बापाचं खाऊन बापालाच बदनाम करणारे शुद्र लोक मनुच्या मनुस्मृती धर्मग्रंथानुसार मानव समूह चार वर्णात विभाजीत करण्यात आलेला आहे.
दि. 30/11/2022
बापाचं खाऊन बापालाच बदनाम करणारे शुद्र लोक मनुच्या मनुस्मृती धर्मग्रंथानुसार मानव समूह चार वर्णात विभाजीत करण्यात आलेला आहे. 1) ब्राह्मण 2) क्षत्रिय 3) वैश्य आणि 4) शुद्र अति शुद्र.
मनुच्या धर्मग्रंथानुसार वरीलप्रमाणे चार मानव समूह असले तरी ब्राह्मण वर्ग क्षत्रिय, वैश्य, शुद्र व अतिशुद्र या सर्वांना शुद्रच मानतो. शुद्र म्हणजे ब्राह्मणी गुलाम अस्पृश्य, नीच, बहिष्कृत, दुर्लक्षित, वंचित, विशेष अधिकारविहीन, अधिकाररहित. इ.स. 1947 पूर्वी वरील सर्व शुद्रांना कोणतेच अधिकार नव्हते. ब्राह्मण वर्ग जशी वागणूक देतील व व्यवहार करू देतील तसे शुद्रांनी विना अधिकार पशुसमान शुद्रांनी जीवन जगावे, असे अधिकार क्षेत्र शुद्रांसाठी होते. ब्राह्मणी वर्ग व इतर सवर्ण समजले जाणारे सर्व वर्ग म्हणजे बनिया, गुजराती, सिंधी, पारसी, पटेल, ठाकूर, राजपूत वगैरे स्वैराचारी, मनमानी व हुकुमी शासक किंवा सत्ताधारी होते. राणी-राजा हे राजा व राणी यांची संततीच राहत असे. इतरांना राजा अथवा राणी होण्याचे अधिकार नव्हते. पण इंग्रज भारतात आले. त्यांनी शुद्रांना शिक्षणाचे व इतर सर्व अधिकार दिले. मनुस्मृतीचे सर्व अधिकार रद्द-नष्ट केले. इंग्रजांचे भारत आगमन व सत्तेमुळे शुद्रांपैकी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देशाची घटना तयार करण्याचे ज्ञान व संधी मिळाली. विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांच्या बुद्धिचार्तुयामुळे व इंग्रजांच्या दबावामुळे सर्ववर्णीय लोकांना लोकशाहीचे अधिकार मिळाले व ब्राह्मणांच्या गुलामीतून सुटका मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम, संत कबीर व म. फुलेंचे विचार, तत्त्वज्ञान स्वीकार करून शिष्यत्व स्वीकारल्यामुळे सयाजीराव व शाहू महाराज यांच्या उदार सहकार्यामुळे हे शक्य झाले. 1947 नंतर भारतात जे परिवर्तन घडून आले ते तथागत बुद्ध, कबीर, म. फुले यांच्या तत्त्वज्ञानामुळे झाले. याच कारणामुळे भारत जगात बुद्धांचा देश म्हणून ओळखला जातो. भारत हा ब्राह्मणांचा, हिंदूंचा, राम-कृष्ण अथवा ब्रम्हा, विष्णु, शंकराचा देश मानला जात नाही. तथागत बुद्धांचे धम्म तत्त्वज्ञान, विचारधारा, सिद्धांत जगाने स्वखुशीने स्वीकारले व बुद्ध हे भारताचे गुरू म्हणून भारत देश हा जगात बुद्धांचा देश म्हणून मानला जातो. भारतातील मुळनिवासींच्या सिंधू संस्कृतीच्या विनाशानंतर सिद्धार्थ गौतमाच्या सत्ता स्थापनेपर्यंत भारतात मनुवादीची म्हणजे मनुस्मृती कायद्याची सत्ता होती व आजच्या सर्व शुद्रांचे, बहुजनांचे जीवन या दीर्घकाळात गुलामीचे आणि पशुसमान मानवी अधिकारविहीन होते. या सर्वांमुळे निवासी, बहुजन मनुस्मृतीच्या पशुसमान जीवन जगणार्या सर्व अधिकार विहीन गुलामांना व इतरांना सर्व प्रकारचे मानवी अधिकार भारतीय संविधानाच्या माध्यमांनी विश्वरत्न व घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अपार व असहनीय कष्ट, त्याग व अपमान सहन करून मिळवून दिलेले आहे. आपले आजे पंजे व बापानेसुद्धा बहुजनांना कधी मिळवून दिले नाही, ते मानवी हक्क अधिकार डॉ. बाबासाहेबांनी मिळवून दिलेले आहे, हे कोणालाही आज नाकारता येणार नाही. म्हणून मी जाहीरपणे सांगू इच्छितो की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्व बहुजनांचे पितृस्थानी आहेत.
1947 नंतर बहुजन जे जीवन जगत आहे, ते तथागत गौतमाच्या तत्त्वज्ञानामुळे, संत कबीर, म. फुले यांच्या गुरुत्व व सयाजीराव, शाहू, इंग्रज यांच्या सहकार्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याग, समर्पणामुळे होय. बहुजनांना आज आलेले माणुसकीचे जीवन हे हिंदू, मुस्लीम, इसाई, पारसी धर्मामुळे आणि 33 कोटी देवी-देवतांमुळे नसून केवळ धम्म तत्त्वज्ञान आणि डॉ. आंबेडकरांच्या महान कष्ट आणि त्याग समर्पणामुळे हे बहुजनांनी समजून सत्याचे समर्थन करण्याची आज खरी गरज आहे.
अद्यापही मनुस्मृती ग्रंथाच्या व मनुवाद्यांच्या पाशवी व्यवहारामुळे लाखो बहुजन गुलाम सर्वाधिक प्रमाणात मुस्लीम व इसाई व क्वचितच बौद्ध झालेले दिसून येतात. पण आंधळ्या, मूर्ख, हिंदुत्व समर्थक बहुजनांना मुस्लीम, इसाई झालेले बहुजन दिसत नाही. केवळ मानवी, बौद्घ विचारधारा स्वीकारणारेच दिसतात. अशा हिंदूधर्मीय लोकांना हिंदू बनून राहणे पसंत असेल तर त्यांनी पुढील हजारो पिढ्या हिंदूधर्माचे गुलाम बनून राहावे. त्यांना बुद्धांकडे जाणार्यांना रोखण्याचा किंवा बदनाम करण्याचा अधिकार नाही. कारण कोणताही धर्म, पंथ, भाषा, पक्ष, प्रांत स्वीकारण्याची व्यवस्थाच भारतीय संविधानात आहे. तेव्हा धर्मांतर करणार्यांना दोष देणार्या मुर्खांनी भारतीय संविधान वाचून सत्य समजून घेण्याची गरज आहे. हिंदू धर्म सर्वात जुना आणि श्रेष्ठ जर आहे, तर या धर्मात 33 कोटी देवी-देवता असून देशात सर्वाधिक विषमता, अन्याय, अत्याचार, गरिबी, निरक्षरता, बेकारी, बिमार्या का दिसून येतात? दुसर्या देशात एकच देव असताना ते देश भारतापेक्षा जास्त प्रगत आणि सुखी का आहेत, भारतात सर्वाधिक मंदिर का आहेत, मंदिरात जमा होणारी धनसंपत्ती सर्वांसाठी वापरली जाते का? मंदिराऐवजी सर्वसामान्यांसाठी, शेतकरी, मजूर, कष्टकरी, जवान, बेघरांसाठी घरे, शिक्षणसंस्था, दवाखाने, विश्रामगृहे, रस्ते, विजपुरवठा, पाणी व्यवस्था, अन्न व्यवस्थेकडे का लक्ष दिले जात नाही.
माझ्या विचाराने हिंदू धर्म व इतर सर्व धर्म हे परोपजीवी भट, पुरोहित पुजारी, भोंदू साधू-संत, बुवा, बाबा, मौला, पाद्री यांचे धर्मभोळ्या, देवभोळ्या, कष्टकरी, बहुजन अडाणी लोकांचे शोषण करून, लूट करून, कष्ट न करता बसून खाण्याचे स्थळ, ठिकाण आहे. आज जगात सर्व खाद्य, पेय पदार्थ, निवासस्थाने, कारखाने, जलस्थळे, देशाचे संरक्षण परिवहन व्यवस्था हे सर्व काही शेतकरी, कष्टकरी, जवान यांच्या कष्ट व त्यागावर अवलंबून आहे. मग देवाधर्माचे रोग, भांडणे, वाद निर्माण करण्यामागचा हेतू कोणता आहे, या बाबत सर्वांनी विचार करण्याची गरज नाही का? वस्तुत: आजपर्यंत सर्व शासनकर्ते, भट-पुरोहित पुजारी, परोपजीवी साधूसंत हे सर्व जनतेला मूर्ख बनवून जनतेच्याच कष्टावर जगत अहो. तेव्हा भारतातून देवाधर्माची हकालपट्टी करून भारतीय संविधानानुसार देशाचा कारभार चालू केल्यास भारत एकाच पंचवार्षिक योजनेत स्वावलंबी, सुखी, समृद्ध आणि विश्वगुरु बनेल, हे मी छातीठोकपणे सांगू इच्छितो. भारताचे खरे रोग, जातीवाद, धर्मवाद, देव, दैववाद, श्रेष्ठवाद, भ्रष्टाचार, भांडवलशाही, घराणेशाही, मंदिरे व पुजारेशाही आहे. हे रोग समुळ नष्ट केल्यास भारत संपूर्ण जगाचा मार्गदर्शक, गुरू ते शक्तीशाली राष्ट्र बनेल, यात कोणीही तिळमात्र शंका घेऊ नये, असे मला वाटते.
प्रथम जटाधारी, टिळाधारी, पुजारी, भ्रष्टाचारी, आळशी, लुटारू, भांडवलदार, घराणेशाही चालविणार्यांचा बंदोबस्त करण्याची खरी गरज आहे. मनु व्यवस्थेमुळेच देशातील बहुजन मोठ्या संख्येने मुस्लीम आणि इसाई झाले असून मोजके बौद्ध विचारधारा स्वीकारल्यामुळे त्याचे देशावर कोणतेही वाईट परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. कारण बौद्ध हा धर्म नसून एक जात, धर्म, वर्ण, कर्मकांड, शोषणरहित विचारधारा, तत्त्वज्ञान आहे व ही विचारधारा विश्वव्यापी विचारधारा-तत्त्वज्ञान आहे, हे टीकाकारांनी समजून घेण्याचे करावे. कारण सिद्धार्थ गौतम बुद्धांपूर्वी 27 बुद्ध होऊन गेल्याचे सांगितले जाते. या 27 बुद्धांची साखळी सिंधूकाठची मोहेंजोदडो, हडप्पा कालीन संस्कृती पर्यंत मानणे चुकीचे ठरणार नाही. आजचा संपूर्ण अस्पृश्य, शुद्र, भटका, विमुक्त, गोर बंजारासह सिंधू संस्कृतीचा निर्माता मानला जातो. तेव्हा या संपूर्ण समुहांनी हिंदू धर्माशी संबंध दाखविणे म्हणजे बहुजनवादी संस्कृतीचे अवमूल्यन करून स्वयंघाती ठरण्यासारखे होईल.
जय भारत - जय संविधान
प्रा. ग. ह. राठोड