारचे मोफत उच्च शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, संरक्षण, शस्त्रांचा वापर, स्वास्थ्य, अर्थसत्ता, साहित्य, सांस्कृतिक, क्रीडा, चित्रपट, विदेशी व्यवहार सर्वांमध्ये सर्वांना योग्यतेनुसार समान संधी व अधिकार मिळाले असते. भारतात सर्व प्रथम सिंधू, सिंगी वैदिक संस्कृती, जीवनशैली अस्तित्वात होती. आर्य भारतात सत्ताधीश झाल्यापासून आर्य, सनातन, पौराणिक, ब्राह्मण (हिंदू) जीवनशैली अस्तित्वात आली. यानंतर जैन, बौद्ध, इसाई, मुस्लीम, पारसी, सिंधी, गुजराती, शीख वगैरे जीवनशैली, विचारधारा अस्तित्वात आल्या. आर्य भारतात आले नसते तर कदाचित वरीलपैकी एकही जीवनशैली, विचारधारा, धर्मपद्धती अस्तित्वात आल्या नसत्या. वरील सर्व जीवनशैलींपैकी धम्म शिखपंथ धाटी व हे धर्म कर्मकांडप्रधान नसून धम्म धाटी व शिखपंथ या तिन्ही जीवनशैली, विचारधारा हे नैतिक, न्यायी, समता, स्वतंत्रतावादी, मानवतावादी, श्रमप्रधान संवेदन, बंधुभावयुक्त चौकटीत येतात. धम्म, धाटी व शिख या जीवनशैली, विचारधारा वगळून इतर सर्व स्वयंकेंद्रित, स्वार्थी, अन्यायी व अधर्मी आहेत. धर्माचा खरा अर्थ नियम, कायदा, कर्तव्य असून, ज्या नियम, कायदे व कर्तव्यांमध्ये समता, मानवता, बंधूभाव असतो त्यांना धर्म म्हणजे सर्वांना धारण करणारे, सोबत घेणारे, सर्वांचे कल्याण करणारे नियम, कायदे, कर्तव्य, शिष्टाचार यालाच धर्म या पर्यायी नावाने संबोधले जात असावे. इतर कोणत्याही धर्मात वरील गुणवत्ता नसल्यामुळे ते धर्म न संबोधले जाता अधर्म संबोधले जाते व ते हटविणे न्यायोचित होय, असे माझे मत आहे. कारण प्रत्येक धर्मवादी, जातीवादी, स्वतंत्र देव-देवीवादी, मंदिर, धर्म, मज्जीदवादी, गुरुद्वारा, विहार, मठ, तीर्थक्षेत्रवादी हा परस्परांचा द्वेष करतो. इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो. आपल्या धर्मस्थळात येऊ दे नाही. बाटविल्याचे नाटक करतो, भांडणे, वाद, मारामार्‍या, खुनखराबी, जाळपोळ, नासधूस करतो. म्हणून धर्मस्थळे, जातीस्थळे, तीर्थस्थळे, देवस्थाने हे समाजाला लागलेले असाध्य, विनाशी रोग आहेत. हे रोग कायमचे नष्ट व्हावे म्हणून विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देवाधर्माच्या नावाने संविधान तयार न करता लोकांच्या नावाने संविधान तयार करुन निरोगी धर्मनिरपेक्ष संविधान निर्माण केले होते. संविधानाच्या माध्यमाने शासन करणारे सर्व लोकप्रतिनिधी हे संविधानानुसार शासन चालवून सर्वांना न्याय देण्याची प्रतिज्ञा करुन पदावर विराजमान होतात. पण हे लबाड लांडगे धर्मनिरपेक्षतेचे शासन न करता धर्माच्या आधारे गोंधळ घालत आहे व जनतेचा विश्‍वासघात करुन राष्ट्रद्रोही, समाजद्रोही कामे करतात, हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. भारतीय लोक समुहाचे वेगवेगळे देव-देवी, वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे धर्म, धर्मग्रंथ, धर्मगुरु, धर्मक्षेत्र हे भारतीय संस्कृती आणि सभ्यतेला, जनतेला लागलेले असाध्य रोग आहेत. याचे निर्माते सुद्धा भारत व भारतीय समाजद्रोही आहेत असे मी वारंवार माझ्या लेखात लिहित आहे. पण धर्म, जात, देवाच्या नावाने बोंबा माणारे एकदाही शंका समाधानासाठी संपर्क करीत नाही किंवा देशाच्या शेकडो समस्यांबाबत व त्या सोडविण्याबाबत विचार, चर्चा, प्रयत्न न करता जाती, धर्म, तीर्थक्षेत्रे वगैरेंच्या नावाने हिंदू, मुसलीम, इसाई, बौद्ध, शिख वगैरेंमध्ये भांडणे लावून, वाद निर्माण करुन धर्म व धार्मिकतेच्या नावाने स्वत:च्या तुंबड्या भरुन स्वार्थ साधत आहे. देशाला अधोगतीकडे नेत आहे. जाती व धर्मवादी, श्रेष्ठवादीच्या या स्वार्थी शासन प्रकारामुळे जगात भारताची कवडीची किंमत राहिलेली नाही. जाती व धर्मवाद्यांनी, श्रेष्ठवाद्यांनी, परोपजीवी भांडवलदार, उद्योगपती, भटजी, सेठजीवी देश विक्रीला काढला असून देशाची साधन संपत्ती, बँका विकून विदेशात जाऊन स्थाईक होण्याच्या प्रयत्नात आहे. धनसंपत्ती, साधनहीन भारतात बहुजनांचे भविष्य कसे राहिल हा येणारा काठ ठरविल. भारताचा आदिकाळ म्हणजे आर्य भारतात शासक होण्यापूर्वी भारत देश जाती, धर्म, मंदिर, तीर्थक्षेत्र, कर्मकांडमुक्त व श्रमप्रधान देश होता. परंतु विदेशातून आलेल्या सेठजी, लाटजी, भटजी या परोपजीवी लोकांनी विनाश्रम बसून खाण्यासाठी जाती, धर्म, कर्मकांड, तीर्थक्षेत्रे, दान-दक्षिणा घेण्याची संस्कृती निर्माण केली व वरील सर्व साधने त्यांनी त्यांचा धंदा, व्यापार, दुकानदारी, रोजगार हमी बनवून बहुजनांना निरक्षर, अडाणी ठेवून, बैल बनवून त्याचा आजपर्यंत वापर करीत आहेत. आपले सर्व मागास, बहुजन लोक बैल बनून भूसा, कडबा खाऊन उपाशी राहून जगत आहे व भटजी, सेठजी, लाटजी मात्र तुपाच्या समुद्रात पाहत आहेत. आता मागास बहुजन बैल वर्ग जागा होऊन सत्ताप्राप्तीसाठी संघटित न झाल्यास प्रस्थापित वर्ग या बहुजन भाकड बैलांना त्यांच्या सत्तेच्या बळावर कसायांना विकल्याशिवाय राहणार नाही, असे निश्‍चित समजावे. 1947 ला भारताला सत्ता मिळाल्यापासून आजपर्यंत मते बहुजनांची आणि सत्ता अभिजनांची अशी परिस्थिती देशात जाती व धर्मवाद्यांनी निर्माण केलेली आहे. कष्टाच्या व त्यागाच्या माध्यमांनी देश विकासाच्या शिखरावर पोहचविणारे, राष्ट्रासाठी धनसाधने निर्माण करणारे बहुजन आहेत. परंतु या धन व साधनांचा उपयोग सत्ता हाती नसल्यामुळे बहुजनाला होऊ लागलेला नसून कष्ट व त्याग, देशाला कोणतेही त्याग न करणार्‍या अभिजनाला, प्रस्थापितांना, जाती, धर्मवाद्या परोपजीवींना समाज व देशद्रोहींना होत आहे. जनतेने दिलेल्या लोकशाहीचा फायदा कष्टकर्‍यांना न देता, शोषक उद्योगपती, भटजी, सेठजी, लाटजी यांना सत्ताधारी गैरमार्गाने करुन देत असून बहुजनांवर हुकूमशाही गाजवित आहे. बहुजनातील काही बिनडोक, अविचारी लोकप्रतिनिधी या देश विद्रोही सत्ताधारींचे समर्थन करीत असून बहुजनांचा विश्‍वासघात करीत आहे. तेव्हा आता सर्व बहुजनांनी संघटित होऊन स्वकीय व परकीय शत्रुंना ओळखून त्यांना धडा शिकविण्याची प्रतिज्ञा करणे आवश्यक झाले आहे. यासाठी सर्व बहुजनांनी यापुढे प्रस्थापितांवर, इव्हीएम मशीनवर, निवडणूक आयोग, न्यायालय, प्रचार माध्यमे वगैरेंवर बहिष्कार टाकून देश संविधानानुसार चालवून बहुजन जनता व देश कसा सुखी, समृद्ध व सुरक्षित ठेवता येईल यावर सर्वांनी विचार, चिंतन, मंथन करुन शक्य तितक्या लवकर सत्ता बहुजनांच्या हाती कशी येईल याची तयारी करण्याची प्रथम अनिवार्यता आहे. जय भारत - जय संविधान प्रा. ग. ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments