शिक्षित व सधन वर्गाचे कर्तव्य

अल्पसंख्य प्रस्थापित वर्ग वगळून भारतात बहुसंख्य बहुजन वर्ग हा निरक्षर, निर्धन, निराधार, बेरोजगार, अंधविश्‍वासी व रोग आणि व्यसनग्रस्त असतात.

अल्पसंख्य प्रस्थापित वर्ग वगळून भारतात बहुसंख्य बहुजन वर्ग हा निरक्षर, निर्धन, निराधार, बेरोजगार, अंधविश्‍वासी व रोग आणि व्यसनग्रस्त असतात. बहुजन समाजात उच्च शिक्षणाचे व श्रीमंतीचे प्रमाण देखील बोटावर मोजण्याइतकेच असते. जीवन जगण्याच्या विविध साधनांचा अभाव, निरक्षरता, बेकारी, व्यसनाधिनता, कर्जबाजारी, बिमारी, मार्गदर्शक व मदतगारांची कमी, शासनाचे दूर्लक्ष, शासनाशी आपल्या हक्क अधिकारासाठी लढण्याचे ज्ञान व कुवत नसणे या सर्व अडचणीमुळे बहुजन समाज भांबावलेला व दिशाहीन झालेला असतो. रात्रं-दिवस कष्ट करुनही पोट भरत नसल्यामुळे कुटुंबाचे हाल, अर्धपोटी, कुपोषणाचे, कर्जबाजारीपणाचे, आजारांचे, व्यसनाधिनतेचे जीवन यामुळे अनेक कुटुंबप्रमुखांना जीवन नकोसे होते. संततीचे शिक्षण, लग्न, आजारपणात इलाजाची लाचारी, बेरोजगारी या सर्व कारणांमुळे बहुजन समाजात अनेक शेतकरी, शेतमजुरांचे कुटुंबप्रमुख स्वयंहत्या करुन घेऊन आपली जीवनयात्रा संपवून घेत आहे. यातच, अधिकारी पोलीस वर्ग, शासनाची निष्ठुरता, सावकाराकडून शोषण, ही कारणे देखील त्यांच्या स्वयंहत्येस कारणीभूत आहेत. अशा बहुजनाच्या परिस्थिती प्रसंगी समाजातील जो काही शिक्षित आणि श्रीमंत वर्ग आहे, त्यांनी अशा शोषित वर्गाकडे सहानुभूतीने पाहुन गांजलेल्या व दिशाहीन निराधार बनलेल्या समाजाला योग्य मार्गदर्शन, सहानुभूती, कुवतीनुसार थोडी फार मदत, त्यांच्या दु:खात सहभागी व संवेदनशील बनायला पाहिजे. नोकरी, उद्योगधंदा व श्रीमंतीवाला वर्ग निश्‍चिंत जीवन जगत असतो. या वर्गाला महागाई सुध्दा गांजत नाही. ते थोडे सुखी असतात तेव्हा ते आर्थिक सहकार्य देवू शकत नसले तरी आपला थोडा वेळ देऊन शोषित वर्गात जागृती निर्माण करण्याचे व दिशा निर्देश करण्याचे कार्य ते सहज करु शकतात. ते अशा शोषितांना शासनाशी संघर्षाचे व योग्य शासन निवडून आणण्याचे व घातक रुढीपरंपरा, अंधश्रध्देपासून दूर राहण्याबाबत सुध्दा मार्गदर्शन करु शकतात, तसेच शिक्षण व मतदानाचे महत्व ते पटवून देऊ शकतात. बहुजनातील अल्प अथवा उच्च शिक्षित व श्रीमंत वर्ग वरीलप्रमाणे शोषित वर्गाला मदत करु शकतात व समाजाशी बांधिलकी आणि कर्तव्य म्हणून त्यांनी वरील कामे करायलाच हवीत. गरीब कष्टकरी व शोषित वर्ग हा कष्टाच्या माध्यमानी, व उत्पन्नाच्या निर्मितीच्या, संरक्षणाच्या माध्यमानी कष्ट न करणार्‍या वर्गाच्या गरजा पुर्ण करण्यात गुंतलेला असतो. व त्यांच्या कष्टाचा सर्वांना फायदा होतो. म्हणुन कष्टकर्‍यांची काळजी करणे सर्वांचे कर्तव्य आहे. कष्टकरी वर्गाने कष्टाच्या माध्यमांनी देश समृध्द व सुंदर बनविलेला आहे. खाद्य पेय, वस्त्रे, अलंकार व अनेक गृहउपयोगी, वस्तु निर्माण करण्यात कष्टकरी वर्गाचा सिंहाचा वाटा आहे. आज कष्ट न करणारा आणि भोग-विलासी जीवन जगणारा वर्ग हा कष्टकर्‍यांमुळेच सुखाचे, आनंदाचे जीवन जगत आहे. पण कष्टकर्‍यांच्या जीवावर जगणार्‍या परोपजीवी वर्गाचे लक्ष मात्र या कर्तव्यनिष्ठ, देशनिष्ठ, समाजनिष्ठ वर्गाकडे नाही, ही फार खेदाची व अमानवीय बाब आहे. परोपजीवी वर्गाच्या अशा स्वार्थी व बेजबाबदार वर्तनामुळे देश भिकेला लागल्याशिवाय व गुलाम बनल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अशी परिस्थिती निर्माण न होऊ देण्याची सर्वात मोठी जबाबदारी शिक्षित वर्ग, नोकर, व्यापारी उद्योगपती आणि श्रीमंत वर्गाची खरी जबाबदारी आहे. देशात विषमता निर्माण होऊन अनागोंदीचे राजकारण व कारभार सुरु होणार नाही व सामान्य आणि कष्टकरी वर्गावर अन्याय अत्याचार वाढणार नाही याची काळजी शिक्षित सक्षम, सधन वर्गांनी घेण्याची व देश सुखी समृध्द, शांततामय बनविण्याची जबाबदारी याच वर्गावर आहे. म्हणुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे की, ज्या समाजात अथवा देशात डॉक्टर, इंजिनियर व वकीला सारखा शिक्षित-सधन वर्ग तयार झालेला आहे, त्या समाजाकडे, देशाकडे शत्रु वाकड्या नजरेने कधीही पाहणार नाही. वरील वर्गांनी जागृत राहून अविकसित वर्ग अथवा समुहाला बरोबरीला घेण्याचे महान कार्य करावे. भाकड जनावराप्रमाणे वरील वर्ग देशाला व समाजाला ओझे बनून आणि घातक बनून राहू नये. आपल्या कमाईचा 10-15 टक्के भाग त्यांनी आपल्या समाज व देशहितासाठी, जागृती, प्रबोधनासाठी, विकासासाठी खर्च करणे अनिवार्य समजावे व खर्च करावा अशी अपेक्षा आहे. संत कबीरांनी सांगितले आहे की, बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड खजूर। पंछी, पंथीको छाया नही, फल भी लगे अति दुर। किसी पेड, वृक्षकी उपयोगीता छाव और फल देने मेहीं है। छाव और फल ना देनेमें नहीं है। याच तत्वानुसार शिक्षित-सधन वर्गाचा समाज व देशाला उपयोग होत नसेल तर असा शिक्षित-सधन वर्ग वांझ व भाकड जनावरासारखा समाज व देशाला भार आहे. वांझ व भाकड जनावरे ज्याप्रमाणे बाजारात विकली जातात, याचप्रमाणे निष्क्रीय-सधन वर्ग सुध्दा बहिष्कार टाकण्यासारखा आहे. वस्तुत: शिक्षित सधनाची उपयोगीता समाज व देशसेवा करण्यातच आहे, याची जाणीव या वर्गाला व्हावी अथवा यांना करुन द्यावी अशी विचारवंताकडून, शासनाकडून अपेक्षा आहे. वर्तमानकाळ हा शिक्षित-सधन वर्गाचा अतिशय स्वार्थाचा काळ दिसून येत आहे. कारण शिक्षित नोकर वर्ग, व्यापारी वर्ग, उद्योगपती वर्ग एवढेच नव्हे तर सत्ताधारी वर्ग सुध्दा सामान्य वर्ग व देशाच्या हिताचा विचार न करता अमर्याद भ्रष्टाचार करुन धन संग्रह करण्यात व भोगवादी जीवन जगण्यात गुंतलेला आहे. या वर्गांनी गडगंज संपत्ती विदेशात नेऊन दडविलेली आहे. निधनानंतर संतती या संपत्तीचा सदुपयोग करेल की नाही, व दुसर्‍याला उपयोगी ठरेल की नाही हे निश्‍चितपणे माहित नसतांना हा संग्रह कशासाठी हवा. यापेक्षा त्यांनी अशा संपत्तीचा उपयोग देश व समाजहितासाठी केला तर त्यांचा इतिहास बनेल व त्यांची किर्ती सुध्दा होईल. पण संकुचित स्वार्थी, भ्रष्ट शिक्षित सधन वर्गांच्या डोक्यात हे कल्याणकारी, सर्जनशील विचार येईल तो सोन्याचा दिवस देशासाठी ठरेल असे मला वाटते. कवि रहिमने एक रहस्यपूर्ण काव्याची रचना केलेली आहे, तीे याप्रमाणे आहे, तरुवर फल खात नहीं, सरोवर ना पिवे पाणी। कहे रहिम, पर काजहित संपत्ती संचही गुलामी। ज्याप्रमाणे वृक्ष फळे स्वयं खात नाही व समुद्र सुध्दा स्वत: पाणी पित नाही. वृक्ष फळे दुसर्‍यांना खाऊ देण्यात, व समुद्र आपले पाणी दुसर्‍यांना पिऊ देण्यात धन्यता मानतात, याचप्रमाणे जी सज्जन, समजदार, विचारवंत, त्यागी, नि:स्वार्थी, समाज व देशप्रेमी माणसे असतात. ती सामान्य असो, शिक्षित सधन, व्यापारी, उद्योगपती, समाज सेवक, मंत्री असो, ही सर्व समाज व देशप्रेमी माणसे अतिरिक्त संपत्ती समाज व देशहितार्थ खर्च करतात. अशी माणसे खरोखर देशाची व समाजाची खरी व मौल्यवान संपत्ती असते. अशा सज्जन, नि:स्वार्थी, त्यागी महापुरुषाचे, महामानवाचे युग युग, किर्ती टिकून राहते व लोक त्यांच्या गुणाचे गायन व घोषणा करीत राहतात. असे महामानव बहुजनामध्ये, कष्टकरी समाजामध्ये आजपर्यंत लाखो होऊन गेले आहेत. त्यांचा इतिहास आठवला तर समाजाला उर्जा मिळते. प्रस्थापित, कष्ट न करणार्‍या परोपजीवी, स्वार्थी, भ्रष्ट, शोषक, लुटारु, जातीवादी, धर्म, देव, दैव व कर्मकांडवादी वर्गामध्ये अशी महान विभुती दुर्मिळपणेच मिळते. अशा परोपजीवी वर्गामुळेच देशात विषमता, अज्ञान, अंधश्रध्देचा प्रसार होऊन देशाची शांतता व अखंडता धोक्यात येते. आज प्रस्थापिताच्या स्वार्थीपणामुळे चोहोकडून संविधान,आरक्षणावर हल्ले, वंचितांवर अन्याय, अत्याचार, जातीवाद, धर्मवाद, भ्रष्टाचार, विषमता पसरलेली असल्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला असून हुकुमशाहीमुळे बहुजनांना पुन्हा गुलामीचे दिवस येतात की काय, अशी दहशत निर्माण झालेली आहे. बहुजन समाज हा प्राचीन समाज आहे. प्राचीन काळी जाती, देव, धर्म, मूर्तीपुजा, मंदिर, तीर्थक्षेत्र दर्शन वगैरे संकल्पना नव्हत्या. जाती, देव, धर्म, मूर्तीपुजा, तीर्थक्षेत्राचे रोग आर्य ब्राह्मणाच्या आगमनानंतर व शंकराचार्याच्या काळापासून वाढलेले आहे. वस्तुत: जाती, देवी, देवता, मंदिर, तीर्थक्षेत्र व यांच्याशी संबंधित सर्व धार्मिक कर्मकांड हे ब्राह्मण, भगत, भोपे, भट, पुरोहित, भोंदू, परोपजीवी साधूसंत यांचा कष्ट न करता बसून खाण्याचा धंदा, व्यापार, दुकानदारी, रोजगार हमी योजना व घरेलु बँक आहे. हे सर्व कर्मकांड पारध्याच्या जाळीप्रमाणे, देव धर्मभोळ्या, अंधश्रध्द लोकांना लुटून बसून खाण्याचे ब्राह्मण व आळशी भोंदू संतांचे शेती क्षेत्र आहे. शेतकर्‍यांना शेतीत कष्ट करावे लागते. पण मंदिर, तीर्थक्षेत्र, व कर्मकांड करणार्‍यांना चमत्कार दर्शविणार्‍या, फसविणार्‍यांना, पुण्य, स्वर्ग, मोक्षप्राप्ती होते सांगणार्‍यांना कष्ट न करता भोगमय जीवन जगता येते. देव, धर्म, कर्मकांड हे शोषणाचे, फसवणूकीचे क्षेत्र आहे. पण बहुसंख्य लोकांना या रोगाची लागन झालेली आहे. यात शिक्षित व धनवान अविचारी लोकांचा खुप मोठा भरणा आहे. कारण शिक्षित, नोकरीवाले, उद्योगधंदा, व्यापार, सावकारी, भ्रष्टाचार, व्याभिचार, लबाडी करणारे हेच लोक मोठ्या प्रमाणात असतात. यांना आपण पाप केल्याची भीती असते व हे पाप देव-देव, धार्मिक, कर्मकांड, दानदक्षिणा, समर्थन व मदत करणे हे पाप कर्म आहे. पण परोेपजीवी ब्राह्मण वर्गामुळे आपल्या देशात उलटी गंगा व फसवणुकीचे, शोषणाचे काम चालू आहे. खरी ईश्‍वर (सत्याची सेवा,भक्ती) आपल्या बहुजन साधुसंतांनी आपणास सांगितलेली आहे. पण बहुजन समाज ब्राह्मण वर्गाचे समर्थन करुन व ऐकून खोटे कर्म करुन स्वयंघात करुन घेत आहे. संत तुकोबांनी सांगितले आहे की, ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तोवि जाणावा’। मतितार्थ असा की, मंदिरातील मूर्तीची पुजा प्रार्थना करण्यापेक्षा समाजात, देशात जे रंजले, गांजलेले, दु:खी, कष्टी आहेत; त्याच्यासाठी जे करता येणे शक्य आहे ते करा. परोपजीवीसाठी नव्हे. पुढे आणखी संत तुकोबांनी स्वअनुभवातून सांगितले आहे की, ‘देव पहावयासी गेलो अन देव होऊनी गेलो’। मी देवाला शोधायला खुप खुप हिंडलो, फिरलो पण देव काही भेटला नाही. भजन, किर्तनामुळे लोक मलाच देव मानायला लागले. आणखी त्यांचे अनुभव ते सांगतात की, ‘देव शोधता शोधता, शिनले माझे मन, आणि जेथे जाय तेथे पुजापाषाण’,भावा, बहिनींनो, देवाचा शोध घेता, घेता मी थकून गेलो. देव मला काही सापडले, भेटले नाही, पण जेथे देव मानून लोक दगडाचीच पुजा, प्रार्थना करीत होते. सारांश असा की, संत तुकोबाजींना देवळातला, मंदिरातील, तीर्थक्षेत्रातील दगडाचा देव मान्य नव्हता. म्हणून ते म्हणतात की, ‘देह हे देवाचे देऊळ, देवळाचा देव मेला, अंतरीचा जागवारे’। ‘जीव अवघे देव, वृथा नागवी संदेह’, मनुष्य देह हाच खरा देव म्हणजे देणारा आहे. म्हणून देवळातल्या मृतदेवाला मानु नका, अंतकरणातील देव म्हणजे प्रेम, आपुलकीचा भाव जागवा. म्हणून ते म्हणतात की, ‘जे जे देखीजे भूत (जीव) ते ते मानीजे भगवंत’, जीवालाच देव माना व त्याचीच भक्ती सेवा करा. मंदिर, तिर्थक्षेत्रातील देव सर्व मृत, निरर्थक, थोतांड व भटब्राह्मणांचे व भगवेधारी, जटाधारीचे पोट भरण्याचे साधन आहेत. संत गाडगेबाबांनी सुध्दा उपदेश केलेला आहे की, भावा, बहिनीनो, । खरा देव ओळखा आणि त्याची सेवा करा। बापहो, देव तीर्थात किंवा दगडाच्या, लाकडाच्या, धातुच्या, चित्राच्या मूर्तीत नाही. तो तुमच्या समोर दरिद्री नारायणाच्या रुपात उभा आहे. त्याचीच प्रेमाने सेवा करा. भुकेलेल्यांना जेवण, तहानलेल्यांना पाणी, उघड्या-नागड्यांना वस्त्र, गरीब मुला मुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, अंध, अपंग, रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशुपक्ष्यांना अभयदान, गरीब तरुण व तरुणीचे लग्न, दु:खी निराशांना हिंमत, हाच आजचा रोकडा धर्म, सेवा, भक्ती व देवपुजा आहे. निरक्षर गाडगेबाबांनी आजच्या सुशिक्षित, धनवान, परोपजीवी, भोंदू, चमत्कारी, फसव्या, स्वार्थी लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले असून त्याच्या मानवतावादी बुध्दीला एक नव्हे कोटी पी.एच.डी. धारक सुध्दा बरोबरी करु शकणार नाही. आज देशात, शेतकरी, मजुर, बेरोजगार, निरक्षर, कुपोषित, बिमार, बेघर, उघडेनागडे, गरीब तरुण तरुणींच्या, अंध, अपंग, भिकारी, अनाथाच्या, पशुपक्ष्याच्या, पर्यावरणाच्या, माताभगिनीच्या, वृध्दांच्या, सैन्यदलाच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या, प्रकाश, पाणी, रस्ते, आरोग्य स्वच्छताच्या शेकडो समस्या व अडचणी आहेत. शिक्षण क्षेत्राच्या अधुर्‍या इमारती, शेतकर्‍यांच्या बियाणे, खते, औषधी, अवजारे, शेतरस्ते, शेतमालाला पुरेसे पाणी, विज, पशुचारा, गोदामे, शीतगृहे, बाजारपेठा, अशा अनेकानेक समस्या आहेत. दगड, धातु, का काष्ट चित्राच्या निर्जीव, निरर्थक, मंदिर, मठ, तिर्थक्षेत्र व कर्मकांडात व वांझ, परोपजीवी भट-पुरोहित व कामिक, गांजाकस संतासाठी आपले कष्टाचे धन, वेळ, बळ खर्ची घालणे यासारखा अविचारीपणा देश व समाजद्रोह दुसरा कोणताही नाही. जाती, धर्म, देवी-देवता, मंदिर-क्षेत्रे, कर्मकांडावर होणारा सर्व खर्चाला फाटा देऊन वरील समाजोपयोगी कामे करण्यात आली तर भारतात पुन्हा सोने चांदी, हिरे मोतीचे साठे तयार होण्यास व दही, दूध, तुपाच्या नद्या वाहण्यास व देशाच्या सर्व समस्या दूर होण्यास वेळ लागणार नाही हे निश्‍चित आहे. देशातील सर्व तरुण तरुणी, सुशिक्षित, उच्चशिक्षित, नोकरवर्ग, सधनवर्ग, व्यापारी उद्योगपती, सत्ताधारी सर्वांनी वरील बाबींवर चिंतन मंथन करुन धार्मिक क्षेत्रावर वेळ, पैसा व बळ खर्च न करता देशाच्या वास्तव समस्या सोडविण्याची सर्वांनी प्रतिज्ञा करावी व अंमलबजावणीस सुरुवात करावी. एवढेच सर्वांना नम्र व कळकळीचे आवाहन आहे. अधिक चिंतनासाठी माझे संपुर्ण साहित्य वाचावे अशी अपेक्षा आहे. जयभारत जयसंविधान प्रा.ग.ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments