दि. 10/07/2017
भारतीय मुलनिवासी, गोर बंजारा सिंधू नदी काठची सभ्यता नष्ट झाल्यापासून सन 1947 पर्यंत अंदाजे सव्वाचार हजार वर्षे प्रस्थापित व जातीवादीचा दुर्व्यवहार, अन्याय, अत्याचारामुळे डोंगर माथ्यावर, माळमाथ्यावर, डोंगर पर्वताच्या कुशीत व हिंस्त्र पशुंच्या जंगलात जगला. जंगलातील साधन संपत्ती म्हणजे फळे, कंदमुळे, गोंद, मव्हाच्या झाडाची फुले, पळसाच्या व तेंदुच्या पानाची पत्रावळी, बिड्या, द्रोण, गवत, लाकडाच्या मोळ्या, शिकार केलेल्या पशुंची दाते, नखे, हाडे, कातडी, मांस, पाळीव पशु इ. यांच्याच आधारावर तो हलाखीचे, निरक्षरतेचे, बेकारीचे, अनारोग्याचे, उपासमारीचे, उघडेनागडे, बेघर, अपमानाचे जीवन तो जगला. गाव व शहराची संस्कृती, सभ्यता, समाजकारण, धर्मकारण, राजकारण, अर्थकारण या सर्वांपासून तो वंचित होता. तो या संपूर्ण दीर्घकाळात त्या सव्वाचार हजार वर्षांच्या काळात प्रस्थापित जाती व शासक वर्गांचा गुलाम व गुन्हेगार जनसमूह समजला जात होता. प्रस्थापित वर्ग, ब्राह्मण, बनिया, मराठा, पाटील, शीख, सिंधी, पारसी वगैरे जातीसमुहांकडे हजारो एकर जमिनी, माड्या, हवेल्या, बैल बारदाना, नोकरचाकर, अनेक रखैल बायका, गाडी-घोडे, सत्ता, संपत्ती व सुख त्यांच्या पायात लोळण घेत होते. पण या प्रदीर्घ काळात या प्रस्थापित वर्गांनी लाचार, निराधार, असंघटित, असुरक्षित, निरक्षर, बेकार, गोर बंजारा समाजासाठी कवडीचेही काम केले नाही. उलट त्याच्या लाचारीचा फायदा घेऊन त्याचा वापर तर केलाच पण जातीवाचक शब्द, लंभाडे, जंगली, याडी, लभान तांडा, बैल बांडा अशा अनेक संबोधतांनी अपमान सुद्धा केला. आजही वरील प्रस्थापित वर्गांची अशीच वृत्ती व वागणूक आहे, अशा या उपेक्षित समाजात ब्रिटीश शासनाच्या सोयी-सवलती व सहानुभूतिमुळे महाराष्ट्राचे कालवश मुख्यमंत्री मा. वसंतरावजी नाईक़ यांचे उच्च शिक्षण झाले. त्यांची बुद्धिमत्ता, आकर्षक व भारदस्त व्यक्तिमत्व, समाज व राजकारणातील सहभाग, माणसे जोडण्याची, सांभाळण्याची कला, पक्षपात निरपेक्ष स्वभाव, कामाची तडफ, समाज व देशाविषयी त्यांची निष्ठा, सर्वांशी प्रेमाचा व्यवहार या सर्व सद्गुणांमुळे त्यांचे आंतरजातीय लग्नही ठरले व राजकारणातही प्रवेश मिळाला. कोळशाच्या खाणीतून हिरा सापडावा या प्रमाणेच हजारो वर्षांपासून दुर्लक्षित, तिरस्कृत, दरिद्री व निरक्षर समाजात वसंतरावजी नाईक नावाचा अमोर हिरा निपजला. तिरस्कृत जनसमुहामुळे त्यांना राजकारणात प्रस्थापितांनी प्रवेश दिला नसता. पण भारतीय लोकशाहीमध्ये 1947 नंतर बहुमताचे राजकारण सुरू झाल्यामुळे बहुसंख्येने असलेल्या या तिरस्कृत, दूर्लक्षित समाजातील चमकत्या व बहुमूल्य मा. वसंतरावजी नाईक या हिर्याची किंमत प्रस्थापितांना मोजावी लागली. नाईक साहेबामुळे गोर बंजारा समाज त्या काळातील शासक वर्गांकडे वळला व आजही समाजाचे बहुसंख्य मतदार हे नाईक साहेब ज्या पक्षात कार्यरत होते, त्याच पक्षाशी एकनिष्ठ आहेत. गोर बंजारा मतदारांची मोठी संख्या नसती तर कदाचित नाईक साहेबांना राजकारणात संधी मिळण्याची शक्यता कमी होती, असे माझे मत आहे. काहीही असो, नाईक साहेबांना राजकारणात घेऊन प्रस्थापितांनी स्वार्थासाठी त्यांचा खूप खूप वापर करून घेतला. पण वसंतरावजी नाईक हे जातीवादी मुख्यमंत्री नव्हते. ते सर्व जाती-जमातींना समान वागणूक देणारे व राज्याचे, देशाचे सच्चे कर्तव्यनिष्ठ मुख्यमंत्री व भक्त, सेवक होते. म्हणून त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदी काळात महाराष्ट्र राज्याची ‘न भूतो न भविष्यति’ अशी सर्व क्षेत्रांतील सर्वांगीण प्रगती घडवून आणली. त्यांच्या या अतुलनीय कामामुळे संपूर्ण भारतवासियांनी त्यांची मनापासून स्तुती आणि प्रशंसा केली आहे. एवढे महान कार्य नाईक साहेबांनी करूनही वर्तमान काळातील शासक वर्ग मात्र त्यांच्या समाजाशी जातीपातीचे ओंगळ राजकारण करीत आहे. एवढेच नव्हे तर, प्रत्यक्ष नाईक साहेबांशी देखील गद्दारीचे राजकारण चालू आहे. घोषणा करुनही परभणी विद्यापीठाला नाईक साहेबांचे नाव अद्याप मिळालेले नाही. मुंबईला त्यांच्या स्मारकासाठी दिलेली निम्मी जागा हडप करण्यात आली आहे. वसंतराव नाईक महामंडळाला देखील पुरेशी निधी दिलेली नाही. त्यांच्या स्मरणार्थ शासनाने कोणतेही मोठे काम केले नाही. त्यांना विसर पाडण्याचे षडयंत्र चालू आहेत. समाजाची अद्याप जनगणना नाही. आरक्षण, बढती, शिष्यवृत्ती बंद करण्याचे कारस्थान चालू आहे. बोगस प्रमाणपत्र व प्रगत वर्ग गटाचे प्रमाणपत्राची अट घालून समाजाची प्रगतली रोखण्याचे प्रयत्न चालू आहे. संख्येच्या प्रमाणात समाजाला प्रतिनिधित्व नाही. तांडा विकास निधीची सुद्धा योजना अंमलात नाही. तांड्याला महसुलीचा दर्जा देण्याचे टाळाटाळीचे खेळ खेळले जात आहे. गोर बंजारा समाजाच्या मुला-मुलींसाठी कुठेही वसतिगृह नाही. नाईक साहेब 11-12 वर्षे मुख्यमंत्री होते. आणखी काय हवे, असे खोचक बोल बोलून दाखविले जातात. नाईक साहेबांनी बंजारा समाजाला देशात कुठेही अभियांत्रिकी, पॉलिटेक्नीक, वैद्यकीय, महाविद्यालय दिलेले नाही. साखर कारखाने, सुतगिरण्या, फेडरेशन, बँका, प्रशिक्षण केंद्र दिलेले नाही. आश्रम शाळा व 2-4 महाविद्यालयांशिवाय नाईक साहेबांनी समाजाला काय दिलेले आहे? नाईक साहेबांकडून सर्वाधिक फायदा जातीवादी व प्रस्थापितांनी दबावतंत्र निर्माण करून घेतला आहे. सर्व शाखेच्या शिक्षणसंस्था, कारखाने, उद्योगधंदे वगैरे सर्वकाही नाईक साहेबांच्या काळातच प्रस्थापितांनी घेतलेले आहे, हे आज कोणालाही नाकारता येणार नाही. शेती, तळे, सिंचन, महाविद्यालय, विद्यापीठ, कारखाने, मोठ मोठे धरणे, रस्ते, विजपुरवठा, संकरीत बियाणे, खते, औषधी, दुग्ध व्यवसाय, हरितक्रांती, पशुपालन, दवाखाने वगैरे सर्व नाईकसाहेबांच्याच काळात झालेले आहे व सर्व योजनांचा फायदा शासक व प्रस्थापित वर्गांनीच घेतलेला आहे. बंजारा समाज हा त्या काळात निरक्षर समाज होता. सरकार आपल्याला काय देऊ शकतो व आपण काय घ्यावे याचे ज्ञानच समाजाला नव्हते. यामुळे समाजाचा माणूस मुख्यमंत्री होऊनही त्यांना काहीही पदरात पाडून घेता आले नाही. प्रस्थापित व जातीवाद्यांनी मात्र ज्याची त्यांना गरज नव्हती तेही नाईकसाहेबांकडून मिळवून घेतले. नाईक साहेब जातीवादी नव्हतेच, म्हणून जे जे लोक त्यांच्याकडे मागायला आले, त्यांना त्यांनी हवे ते देऊन सर्वांना खूष केले. आजचे मंत्री, मुख्यमंत्री व अधिकारी मात्र तोंड पाहून कामे करतात.
वस्तुत: नाईक साहेब एक जाती-धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्व होते. म्हणून त्यांच्या काळात, नोकर, शेतकरी, शेतमजूर, मागासवर्गीय वगैरे सर्वांची नि:पक्षपातीपणाने प्रगती झाली. सर्व श्रेष्ठ, कनिष्ठ व गरीब-श्रीमंतांना त्यांनी भेदभावाची वागणूक दिली नाही. कारण सर्वांच्या ठायी त्यांची मातृ-पितृत्वाची भावना होती. खरोखर ते देव म्हणण्यालायक होेते. त्यांची गुणवत्ता, कार्यक्षमता, समता, देश प्रेम आज दुर्मीळ आहे. आज चोहोंकडे घोटाळे, भ्रष्टाचार, बेकारी, जातीवाद, महागाई, निर्लज्जपणा, दहशतवाद,असुरक्षितता, दुष्काळाचे तांडव नृत्य दिसून येत आहे. पण शासन काहीच घडत नसल्यासारखे वागत आहे. जनता मात्र हैराण आहे. कालवश वसंतरावजी नाईक यांच्या काळात दोन परकीय आक्रमणे झाली. महापुर, वादळ, दुष्काळ, सीमावाद अशा अनेक घटना घडल्या पण नाईक साहेबांनी सर्व संकटांना समर्थपणे तोंड देऊन जनक्षोभ वाढू दिला नाही. 1972 च्या महाभयंकर दुष्काळात अन्न, पाणी, रोजगार, औषधी, काहीही कमी पडू दिले नाही. आज लाखो शेतकरी आत्महत्या करून घेत आहे. नाईक साहेब असते तर त्यांनी शेतकर्यांना निश्चितपणे दिलासा दिला असता व एवढ्या आत्महत्या होऊ दिल्या नसत्या. वर्तमान काळात शेतकरी व शेतमजुरांचा व सामान्यांचा तर कोणी वालीच दिसत नाही. अन्न, पाणी, रोजगार, औषधी इ. अभावी सामान्यजनांचे बेहाल झाले आहेत. ठेकेदार, व्यापारी, उद्योगपती, अधिकारी व नेते मंडळी युती करून सामान्यजनांचे व विशेष करून मागासाचे शोषण करीत आहे. नाईक साहेब हयात असते तर गरिबांचे हाल पाहून त्यांना झोप आली नसती. त्यांनी पीडित लोकांना व स्थळाला भेटी तर दिल्याच असत्या पण त्यांना जे हवे ते देण्याचा आटोकाट प्रयत्न केला असता. 2013 चा दुष्काळ हा 1972 च्या दुष्काळापेक्षाही भयंकर असल्याचे सांगितले जाते. पण दुष्काळापेक्षा घोटाळे, भ्रष्टाचार, क्रिकेट, मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री कोण बनेल, निवडणुका, यांच्याच चर्चा वर्षभराच्या ऐकू येत आहे. शेतकरी, शेतमजूर, जनावरे, चारा, पाणी, रोजगार, महागाई, मागासवर्गांवरील अन्याय, आदिवासींचे कुपोषण व उपासमार, शिक्षण या बाबातीत कोणीही पोटतिडकीने बोलताना दिसत नाही. वसंतराव नाईकांकडे सामान्यजनांच्या, गावांच्या, शेतकरी कष्टकरी, दूर्लक्षित समाजाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत होती. वर्तमान काळात मात्र खेळ, अभिनेते, अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, उद्योगपती, ठेकेदार व आमदार खासदाराच्या अडीअडचणी बाबतच मोठमोठ्या चर्चा घडविल्या जात आहे. छत्रपती शिवाजी व शाहू महाराजांच्या काळात सुद्धा सामान्य जनता व मागासवर्गांकडे विशेष लक्ष दिले जात होते. मागासवर्गीयांना आरक्षण, वसतिगृह देऊन या समाजाची उन्नती घडवून आणण्याकडे या दोन्ही वंदनीय महापुरुषांनी विशेष लक्ष दिले होते. वसंतराव नाईक साहेबांनी सुद्धा या दोन्ही महापुरुषांच्या पावलावर पावले ठेवून मागासांना सवलती देण्याचा प्रयत्न केला. वर्तमानकालीन मराठा समाज मात्र मागासाचे आरक्षण, बढती, भरती इ. बंद करून किंवा कमी करून मराठ्यांसाठी आरक्षण मागत आहे. वंदनीय छ. शिवाजी व शाहू महाराजांचे राज्य तर मराठ्यांचेच होते. स्वातंत्र्यापूर्वी ब्राह्मणांशी जवळीक मराठ्यांचीच होती. गावाची पाटीलकी, देशमुखकी सुद्धा पाटलाचीच होती. मराठा समाज छ. शिवाजी, रा. शाहू महाराजांचे खरे वारसदार आहेत. म्हणून त्यांनी त्यांचे वारस व अनुयायी बनून राज्य चालवावे. मराठा समाज हा वस्तुत: सर्व बहुजनांचा मोठा भाऊ आहे. म्हणून त्यांनी मोठ्या भावाची जबाबदारी व छ. शिवाजी, रा. शाहूंचा वारसा सांभाळावा. कालवश वसंतराव नाईक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रमाणे तथागत बुद्ध , छ. शिवाजी, रा. शाहू महाराजांचे खरे अनुयायी होते. डॉ. आंबेउकर ज्याप्रमाणे केवळ बौद्धांचे नेते नव्हते तर ते सर्व भारतीयांचे नेते होते. याचप्रमाणे वसंतराव नाईक सुद्धा केवळ बंजारा समाजाचे नेते नव्हते तर ते सर्व भारतीयांचे नेते, देशभक्त होते. वर्तमान काळातील सर्व नेत्यांनी तथागत बुद्ध, छ. शिवाजी, राजर्षि शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक यांचा आदर्श व भूमिका घेऊन समाज व देशसेवा करून देशाला महासत्ताधीश बनवावे. मागासवर्गीयांशी भेदभावाची वागणूक दिल्यास देश महासत्ता तर बनणारच नाही. देश जगातील सर्वात मागास, भिकारी व कर्जबाजारी देश बनेल व देशावर पुन्हा परकियांचे राज्य येईल, यांचे भान ठेवून सर्व शासक वर्गांनी शासन प्रशासन व समाजसेवा करावी असे नम्र आवाहन व अपेक्षा आहे.
जय भारत - जय भीम - जय सेवालाल
प्रा. ग.ह. राठोड