काही गोर बंजारा अविचारी लोक गोर संस्कृतीचे ब्राम्हणीकरण करीत आहेत.
गोर बंजारा समाज हा इ.स. पूर्वीचा 7000 वर्षांपूर्वीचा मेहरगड संस्कृतीचा बहुजन समुहांपैकी पणी नांवाचा एक जनसमुह असुन इ.स. पूर्व 2000 मध्ये सिंधू संस्कृतीचा विकास झाल्यानंतरचा हा जागतिक स्तरावरचा सर्वाधिक श्रीमंत व्यापारी वर्ग होता. हा समुह त्या काळात जात, धर्म व ईश्वर निरपेक्ष आणि प्रकृती वंदक होता. आर्य भारतात आल्यानंतर पणी समुह व आर्य समुहामध्ये संघर्ष सुरु झाला व या संघर्षात बहुजनसह पणी समुहाचा इ.पू. 1700 च्या जवळपास पराभव झाला व आर्यापासून संरक्षणार्थ त्यांनी जंगलात स्थलांतर केले व यानंतर आर्यांनी भारतात वर्ण व्यवस्था निर्माण केली. आर्यपूर्व भारतात वर्ण व्यवस्था नव्हती म्हणुन बहुजन व पणी (गोर बंजारा) समुह हे वर्ण बाह्य समुह होते. परंतु पराभवानंतर जे आर्यांना शरण जाऊन गांव शहरात राहिले, त्यांना वर्ण व्यवस्थेचे नियम स्वीकारावे लागले. परंतु जंगलात अज्ञात व अवघड ठिकाणी स्थलांतरित झालेले सर्व समुह वर्ण बाह्य (वर्णमुक्त) समतेचे जीवन जगत होते. या वर्णमुक्त समुहांपैकीच पणी (गोर बंजारा) समुह एक असुन ब्राह्मणी संस्कृतीची या समुहाचा कधीच संबंध नव्हता. त्याचा कोणत्याही धर्माशी संबंध नव्हता. ते धाटी नियमाने जगत होते. परंतु स्वातंत्र्यानंतर त्यांचे संबंध गांव शहरांशी वाढले व काळाच्या प्रवाहात त्यांना हिंदु (ब्राह्मण) व इतर धर्माचा रोग लागलेला आहे. ब्राह्मण समुहाशी व ब्राह्मणी कर्मकांडांशी त्याचा एका केसा इतका सुध्दा संबंध नव्हता. कारण हा समुह पूर्णत: निसर्ग (प्रकृती) वंदक होता. पण 1947 नंतर त्यांना जबरदस्तीने हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई बनविले जात असून त्यांच्या कर्मकांडांचे संस्कार त्याच्यावर होत आहे. संघ, भाजप, शिवसेना या समुहाची दिशाभूल करीत असून हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणत्व त्यांच्यावर लादून कर्मकांडाच्या माध्यमाने त्यांचे शोषण करावे असे त्याचे धोरण आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे की, ‘ज्या लोकांना आपला स्वत:चा, स्वाभिमानी, स्वतंत्र, आदर्श, लढवय्या, शासनकर्त्याचा इतिहास माहित नाही, असा समाज कधीही इतिहास घडवू शकत नाही. त्यांनी आपला इतिहास जाणला नाही तर इतिहास त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहत नाही.’ अर्थात अशा समुहाला दुसर्या धर्माचे गुलाम बनून राहावे लागेल. पणी (गोर बंजारा) आपला धाटी जीवनाचा आदर्श, मानवतावादी इतिहास विसरुन गेल्यामुळे तो वर्तमान काळात अविचारीपणे गोर संतांना भोग लावण्याचे, दुधाने प्रतिमा धुवून (गोमुत्राप्रमाणे) पवित्र बनविण्याचे, शोषणाचे व आयतखावूचे तीर्थक्षेत्र निर्मितीचे, मूर्त्या निर्मितीचे ब्राह्मणी कर्मकांडे करण्याचे, यज्ञयाग करण्याचे, लग्नात ब्राह्मणांना महत्व देण्याचे, अक्षता फेकण्याचे, नैवद्य-प्रसाद वाटण्याचे, नारळ फोडण्याचे, नारळ स्वीकार करण्याचे, पशु बळी देण्याचे, तीर्थयात्रा करण्याचे, भोंदू बुवा महाराज, भगत भोपांचे समर्थन करण्याचे, अर्थहीन व निरोपयोगी भजन, किर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम घेण्याचे अविचारीपणाचे कार्यक्रम राबवून समाजाचे ब्राह्मणीकरण, हिंदुकरण करण्याचे काम करीत आहे. न कळत ते अंधश्रध्देला, अवैज्ञानिकतेला, शोषणाला व शत्रुच्या पोषणाला हातभार लावत असुन समाजाचे न भरुन येणारे नुकसान करीत आहे. शत्रुला भोंदु, आयतखावू, समाज व देशद्रोही समाजाच्या दावणीला हातभार लावण्याचे काम करीत आहे. समाजाला शोषण, अज्ञान, अंधश्रध्देपासून जर दूर ठेवायचे असेल तर गोर समाजाने देव, धर्म, जाती व कर्मकांडाचा त्याग करुन शिक्षण, श्रम, संघटन, राजकरण, उद्योग, व्यापार, साहित्य निर्माण, वंचितांना जवळ करण्याचे प्रयत्न व शत्रुची ओळख करुन घेऊन त्यांच्या डावपेचातुन मुक्त कसे होता येईल, याबाबत विचार, चिंतन मंथन करण्याची मोठी गरज आहे. याशिवाय आजपर्यंत बहुजन समाजाचे हितचिंतक, महापुरुष, परिवर्तनवादी संत, सुधारक, अर्थात दिगनाक, चार्वाक, बुध्द, सम्राट अशोक, छ. शिवाजी, रा.शाहु, संभाजी, राष्ट्रपिता फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरीयार, कांशीराम, उपरेकाका क्रांतिकार सेवालाल नाईक साहेब यांचा वैचारिक वारसा व त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची प्रतिज्ञा करणे हेच आपले परम कर्तव्य समजावे असे मला वाटते.
जय भारत - जय किसान,
जय जवान, जय संविधान
आपला हितचिंतक