प्रेरणार्थ दोन शब्द

प्रेरणार्थ दोन शब्द

हैद्राबाद स्वातंत्र्य संग्राम (पळापळीचा काळ) शिर्षकाचे एक पुस्तक तरुण, तडफदार, सामाजिक बांधिलकी सांभाळणारे व समाजात मौलिक परिवर्तन घडवून समाजाला वैज्ञानिक दृष्टी देण्यासाठी सतत धडपडणारे, समाजात बदल घडवून आणण्याचे नैतिक कर्तव्य समजणारे शिक्षक सुग्रीव राठोड या नवतरुणाने उपरोक्त पुस्तक प्रकाशित केले आहे. दहाव्या वर्गात शिकत असतांना त्यांना स्वशाळेत वरील विषयावर इंग्रजीमध्ये बोलण्याची संधी गुरुजनांनी मिळवून दिल्यापासून हैद्राबाद स्वातंत्र्य संग्राम या विषयावर लिहण्याची जिज्ञासा निर्माण झाली. तेव्हापासून मी या विषयावरची माहिती घ्यायला सुरुवात केली. अनेक अडचणी समोर होत्या, तरी अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या भेटी, अनेक वृद्ध स्त्री-पुरुषांच्या भेटी, अनेक स्मारक स्थळांना भेटी देऊन त्यांनी ग्रंथातील माहिती संकलीत करून सदर पुस्तक प्रकाशित केले आहे व 10 वीत शिकत असतांना जी इच्छा मी व्यक्त केली होती, त्याची पूर्तता केल्याचे समाधान मिळविले आहे, अशी भावना त्यांनी मनोगतात व्यक्त केलेली आहे. तसे त्यांचे हे दुसरे पुस्तक असून पहिले पुस्तक त्यांनी त्यांना 2010-2020 या काळात गोर बंजारा समाजाच्या ‘गोर सिकवाडी’ या संघटनेत राहून जे अनुभव आले, या बाबत अनुभव संकलीत केले असून पुस्तकाला शिर्षकसुद्धा गोर-सिकवाडी असे दिलेले असल्याचे ते म्हणतात. सदर पुस्तकात हैद्राबाद स्वातंत्र्य संग्रामात ज्या ज्या विविध जाती समुहांनी भाग घेतलेला आहे, त्यांची नावे सुद्धा दिलेली आहे, हे विशेष आहे. या शिवाय निजाम घराण्याची माहिती देत असतांना निजामच्या रजाकार नामक निमलष्करी संघटनेची आणि संघटना प्रमुख कासम रजवी यांच्या गैर वर्तणुकीबाबत सुद्धा विस्ताराने माहिती दिली आहे. याच बरोबर जे परिवर्तनवादी राष्ट्रीय वृत्तीचे मुसलीम हे रजाकार संघटनेच्या व कासीम रजनी यांच्या विरोधात लढण्याचा प्रामाणिकपणे उल्लेख केला आहे. या शिवाय जे निष्पाप मुसलीम होते, त्यांना गाव, वाडी, तांड्यातील लोकांनी सर्वोपरी मदत आणि संरक्षण दिल्याचेही नमूद केले आहे. या शिवाय हा संग्राम हिंदु-मुसलीमांमधील नव्हता तर सरंजामशाही, हुकुमशाही, गुंडशाहीच्या विरोधात होता, हे सुद्धा लेखकाने सुस्पष्टपणे नोंदविले आहे. तांड्यातील काही वृद्ध व समजदार मंडळी संकटात असलेल्या मुसलीम बांधवांना लुटण्याचे, छळण्याचे काम कोणीही करू नका असे वारंवार सांगत असल्याचे अनुभवही सांगितले आहे. याच बरोबर अनेक अमानवी व्यवहाराच्या घटनासुद्धा लेखकाच्या वर्णनात आहेत. पुस्तकात रजाकारांनी महिलांवर केलेल्या अनेक अत्याचारी कथांची जाणीव लेखकाने करून दिलेली आहे. स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग, खर्‍या राष्ट्रवादींना दिलेली साथ व इतर अनेक परस्पर विरोधी घटनांचा तपशील पुस्तकात आहे. 1857 च्या युद्धात ज्या ज्या समुहांनी त्याग, समर्पण करून जीवनाची होळी केली अशा स्वातंत्र्य सेनानींची माहिती सुद्धा दिलेली आहे. पुस्तक एकूणच सरस, सुंदर व वाचनीय दिसून येते. अनेक स्वातंत्र्य सेनानींची नोंद नसल्याबद्दलही खंत व्यक्त करण्यात आली आहे. इतरही अनेक महत्त्वाच्या घटनांची माहिती लेखकाने दिली आहे. त्यात अनेक स्वातंत्र्य सैनिकांवर अन्याय केला गेला, या गंभीर बाबींचा सुद्धा उल्लेख आहे. स्त्रियांच्या सहभागाची व मा. सरदार पटेल, विनोबा भावे व इतर समाज सुधारकांच्या कर्तव्याची माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. गोर बंजारा तांड्यांनी केलेले प्रेरणादायी कार्य, स्वातंत्र्य सैनिकांच्या घेतलेल्या भेटी, स्मारक स्तंभांना दिलेल्या भेटी छायाचित्रांसह देऊन पुस्तक सुंदर, सरस, माहितीपूर्ण व वाचनीय बनविण्याचा लेखकाचा प्रयत्न कौतुकास्पद वाटतो. अशा अनेक माहितीपूर्ण व दर्जेदार साहित्य लिहिण्याची संधी व आयुष्य लेखकाला मिळो, अशी मी माझ्या व कुटुंबियांच्या वतीने सदिच्छा व्यक्त करून लेखकाला दीर्घायु मिळो, अशी अपेक्षाही व्यक्त करतो! प्रा. ग. ह. राठोड (अध्यक्ष) अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संघ, भारत.

G H Rathod

162 Blog posts

Comments