दि. 30/11/2022
दोगले, स्वाभिमानशून्य, कृतघ्न बहुजन.
भारतीय बहुजन समाजाला आज ज्या लोकतंत्रीय सुखसोयी मिळाल्या आहेत, त्या केवळ ब्रिटिशांमुळे आणि भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक कष्ट आणि त्याग, समर्पणामुळे मिळालेल्या आहेत. ब्रिटीश भारतात आले नसते तर डॉ. बाबासाहेब घटनेचे शिल्पकार बनले नसते आणि भारतात डॉ. आंबेडकर लिखीत घटनेचा अमलसुद्धा नसता. भारतात मनुस्मृतीचा कायदा असता व मनुवादी व्यतिरिक्त सर्व बहुजन मनुवादीचे गुलाम, दास, वेठबिगार असते. एवढेच नव्हे तर, मनुवाद्यांनी कृष्णासमान सर्व बहुजन माता-भगिनी, लेकींशी डोळ्यासमोर स्वैराचार केला असता. सर्व बहुजन अधिकारविहीन असते आणि सर्वांचे जीवन पशुसमान असते. वर्तमान काळात काही कृतघ्न, दोगले, स्वाभिमानशुन्य बहुजन डॉ. आंबेडकर लिखीत घटनेच्या आधारावर जगत असून मनुवाद्यांचे समर्थन आणि त्यांच्या संस्कृती, सभ्यता, साहित्य व निरर्थक, शोषक, धर्म व धार्मिक कर्मकांडांचे समर्थन करून निर्लज्जपणे स्वाभिमानशून्य, अस्मिताशून्य, पौरुष्यहीन जीवन जगत आहे. सिंधूकालीन बहुजनांचा वैज्ञानिक, जात, धर्म, देव-दैवमुक्त पुरुषार्थी- इतिहास विसरून निर्लज्जपणे भेकडपणाचे जीवन जगून स्वधन्य समजत आहे. वस्तुत: हा वैज्ञानिक दृष्टीच्या बहादुर, स्वाभिमानी, स्वावलंबी बहुजन सभ्यतेचा महा अपमान आहे. पण हिंदू (ब्राह्मण)च्या गुलामीविषयी बहुजनांना वाईट वाटत नाही.
जे खरे सिद्धार्थ गौतमाचे, चार्वाक, बळीराजा, बसवराज, कबीर, रविदास, नानक, पेरीयार, नारायणगुरु, संत नामदेव, तुकाराम, छ. शिवाजी, सयाजीराव, म. फुले, शाहू, आंबेडकर, कांशीराम, साठे, सेवालाल, तुकडोजी, गाडगेबाबा यांचे अनुयायी आहेत, ते डॉ. आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञा मानतात व हिंदुत्व, ब्राह्मणत्व, पुरोहितत्व, ढोंगी, परोपजीवी, संतत्व, महंतत्व, मंदिर, मूर्ती, तीर्थक्षेत्रांपासून दूर राहतात. पण काही कृतघ्न लोक वरील महापुरुषांचे समर्थन व जयजयकार करतात परंतु निर्बुद्धपणे, अविचारीपणाने हिंदुत्वाचे देखील समर्थन करतात व परोपजीवी भटाचे, ढोंगी संतांचे, महंताचे चरण चाटतात व त्यांना सहकार्य देऊन निरर्थक कर्मकांडांना प्रोत्साहन देतात. काही लोक मुस्लीम, इसाई, पाद्री, जैन, सीख व बौद्धांचे द्वेष करतात. पण ते हे समजून घेत नाही की वरील धर्मीय त्यांचे शोषण करीत नाही. बहुजनांचे शोषण फक्त हिंदुत्वापासून, मनुवादीकडूनच होते. म्हणून शोषितांनी हिंदुत्वाचा त्याग करणे आवश्यक आहे.
एक बहुजन हितचिंतक
प्राध्यापक ग . ह . राठोड