कालवश के.ओ. गिर्‍हे

कालवश के.ओ. गिर्‍हे

परिवर्तनवादी चळवळीचा एक निष्ठावान कार्यकर्ता-प्रा.ग.ह.राठोड दिनांक 13 जून 2020 रोजी रात्री के.ओ. गिर्‍हे कोणतेही आजारग्रस्त नसतांना अनपेक्षितपणे निद्रेत असतांना अचानक सर्वांना साडून गेले. कोरोना आजाराच्या बंधनामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला सुध्दा मला जाता आले नाही, ही मनाला लागलेली हळहळ मी विसरलेलो नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्या दु:खी कुटुंबियांचा सुध्दा सांत्वन करायला सुध्दा काही अपरिहार्य कारणामुळे मला उद्यापही जाता आलेले नाही, यांचेही वाईट वाटत आहे. कालवश गिर्‍हे के.ओ. हे एक भटक्या समाजाचे उच्च शिक्षित सदस्य होते. ते भटक्या समुहाचे इतिहास लेखक, विचारवंत व साहित्यिक होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब सुध्दा उच्च शिक्षित व समाज सुधारक आहे. भटक्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व जागृतीसाठी, चळवळ, आंदोलन निवेदन देने या कार्यात आपल्या काही जवळच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी आपले आयुष्य घालवले. त्यांनी चारपाच ग्रंथांचे लेखन सुध्दा केलेले आहे. पैकी ‘भटका’ नावांचा त्यांचा ग्रंथ गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सुध्दा असल्याचे बोलता बोलता त्यांनी मला सांगितले होते. वस्तुत: गिर्‍हे व माझा संबंध केवळ चारपाच वर्षाचाच आहे. पाच वर्षापूर्वी मला त्यांचे नावही माहीत नव्हते व ओळखही नव्हती. भटक्या समुहात जागृती निर्माण व्हावी व त्यांच्या काही समस्या सोडविता याव्यात म्हणून ते भटक़्यांचे भावविश्‍व नावाचे मासिक चालवित होते. त्यांनी माझ्या लिखित काही पुस्तक वाचल्या होत्या. मी या मासिकाचे सदस्य व्हावे व काही सहकार्य आणि या मासिकाला नेहमीप्रमाणे लेख द्यावे, या उद्देशांनी मला फोन करुन ते अचानक माझ्या घरी शिवाजीनगरला त्यांचे परम व दीर्घकालीन स्नेही टी.एस. चव्हाण यांच्यासह पोहोचले. ते दोघेही व मी एकाच फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेेचे असल्याचे कळल्यानंतर आमचा संपर्क वाढत गेला व महामानवाच्या जन्म व स्मृतिदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत राहिल्याने संबंध वाढले व काही दिवसात आम्ही एकाच घराचे सदस्य आहोत या भावनेने भेटीगाठी होत राहिल्या. भटक्यांचे भावविश्‍व हा अंक देण्यासाठी ते घरी आल्यावर आम्ही सामाजिक जागृती व समस्यांवर घंटो चर्चा करीत होतो. असे आमचे संबंध असले तरी त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांची व माझी ओळख झालेली नव्हती. ते माझ्या घरी येत राहिल्यामुुळे ते माझ्या सर्व कुटुंबियाना ओळखत होते. गिर्‍हे पत्नी भगिनी श्रीमती जनाबाई गिर्‍हे यांची एकदोन कार्यक्रमात स्टेजवर भेट व ओळख झाली होती पण भगीनीसी बोलणे झालेले नव्हते. त्यासुध्दा नामवंत लेखिका आहेत व त्यांचे सुध्दा लिखित साहित्य असल्याचे माहित होते. त्यांच्या घरात नाते संबंधाबाबत किरकोळ वाद चालू असून माझ्या सहकाराची त्यांनी अपेक्षा केली होती. मात्र नंतर तो वाद मिटण्याच्या मार्गावर असल्याचे सांगून आनंद व्यक्त केला होता. मला त्यांच्या घरी सर्वांच्या परिचयास्तव एकदा तरी या म्हणून 2-3 वेळा आग्रह केला होता. परंतु माझ्या कार्य व्यस्ततेमुळे मला जाता आले नाही. त्यांची आठ दिवसात कार्यक्रमात कुठ तरी भेट होतच होती. भावविश्‍व हे मासिक बंद नाही पडू द्यायच, या उद्देशाने ते हक्काने माझ्याकडून प्रतिमहिना 500 रुपये घेत व आपला लेख अवश्य पाठवा, आपले लेख वाचकांना खूप आवडतात असे हसत हसत ते बोलत असत. कोरोनामुळे आठवडी सामाजिक कार्यक्रम आमचे बंद पडले होते भेटीगाठी सुध्दा बंद झाल्या होत्या. पण कोरानावरील बंदी उठताच आपण सर्व कार्यकर्ते पुन्हा एकत्र येवू व जनजागृतीची मोहिम गतीने चालवू, असे त्यांचे फोन आधे-मधे येत होते. कोरानामुळे झालेली जमावबंदी उठण्याची प्रतिक्षा करीत असतांनाच अचानक सकाळी सहकार्यकर्ता आयु. अंबादास रगडे कडून गिर्‍हे सरांच्या धक्कादायक निधनाची दु:खद बातमी मिळाली. नंतर सकहारी टी.एस. चव्हाण, लोकमतचे वार्ताहर सन्माननीय स.सो. खंडाळकर यांच्याशी संपर्क करुन मी माझ्या वेदना प्रगट करुन दु:ख हलके करण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी परिवर्तनवादी चळवळीचा एक मोहरा गळाल्याचे मनस्वी दु:ख प्रगट केले. त्यांना शेवटच्या निरोप देण्यासाठी कोण कोण गेले होते हे मला माहित नाही. पण लॉकडाऊनमुळे व इतर काही व्यवहारीक अडचणीमुळे मी जाऊ शकलो नाही, याबद्दल मला अत्यंत दु:ख पश्‍चाताप वाटत आहे. निसर्ग अशा भटक़्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व जागृतीसाठी अथक प्रयत्नशील राहणार्‍या प्रमाणिक व निष्ठावान योध्याला चीर शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबियाला गिर्‍हे सरांचा दु:ख व वेदना सहन करण्याची शक्ती देवो, अशी निसर्गचरणी अपेक्षा व्यक्त करुन माझ्या सर्व कुटुंबियाकडून विनम्र आदरांजली वाहूून वेदनांचे शब्द थांबवतो. सहकारी निधनांच्या दु:खाने दु:खी प्रा.ग.ह.राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments