बहुजन बांधवांनो,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपणांस काय नाही दिलं

बहुजन बांधवांनो,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपणांस काय नाही दिलं

बहुजन बांधवांनो,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपणांस काय नाही दिलं 1) भारताला इंग्रजांकडून सत्ता हस्तांतर होईपर्यंत भारतातील करोडो अस्पर्श्य, बहिष्कृत म्हणजे अनुसूचित जाती जमातीवर हजारो वर्षांपासून मनुवाद्यांकडून पशुवत असहनीय अन्याय अत्याचार होत होते. याच समाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सुध्दा जन्म झाल्यामुळे त्यांना सुध्दा आपल्या आयुष्यात मनुवाद्यांकडून असंख्य, असहनीय अन्याय, अत्याचार, अपमानाचे जालीम विष पचवावे लागले. पृथ्वीतलावरील सर्व माणसे समान आहेत पण त्यापैकी विशेष करुन भारतात मनुवाद्यांनी काही समुहांना अस्पर्श्य, बहिष्कृत ठरवून त्यांच्यावर अनंत अन्याय, अत्याचार, अपमान करणे व त्याचा वापर करणे व पशुपक्ष्यापेक्षाही अति वाईट वागणूक देणे, एवढेच नव्हे तर पशुपक्ष्याप्रमाणे त्यांचा संव्हार करणे ही माणुसकीला काळीमा फासणारी बाब डॉ. बाबासाहेब आंबेडकरांंच्या दृष्टीस आली. मनुवादी स्वार्थी, परोपजीवी, अभिमानी, देश व समाजद्रोही या जनसमुहाच्या व्यवहाराबाबत डॉ. बाबासाहेबांना भयंकर चीड, राग आला व विद्यार्थी अवस्थेतच त्यांनी या अमानवी व्यवहाराविरुध्द अथक संघर्ष करुन न्याय मिळवून देण्याची घोर प्रतिज्ञा केली. कोणातरी विचारवंताचे एक मननीय चिंतणीय विचार आहे की, ‘‘जिसको ना नीज गौरव तथा नीज देशका अभिमान है। वह नर नहीं नरपशु है, और मृतक समान हैर्र् ‘‘॥ अर्थ असा की ज्या माणसाला स्वसमाज, स्वदेश, स्वदेशाचे नागरीक ांविषयी बांधिलकी, गर्व, अभिमान, आपलेपणा किंवा संवेदनशीलता नाही, असा माणूस मानव रुपात जन्म घेऊनही पशुसमानच असतो. डॉ. बाबासाहेबांना पशु बनून रहायच नव्हतं, म्हणून त्यांनी शिक्षण घेत असतांना असंख्य अडचणी, अत्याचार, अपमान, अन्याय सहन करुन स्वसमाजाला न्याय मिळवून देण्याची, देशाला योग्य दिशा देण्याची, मनुवाद्यांना धडा शिकविण्याची व स्वसमाजालाच नव्हे तर विश्‍वातील सर्व वंचितांना सुध्दा न्याय मिळवून देण्याची, त्यांच्यावरील अन्याय, अत्याचार दूर करुन समतावादी, मानवतावादी समाज व शासन व्यवस्था निर्माण करण्याचा त्यांनी दृढ निश्‍चय केला. या निर्णय अथवा प्रतिज्ञेप्रमाणे त्यांनी सर्वप्रथम ब्रिटीश सरकारची मदत घेऊन अर्थात स्वसमाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारांची जाणीव करुन देऊन ब्रिटीशांच्या शासन काळातच अनुसूचित जाती जमातीसाठी क्रमश: घटना कलम नंबर 341 व 342 नुसार आरक्षण मिळवून घेतले. सदर मागण्या मंजूर होईपर्यंत ब्रिटीश काळात ओबीसी समुहाची जनगणना झालेली नव्हती. यामुळे आरक्षण मागता अथवा घेता आले नाही. मात्र भारताचे सरकार स्थापण झाल्यानंतर प्रथम घटनेच्या 340 कलमानुसार ओबीसींच्या आरक्षणास साफ नकार दिला. तरीही बाबासाहेबांनी 340 कलमानुसार आयोग निर्माण करुन ओबीसींची जनगणना करुन संख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याची मागणी लावून धरली. पण सरकारनी आयोग स्थापण न केल्यामुळे बाबासाहेबांंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. यामुळे सरकारला नाईलाजाने कालेलकर आयोग स्थापण करावा लागला. या आयोगाला अनुसरुनच आजपर्यंतचे वेगवेगळे आयोग निर्माण होत असून तदनुसार ओबीसींकडून आरक्षणाची मागणी व आंदोलने, मोर्चे वगैरे होत आहे. जर बाबासाहेबांनी घटना निर्मितीच्या वेळी कलम नंबर 340 चा आग्रह केला नसता व राजीनामा दिला नसता तर आज कोणत्याच ओबीसी वर्गांना आरक्षण मागता आले नसते व आंदोलने, मोर्चे काढता आले नसते. तसेच आज जे ओबीसींना आरक्षण मिळालेले आहे, हे आरक्षण सुध्दा मिळाले नसते. बाबासाहेबांनी ओेबीसींना आरक्षण मिळावे म्हणून स्वसमाजाच्या आरक्षणापेक्षाही जास्त प्रयत्न आणि मंत्रीपदाचा राजीनामा देवून बहुजन ओबीसींसाठी फार मोठा त्याग केलेला आहे. मनुवाद्यांनी त्यांच्या या त्यागास यश मिळू दिले नाही,ही वेगळी बाब आहे. पण बाबासाहेबांनी ओबीसींसाठी काय केले असे म्हणने अथवा दोष देणे, बदनाम करणे, परका समजणे, हे कृतघ्नपणाचे, अविचारीपणाचे, जातीवादीपणाचे लक्षण आहे. 2) डॉ. बाबासाहेबांनी ओबीसींसाठी त्याकाळात संघर्ष व त्याग करुनही आरक्षण मिळवून देण्यात यश आले नसले तरी मनुवाद्यांनी बहुजनावर लादलेली सर्वच बंधने केवळ स्वसमाजासाठीच नव्हे तर सर्व वंचित भारतीय समाजासाठी नष्ट केली, हटविली असून सर्वांना माणूसकीचे जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. मनुवादाचा खात्मा करुन त्यांच्या गुलामीतून मुक्त करुन विकासाची सर्व दारे सर्वांसाठी खुली केलेली आहे. पण ओबीसी, भटका, विमुक्त, गुन्हेगार, आदिवासाी अद्यापही आपल्या शत्रूला मित्र समजत असल्यामुळे व त्यांना साथ देत असल्यामुळे व खर्‍या मित्राला शत्रु समजून त्याचा द्वेष करीत असल्यामुळे, शत्रु समजत असल्यामुळे आजही बहुसंख्य ओबीसी बहुजन शत्रुच्या गुलामीतच राहून जीवन जगू इच्छित आहे, ही एक शोकांतिका आहे. डॉ. बाबासाहेबांनी सर्व भारतीयांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय, व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, रोजगार, सर्वात महत्वाचे मतदानाचा अधिकार, अस्पृश्यता निवारण, पर्यटन, निवास, प्रतिनिधीत्वाचा अधिकार, आरक्षण, समान पगार, नोकरीतील सुट्या, आरोग्य सेवा, वैद्यकीय सवलती, वित्त सहाय्य, संरक्षण वगैरे अनेकानेक, बहुमोलाचे अधिकार मिळवून दिलेले आहे. मागील पाच हजार वर्षाच्या काळात बहुजनांना 33 कोटी देवी देवतांना व त्यांच्या बापांना, पूर्वजांना देता आले नाही. केवळ बहुजनांना छळता आले. परंतु डॉ. बाबासाहेबांनी सर्वांना हवे ते दिलेले आहे. कामाचे आठ घंटे, कामगारांना संपाचा अधिकार, बोनस, प्रोव्हीडंड फंड, पेन्शन, संघटनांना मान्यता, महागाई भत्ता, पगारी सुट्या, कामगार कल्याण निधी, प्रसूती रजा, वैद्यकीय रजा, फारकतीचा अधिकार, पालकत्वाचा अधिकार, उत्तराधिकाराचा अधिकार, महिला अधिकार, मालमत्तेचा अधिकार याशिवाय देशाच्या विकासाच्या अनेक योजना, धरणे, नदीजोड प्रकल्प, रिझर्व बँक, जलसिंचन योजना, विद्युत प्रकल्प अशा अनेक तरतुदी व सूचना बाबासाहेबांनी करुन दिल्यामुळे बहुजनाच्या जीवनात अमुलाग्र असे बदल घडून आलेले दिसते, ते कदापि नसते. शिक्षणाचा अधिकार मतदानाचा अधिकार, अस्पृश्यता निवारण, व्यवसाय नोकरीचे अधिकार, स्त्री-पुरुष समतेचे अधिकार, आरक्षण यामुळेच सर्व मागास वर्ग आज रोजी गांव व शहरातच नव्हे तर परदेशात सुध्दा मुक्तपणे फिरत असून तो आज मनुवाद्यांनाही मागे सोडायच्या प्रयत्नात आहे. यामुळेच मनुवादी आज चिडलेला असून तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित घटनाच नष्ट करुन मनुवादी घटना लागू करुन सर्वांना वरील सर्व सवलतीपासून दूर करण्याचा जोरदार प्रयत्न, विशेष करुन 2014 पासून जिद्दीने लागला आहे. या देशातील बहुजनांना 1947 नंतर जे काही मिळालेले आहे, ते केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळालेले आहे तरी देखील बहुजन ओबीसी वर्ग डॉ. बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलेले आहे, असे निर्लज्जपणे विधान करतात. अरे, मुर्ख बहुजनांनो, आज भारतात हक्क आणि अधिकारांसाठी ज्या ज्या जनसमुहाकडून संघर्ष, लढे, आंदोलने, मोर्चे, उपोषण, जनजागरण, निवडणूका, स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अधिकार पदे, आमदारकी, खासदारकी, मंत्रीपदे, उद्योगधंदे, व्यापार, सर्व काही घटनेच्या अधिन राहून चालत आहे, या सर्वांचा उपभोग सर्वच भारतीय घेत आहे, परंतु या सर्व सुखाला, सवलतीला, विकासाला, शांततेला कोण कारणीभूत आहे, याचा जात धर्मनिरपेक्ष चष्म्यातून पाहण्याची व ज्यानी ही सर्व व्यवस्था उपलब्ध करुन दिली, त्यांन कृतज्ञतापूर्वक वंदन, सन्मान करण्याची मानवतावादी, समतावादी, न्यायवादी दृष्टी सर्व बहुजनांमध्ये का येऊ नये याचे मला आश्‍चर्य वाटते. प्रत्येक घटनेला कारण कार्यभाव जोडलेले असते. देशातील संपूर्ण परिवर्तनाच्या कारण कार्य भावाची जर कोणाला कदर करता येत नसेल तर तो माणूस नव्हे तर पशुच मानावा लागेल. आज देशामध्ये पुन्हा 1947 पुर्वीची रानटी अवस्था निर्माण होण्याच्या मार्गावर आहे. ही अवस्था निर्माण होऊ द्यायची नसेेल तर सर्व बहुजनांनी बहुजनांचे जे जे हितचिंतक परिवर्तनवादी महापुरुष होऊन गेलेत त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. एवढेच नव्हे तर त्यांचा सन्मान करुन वंदन केले पाहिजे. कारण बहुजनांच्या हितासाठी त्यांनी आपले देह झिजविले आहे. त्यांनी बहुजनाच्या हितासाठी, कल्याणासाठी तन-मन-धनाने त्याग केलेला आहे. विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेबांनी तर सर्व वंचितांसाठी आपल्या संसाराची, सुखाची, सन्मानाची सुध्दा राखरांगोळी केलेली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत आपण आजच्या भारताची आणि बहुजनांच्या सद्यपरिस्थितीची कल्पना करु शकत नाही. त्यांच्या त्यागामुळेच, कष्टामुळेच, वंचितांविषयी असलेल्या संवेदनशीलतेमुळेच सर्व बहुजन काही अंशी सुखाचे, समाधानाचे, स्वातंत्र्याचे, सन्मानाचे जीवन जगत आहोत. त्यांचे अनंत व आभाळाएवढे व परत न करण्यासारखे महान उपकार सर्व वंचित बहुजनावर आहे. तेव्हा सर्व बहुजनांनी अंतकरणापासून त्यांचा सन्मान, आदर व्यक्त करणे हे प्रथम कर्तव्यच नव्हे तर त्यांच्या आदर्श मानवतावादी विचाराशिवाय कोणालाही जीवन जगणे शक्य नसल्यामुळे त्यांच्या विचारतत्वाने चालणे अथवा अवलंबणे अनिवार्य आहे. आज संपूर्ण विश्‍वात त्यांचा व त्यांच्या तत्वज्ञानाचा, त्यांच्या विद्वतेचा, त्यागाचा, संवेदनशीलतेचा आदर, सन्मान होत असतांना भारतीय बहुजन वर्गाने बाबासाहेबांचा द्वेष व अपमान करावा यासारखा कृतघ्नपणा दुसरा कोणताही नाही असे मी मानतो. कारण सर्वांना जे हवे ते त्यांनी सर्वांना दिलेले आहे. जे मिळत नाही ते शासनाकडून घटनेनुसार संघर्ष करुन, संघटित बनून घेण्याचे कर्तव्य आपल्या सर्वांचे आहे. जर हे काम आपल्याकडून होत नसेल तर त्याला कारणीभूत आपणच असून आपण पुरुषार्थहीन आहोत हे सहजप्रमाणीत होते. डॉ. बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमांनी दिलेले हक्क अधिकार मिळविणे हे आपले कर्तव्य असून ते मिळविण्यासाठी सर्व वंचितांनी आज रोजी संघटित होणे गरजेचे आहे. हा संघटितपणा डॉ. बाबासाहेबांविषयी व आपल्या परिवर्तनवाद्या महापुरुषाविषयी सर्वांना सारखा आदर असेल तरच शक्य आहे. नसता पुन्हा मनुवाद अटळ आहे याची जाणीव बहुजनांनी व वंचितांनी अवश्य ठेवावी. वरील अनेक मानवी देणग्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वच वंचितांना दिलेल्या आहेत पण याशिवाय डॉ. बाबासाहेबांनी मनुवादीच्या शोषणातून, मानसिक गुलामीतून मुक्त होण्यासाठी, अंधश्रध्दा व अज्ञानातून बाहेर पडण्यासाठी बाविस प्रतिज्ञांची फार मोठी देणगी व मानवी मूल्याचा खजिना दिलेला आहे. हा खजिना वस्तुत: सर्व प्रकारच्या मनुवादाच्या रोगातून मुक्त होऊन शोषणमुक्त सुखाचे जीवन जगण्यासाठी सर्वच समुहांना धर्मांध बेड्या तोडण्यासाठी अथवा धर्मांधकोंडवाड्यातून बाहेर पडण्यासाठी दिलेल्या आहे. डॉ. बाबासाहेबांनी तथागत बुध्द, कबीर, म.फुले यांना आपले गुरु मानलेले आहे. संत नामदेव, संत तुकाराम, संत कबीर, रविदास, पेरीयार या समाजसुधारकांनी सुध्दा बुध्दाचीच विचारधारा स्वीकारल्याचे दिसून येते. छ. शिवाजी महाराजांनी संत तुकारामला गुरु मानले आहे व सर्वांनीच काल्पनिक देवता आणि मुर्तिपुजेचा विरोध केलेला आहे. या सर्व महापुरुषाच्या तत्वज्ञानाचे रसायन सेंद्रिय रुपाने डॉ. बाबासाहेबांच्या बाविस प्रतिज्ञांमध्ये सामावलेले आहे. तेव्हा बहुजनांनी बाविस प्रतिज्ञेचे पालन केले तर जीवनाचे सोने होऊन बहुजन मानसिक, बौध्दिक गुलामीतून मुक्त होऊन सुख, शांती समाधानाचे जीवन जगतील असा माझा विश्‍वास आहे. संपुर्ण जगाने डॉ. बाबासाहेबांना शिखरावर बसविलेले असतांना आपण आपल्यावर त्यांचे अनंत उपकार असुनही दूर का आहोत हा सर्वांसाठी चिंतनाचा विषय आहे. जयभारत- जयविश्‍व. प्रा. ग.ह. राठोड औरगाबाद.

G H Rathod

162 Blog posts

Comments