देव दर्शन संकल्पना

देव दर्शन संकल्पना

देव दर्शन संकल्पना देव, ईश्‍वर, भगवान, परमेश्‍वर या सर्व संकल्पना केव्हा व कशा व कुठे अस्तित्वात आल्या हे निश्तिपणे मला तरी सांगता येणार नाही. पण ह्या संकल्पना आज रोजी पृथ्वीच्या पाठीवर सर्व मानव समुहात आहेत, हे मात्र निश्‍चितपणे सांगता येईल. तसेच देव हा सर्वांचा निर्माता, पालक, सुखकर्ता, दु:खहर्ता असुन त्याच्याशिवाय झाडाचं पानं सुध्दा हलत नाही, असे सर्वच मानव समुहाकडून सांगितले जाते. एवढेच नव्हे तर देव हा सर्व शक्तीमान, सर्व व्याप्त व सर्वज्ञ आहे, असे देखील ठासुन सांगितले जाते. सर्वज्ञ म्हणजे विश्‍वात काय घडत आहे हे जाणून घेणारा, सर्व व्याप्त म्हणजे सर्व स्थळी व प्रत्येक वस्तुत: अस्तित्वात असणारा व सर्व शक्तीमान म्हणजे काहीही करु शकणारा जीव म्हणजे देव होय, अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. ही धारणा वस्तुत: जे लोक मनुवादी रोगाने ग्रासलेले आहे, त्यांचीच आहे. तसेच भाकड, थोतांड ग्रंथ व शास्त्रवाद्यांचीच आहे. जे बुध्दीवादी, पुरोगामी, परिवर्तनवादी, क्रांतीकारी आहेत, ते देवाचे अस्तित्व मानीत नाही. ते निसर्गाची अंतर प्रक्रिया व कारण कार्यभाव व विज्ञानाला प्रत्येक घटनेला कारणीभूत समजतात. एवढेच नव्हे तर देवाकडे वरील कोणतेच वैशिष्ट्य नाही, असे त्यांचे म्हणने आहे. उलट ते देव ही संकल्पना परोपजीवी, कष्ट न करणार्‍या, शोषण, फसवेगीरी, आयतखावू, स्वार्थी, कपटी लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन असल्याचे सांगतात. विज्ञानवादीचे, म्हणने आहे की, पृथ्वीवर जे काही स्वयं अस्तित्वात आहे, त्यांच्या पारस्पारिक संयोग व रासायनिक प्रक्रियाने व कारणकार्यभावामुळे सर्व काही घडून येत आहे. काही विज्ञानवादी महामानवांचे म्हणने खालीलप्रमाणे आहे. 1) ‘ देव म्हणजे घेवचि नाही, सर्व काही देवचि देव’. संत तुकडोजीने सांगितले आहे की, देव म्हणजे देणाराच असतो. घेणारा नसतोच. तो त्यागी, नि:स्वार्थी, दानी असतो. मंदिरातील, चर्च, गुरुद्वारातील मूर्तीरुपी देवाप्रमाणे तो काहीच स्वीकारीत नाही. तो प्रेम, संवेदना, सहयोग, विचार व कार्याची दिशा देतो, शिकवण देतो. बुध्दी व ज्ञान देतो. मंदिर गुरुद्वारा, चर्च, विहारातील जबरदस्तीने बसविलेला निर्जीव देव काही मागत नाही, घत नाही, देत सुध्दा नाही. त्याला कोणत्याही वस्तुची, सेवेची, प्रार्थनेची, पुजेची गरजसुध्दा नसते. या देवाला दिलेल्या सर्व वस्तुंचा उपभोग तेथील स्वार्थी, परोपजीवी पुजारी, सेवक अथवा विश्‍वस्त मंडळ घेतो. वस्तुत: ही सामान्य धर्मभोळ्या लोकांची, कष्टकरी लोकांची फसवणूक, लुट व शोषण असते. पण अविचारी धर्मभोळा, देव भोळा या कपट कारस्थानाविषयी थोडासुध्दा विचार करीत नाही व आपली कष्टाची कमाई, वेळ व शक्ती ‘देव’ या निरर्थक, वांझ कल्पनेत वाया घालतो ही एक शोकांतिका आहे. जो निर्जीव देव काहीच घेत-देत नाही, त्यासाठी मोलाचे धन, वेळ व शक्ती खर्च करणे हा भयंकर मोठा मूर्खपणा आहे. संत कबीरांनी सांगितले आहे, की ‘जितनी देखी चेतना, उतने सालीगराम, बोलनहरा पूजीए, पत्थरसे क्या काम’। तात्पर्य, जेवढे चेतन (जीवंत) जीव आहेत, तेवढे सर्व देव, ईश्‍वर आहेत. या चेतन जीवाची सेवा करा, हीच खरी ईश्‍वर भक्ती आहे. निर्जीवाची सेवा निरर्थक आहे. आणखी कबीरने सांगितले आहे की, 1) पत्थर पूजेसे देव, ईश्‍वर मिले तो मै पूजू पुरा पहाड़। पहाड़ पत्थरोसे तो चक्की भली पिस खावे पुरा संसार। 2) निगुरा ब्राह्मण (देव) नहीं भला, गुरुमुख भला चमार। देवोसे तो कुत्ता भला, नीत उठ भूखे मालकके द्वार। म्हणून कवि केशवसुतानी सांगितले आहे की, ‘देव-दानवे नरे निर्मिली, हे मत लोका कळवू या’ केशवसुतानी देव व दानवाची निर्मिती लोकांनी स्वार्थासाठी केलेली आहे हे भोळ्या लोकांना कळविण्याची गरज आहे. मानव समुहाच्या प्राचीन प्राथमिक अवस्थेत देव, धर्म, जाती, मंदिर, तीर्थक्षेत्र, कर्मकांड या संकल्पना नव्हत्या. या सर्व संकल्पना स्वार्थासाठी फार अलिकडच्या आहेत. या संकल्पनांमुळेच पूर्ण जगात आज विषमता, अन्याय, अत्याचार वाढून जग विनाश अथवा विध्वंशाच्या काठावर उभे आहे. भारताचे नव्हे तर संपूर्ण जगाचे देव तारक-मारक हे लोक प्रतिनिधी आहे. लोकांनी लोक प्रतिनिधींना संरक्षण, विकास व कल्याणाचे अधिकार दिलेले आहे. देशाचे लोकांचे संरक्षण, विकास व कल्याण आज लोक प्रतिनिधीच करीत आहेत. देव कोणाचेही संरक्षण, विकास व कल्याण करीत नाही व लोकांनी सुध्दा असे अधिकार देवांना दिलेली नाही. कारण मंदिरातील सर्व देवांचे संरक्षणाा, विकास, कल्याण, सन्मान, गुणगान लोकच करतात. निर्जीव देव पुर्णपणे परावलंबी, आळशी, लुटारु आहे. तो स्वत:चेच रक्षण चोर, लुटारु पासुन करु शकत नाही. तेव्हा देवापासून संरक्षणाची, कल्याणाची, विकासाची, दु:खे दूर करण्याची, संपत्ती, संतती देण्याची, संकटात धावून येण्याची लोकांनी अपेक्षा करणे शुध्द वेडेपणा आहे. उलट देवामुळे अनेक प्रकारची संकटे आज देशात नंगानाच, गोंधळ करीत आहे. पण स्वार्थी, परोपजीवी, धंदाधारी लोक देवा धर्माचे व जातीचे राजकारण करुन देशाची माती करीत आहे. जनतेचा खरा देव एकच आहे व तो देव म्हणजे गणपती होय. हा गणपती म्हणजे ढेरपोट्या, वाकडतोंड्या, हाथीची सुंडधारी, उंदिरावर स्वार झालेला व दुर्वा खाणारा काल्पनिक ब्राह्मणी देव नव्हे. खरां देव हा गांव वाउी तांडा, शहर, नगर व देशाचा प्रमुख आहे. संघटन संस्था,उद्योग वगैरेचा प्रमुख आहे. म्हणजे गावाचा प्रमुख पाटील, उपसरपंच, तांड्याचा नायक, शहरनगर,देशप्रमुख अध्यक्ष व राष्ट्रपती, प्रधानमंत्री आहे. प्रत्येक क्षेत्रातले कामगार, अधिकारी आहे? कारण सर्वांच्या संरक्षणाची कल्याणाची, विकासाची, पालन पोषणाची सर्व जबाबदारी, अधिकार लोकांनी वरील प्रमुखाकडे दिलेली असते. हे प्रमुख देवाला केव्हारी भारी आहेत. कारण देव यांच्या मर्जीवरच मंदिरात सुरक्षित असतो. नाही तर लोक प्रतिनिधीच्या मनात आले देवाचे तेथे काही ही चालत नाही. लोक प्रतिनिधी क्षणात जेसीबीने देवाला पाताळात गाडून टाकतो. देव त्याच काही करु शकत नाही. देव कोणाच्याही मदतीला आलेला नाही व येणार नाही. येतो मदतीला फक्त माणूस व लोकप्रतिनिधी. गेल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर 2019 मध्ये देशात महापुरांनी हाहाकार माजविला. महाराष्ट्रात नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर येथे महापुरात लाखो लोक बरबाद झाले, डुबले, वाहून गेले. जनावरे वाहुन गेली. त्यांच्या बरोबर तेथील देव,देवी, मंदिर, पुजारी सर्व बुडाले, वाहून गेले, घरदारे, जनावरे नष्ट झाली. त्याना वाचविण्यासाठी 33 कोटी देवांपैकी एकही देव आला नाही. तेथे आले फक्त लोकप्रतिनिधी, नायक सरपंच, नगरप्रमुख वरीष्ठ अधिकारी वर्ग, सर्व प्रतिष्ठानचे संस्था, संघटनांचे प्रमुख देशाचे प्रमुख, आमदार,खासदार, मंत्री, राष्ट्रपती, प्रधानमंत्री वगैरे, पुजला जाणारा दागीने, कपडे, घातला जाणारा, दही,तुपानी आंघोळ घातला जाणारा, धनसंपत्ती जमा करुन तिजोरी भरुन घेणारा एकही देवी ना देव मदतीला आला नाही. मंदिरांनी, क्षेत्रांनी पैसा दिला असेल पण हा पैसा सुध्दा लोकांचा, जनतेचाच आहे. तेव्हा त्याचे श्रेय देव-देवीला देणे हा तर निव्वळ मूर्खपणा आहे. म्हणून लोकांचा खरा राजा मी गणपती मानतो. गणपती म्हणजे गणाचा, लोकांचा प्रमुख तो गणपती. गणपती म्हणजे राजा, प्रमुख. ह्या प्रमुखामध्ये उपरोक्त सर्व लोक प्रतिनिधी आले. म्हणूनच म्हणले जाते की, राजा बोले आणि दळ हाले. म्हणजे राजा, प्रमुखाच्या आदेशाने देशातील सर्व यंत्रणा तो सांगेल त्या कामाला लागते. म्हणुन कोणत्याही संस्था, संघटना, प्रतिष्ठाणचा प्रमुख हा राजा असतो. राजा हा काळाचा निर्माता असतो. राजा सांगेल किंवा आदेश देईल तेच देशात घडते. राजाच्या पुढे देव सुध्दा जात नाही. म्हणुन जगात राजा व प्रमुख हाच सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तीमान, सर्वज्ञ व सर्व व्यापक असतो. देव-देवी कधीच सर्व श्रेष्ठ, सर्व शक्तीमान, सर्वज्ञ, सर्व व्याप्त नसतात. देव, भोंदुचे उपजीविकेचे साधन असतात. म्हणून कृत्रिम देव-देवी व त्यांचे समर्थक, पुजारी, भट, पुरोहित, बुवा, महाराज त्यांचे विश्‍वस्त या सर्वांवर बहिष्कार टाकला गेला पाहिजे. श्रध्दा धर्म व भावनेच्या आधारावर लचके तोडणारे हे लांडगे आहेत. देशाचा प्रमुख राजा, संस्थान, संघटन, प्रतिष्ठान, उद्योग, व्यापार, शिक्षण, साहित्य, अर्थ, राजकारण वगैरेचे प्रमुख जर समतावादी, पुरोगामी, परिवर्तनवादी असले तर सर्व जनतेला सुख, समाधान, न्याय, शांतता मिळते. पण उपरोक्त क्षेत्रातील प्रमुख जर विषमतावादी, जाती, धर्म, देव, दैव, कर्मकांडवादी, प्रतिगामी असले तर देशात अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, व्याभिचार, निरक्षरता, बेरोजगारी, कुपोषण, अनारोग्य वाढुन अल्पसंख्यांकाची बरबादी किंवा संव्हार होतो. म्हणुन सांगितले जाते की, ज्या समुहाचा राजा असतो, त्या समुहाची, लोकांची, जातीची सर्वत्र मजा, सुख, आनंद, भोगवादी जीवन असते. व ज्या समुहाचा, जातीचा राजा व प्रमुख नसतो त्याला पशुतुल्य जीवन व गुलामीची, सजा, शिक्षा मिळते. म्हणून देशात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक समुहाचा प्रतिनिधी अथवा भागीदार असता. नसता देशात अशांतता निर्माण होऊन देशाचे तुकडे होतात. परकीय आक्रमकांची भीती वाढते किंवा शत्रु पक्षाचा संव्हार होण्याची शक्यता असते. पण राजा जर विद्वान, बुध्दीवान, समता, बंधुता, स्वातंत्र्यवादी, न्यायी आणि लायक असला तर तो आपल्या जनतेचे, देशाचे संरक्षण, विकास व कल्याण करतो. देशात सुख, समुध्दी, आनंद व शांतता नांदते. देशाची व जनतेची भरभराट होते. अशा समृध्द, शांत व एक विचाराने राहणार्‍या देशावर व जनतेवर शत्रुराष्ट्र आक्रमण करण्याची कधीही हिंमत करत नाही. देशाचे संरक्षण, पालन पोषण सर्व काही राजाच करतो. अन्न, वस्त्र, घरे, औषधी, शिक्षण, पाणी, रस्ते, वगैरे सर्व काही देशाचा राजा, लोकांचा राजा, गणाचा पती, प्रमुख गणपतीच करतो. हे काम कोणताही देव-देवी करीत नाही. देव भिकारी आहे. दान-दक्षिणा रुपात भीक घेतो. स्वत:चे संरक्षण सुध्दा देव-देवी करु शकत नाही. राजाच्या मनात आले तर जनतेच्या हितासाठी कोणत्याही देव-देवीचे मंदिर, मूर्ती तो नष्ट करु शकतो. जनतेच्या, भक्ताच्या कोणत्याही संकटात, दु:खात देव-देवी कधीच धावून येत नाही. जनतेच्या, भक्ताच्या संकटात, जनतेचा प्रमुख, राजाच धावून येतो. जनता, प्रजा, लोकचं धावून येतात. देव कधीच येत नाही. देव-देवी, पुजारी, महाराज, ब्राह्मण हे भक्तीच्या सेवेच्या निमित्ताने, नांवाने, पुण्याच्या लालसेने जनतेची लुट करतात. म्हणून देव-देवी व त्यांचे भक़्त हे सर्व जनतेचे लुटारु, शत्रु व फसविणारे असतात. म्हणून सर्व लोकांनी गरजु लोकांची सेवा व राजाच्या आदेशांचे, कायद्याचे पालन करणे हीच खरी देव भक्ती आहे. देव म्हणजे देणारा, काहीही न घेणारा म्हणजे देव होय. जनतेला जनताच देते, राजाच देतो. जनतेचा जो प्रमुख असतो, तोच देतो. म्हणुन दगडाच्या, चित्राच्या, सोन्या, चांदीच्या देवा ऐवजी जीवंत जीवाची सेवा यापेक्षा श्रेष्ठ सेवा, भक्ती दुसरी नाही. जनता व राजाच संकट, दु:ख प्रसंगी जनतेच्या मदतीसाठी धावून येतात. म्हणून जनतेने जनतेचा लायक, योग्य राजा, प्रमुख निवडुन आणायला पाहिजे. त्यांच्या कायद्याचे पालन केले पाहिजे व सर्व गरजू जनतेला सेवा, सहकार्य, प्रेम, बंधुत्वाची वागणूक देऊन करायला पाहिजे. मंदिर, तीर्थक्षेत्राचे देव-देवी हे एक थोतांड असुन ते ब्राह्मण, भट, भोंदू संत, यांचे पोट भरण्याचे साधन व आयती शेती, व्यापार, दुकानदारी, रोजगार हमी योजना आहे. म्हणुन देव-देवी मानणार्‍या भक्तांना जाहिर आवाहन आहे की त्यांनी देव-देवी तीर्थक्षेत्र, कर्मकांड या सर्वांपासून दूर राहून जनतेची सेवा व लायक, योग्य समाज प्रमुख, राजाच्या कायद्याचे पालन करुन सर्वांनी एकीने, एका विचाराने राहून सुख, समाधान, आनंद, मिळवून शांततेचे जीवन जगावे. राजा शिवाय सर्व जीवांचे खरे देव-देवी, शेती, पाळीव पशु, वेगवेगळे शोधकर्ता, डॉक्टर, सीमेचे व जनतेचे संरक्षण करणारे सैनिक, पोलीस, शेतकरी, कष्टकरी मजूर, वारा, प्रकाश, पाणी व धरतीमाता आहे. हे सर्वांनी जाणून घेण्याचे करावे, अशी सर्वांना जाहिर विनंती आहे. कारण धरतीमाता, वारा, अग्नी, पाऊस यांच्या समोर व राजाच्या अधिकार, शक्तीसमोर कोणाचेही काहीही चालत नाही. म्हणुन या जगात सर्वज्ञ, सर्व व्याप्त व सर्व शक्तीमान, सुखकर्ता, दु:ख हरता, वरील घटकांशिवाय काहीही नाही. म्हणून वरील सर्व घटकाच्या नियमांचे पालन करुन सुखी व शांतीचे जीवन प्रेमाने जगण्याचे करावे. देव दर्शनाचा, सेवेचा, भक्तीचा खरा अर्थ राजा, महापुरुषांचे, समाज सुधारकांचे, परिवर्तनवाद्यांचे विचार, कार्य व सेवेचे अनुकरण करावे. त्यांचे कार्य करावे, त्यांचे विचार घ्यावे. त्यांचा सन्मान करावा. त्यांना वंदन करावे, त्यांच्या स्मृती जागृत ठेवाव्यात आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जीवन जगावे असा आहे. त्यांची पूजा, प्रार्थना, अभिषेक, आरती, तीर्थयात्रा, यज्ञ निरर्थक आहे. जय भारत - जय जगत प्रा. ग. ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments