गोर बंजारा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने

गोर बंजारा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने

दि. 5/05/2022 गोर बंजारा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने 1) साहित्य संमेलनाची सुरुवात - गोर बंजारा समाजात विशेषत: महाराष्ट जवळ जवळ 2000 पासून साहित्य संमेलने घेण्याची परंपरा सुरू झालेली आहे. सुरुवातीला महाराष्ट्रातच जिल्हा पातळीवरील संमेलने झाली व 2016 पासून राष्ट्रीय पातळीवर आजपर्यंत तीन साहित्य संमेलने पार पडली असून येत्या 2022 च्या 28-29 तारखेला वाशिमला चौथे साहित्य संमेलन पार पडत आहे. वस्तुत: वाशिमला 28-29 मे ला पार पडणारे साहित्य संमेलन हे साहित्य साखळीतील तिसरे संमेलन आहे. पण नागपुरला झालेल्या दुसर्‍या साहित्य संमेलनाला जोडूनच काही अंतराने मुंबईवासियांनी सुद्धा मुंबईला एक राष्ट्रीय स्तरावरचे संमेलन घेतले होते. म्हणून साखळी संमेलनात वाशिमचे होणारे साहित्य संमेलन हे चौथे नसून तिसरे साहित्य संमेलन आहे. 2) संमेलन घेण्याचे प्रयोजन - भारतात अनेक प्रकारची जातीय, वर्गीय, भाषिक, प्रांतीय, राष्ट्रीय, राजकीय, धर्मीय, पंथीय संमेलने झालेली आहे व आजही होत आहे. परंतु बंजारा समाज हा प्राचीन कालीन बहुसंख्य समाज असुनही त्यांच्या एकूण जीवनशैलीसंबंधी इ.स. 2000 पर्यंत कोणतेच संमेलन झालेले नव्हते. भारतातील गोर बंजारा समाज हा मुळनिवासी असून तो सिंधू सभ्यतेचा निर्माता असल्याचे अनेक इतिहासकारांनी इतिहासात नमूद केले आहे. गोर बंजारा समाज हा विश्‍वव्यापी समाज असून त्यांनी पशुपालन, शेती, शिल्पकारी, कशीदाकारी, कारागिरी, पशुच्या पाठीवर व जहाजांद्ववारे अनेक किंमती वस्तुंचा, धातुंचा, शस्त्रांचा, गेरू, कोळसा, मीठ, मसाला, सुकामेवा, कपड्याचा, पशुविकीचा जागतिक व्यापार, तळे, बांध, विहीरी, बारवे निर्मितीचे काम करून भारतीयांची खूप मोठी सेवा केली आहे. राष्ट्राला योगदान दिले आहे. आर्य भारतात आल्यानंतर व त्यांचे वर्चस्व वाढल्यानंतर भारताचा मुळनिवासी, मालक, राजा असलेला हा समाज भटका बनला. गुलामगिरी त्यांच्या वाट्याला आल्यामुळे लाचारीने पेशवे, मोगल, ब्रिटिश यांच्या जाचामुळे, त्रासामुळे, मुसलीम, शिख, बौद्ध, हिंदू यांच्या आश्रयाला त्यांची जीवनशैली स्वीकारून जीवन जगत आहे. शत्रुंनी त्यांची सभ्यता, संस्कृती, जीवनशैली नष्ट केल्यामुळे ते आज हिंदू, मुसलीम, शिख, बौद्ध समुहात सामील झाले आहेत. वस्तुत: हा समुह जात, वर्ण, धर्म, कर्मकांडमुक्त धाटी जीवनशैलीचा समुह होता. म्हणून वर्तमान काळात बंजारा गोर समाजाचा खर्‍या प्राचीन धाटी जीवनशैलीच्या इतिहासाची मांडणी साहित्यिकांकडून होणे काळाची गरज आहे. आर्य शत्रुंशी झालेल्या संघर्षात या समाजाचा पराभव झाल्यामुळे हा मानवतावादी आदर्श संस्कृतीचा, सिंधू संस्कृतीचा निर्माता समाज इसवीसनापूर्वी 1800-1700 च्या काळात शहर-गांव सोडून शत्रुंपासून आपली इज्जत वाचविण्यास व संरक्षणार्थ देशाच्या चारही दिशेला पसार होऊन नागरी व्यवस्थेपासून दूर डोंगर-दर्‍यात आणि पर्वताच्या कुशीत, माळमाथ्यावर स्थाईक झाला होता. तेथेही त्यांनी आपली धाटी जीवनशैली सुरक्षित ठेवली होती. परंतु परकियांच्या म्हणजे मोगल-मुस्लीम, हिंदू, ब्रिटिशांच्या व वैज्ञानिक प्रगतीच्या काळात मजबुरीने वरील परकियांचे काही संस्कार किंवा जीवनशैलीचा त्यांना स्वीकार करावा लागला व यामुळे त्याचे धाटी जीवन, प्राचीन पराक्रमी आदर्श, मानवतावादी इतिहासाचा त्यांना विसर पडला. शत्रुंनीही त्यांची जीवनशैली, इतिहास, प्रेरणास्थळे, प्रतिके, पुतळे, महापुरुष, भाषा, पोषाख, अलंकार, व्यवसाय, साहित्य मिटविले. यामुळे वर्तमान काळात ठराविक गोर बंजारा समाज हिंदू, मुस्लीम, इसाई, शिख, बौद्ध वगैरे जीवनशैलीचा स्वीकार करून जीवन जगत आहे. त्यांच्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात भेसह झालेली आहे व यामुळे तो भरकटला, असंघटीत झाला असून संघटीत शत्रुसमुहांचा गुलाम बनून जीवन जगत आहे. म्हणून परकिंयाच्या गुलामीतून मुक्तता मिळावी व त्यांचा सिंधू संस्कृतीकालीन त्यांचा वैभवशाली, मानवतावादी, आदर्श, सत्ताधारी, विश्‍व व्यापारी, समतावादी जीवनशैलीचा इतिहास आठवावा. तसेच त्या जीवनशैलीची पुनर्स्थापना करून आदर्श संस्कृती निर्माण करता यावी म्हणून अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलने घेण्यात येत आहे. 3) साहित्य संमेलनामुळे झालेला फायदा - साहित्य संमेलने सुरू होण्यापूर्वी गोर बंजारा समाजात लाखात एक सुद्धा लेखक, कवी, इतिहासकार नसावा. पण स्वातंत्र्यानंतर शिक्षणाची संधी मिळताच 1970 पर्यंत देशात अनेक पदवीधर तयार झाले होते. 2000 पर्यंत मात्र लाखात 5-10 लेखक तयार झाले असावेत. या लेखकांची ओळखही कोणाला नव्हती. मात्र 2000 नंतर शिक्षणाचा प्रसार होताच समाजात हजारोंनी लेखक, कवी, कथाकार, नाटककार, चरित्रकार, इतिहासकार यांची संख्या पूर्ण भारतात लाखोंनी असावी. वस्तुत: ही बाब गोर बंजारा समाजाच्या दृष्टीने खुपच आशादायक आहे. आशादायकच नव्हे तर साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रात हा समुह निश्‍चितच परिवर्तन घडवून आणेल अशी अपेक्षा करणे गैर ठरणार नाही, असे वाटते. 50-60 वर्षात गांव-शहरापासून अतिदूर डोंगर-पर्वताच्या पायथ्याशी, माळमाथ्यावर राहणार्‍या या कष्टकरी समाजाने हे एवढे यश मिळविले आहे ही उल्लेखनीय व स्वाभिमानास्पद बाब आहे. प्रस्थापितांना जी संधी मिळाली ती अशा सर्व भटके व गुन्हेगारांना मिळाली असती तर आज दिसणारे देशाचे चित्र हे वेगळे असते. अशी संमेलने ही सर्व वंचित समाजांमध्ये झाली पाहिजे, म्हणजे देशाचा खरा इतिहास उजेडात येण्यात निश्‍चितच मदत होणार आहे. वंचित समाजात प्रस्थापितांप्रमाणे सभा, संमेलने होण्याची कुवत नसल्यामुळे शासनाने पुढाकार घेऊन अशा संमेलनाला अनुदान दिले तर लोकशाही मजबूत होण्यास व देशात शांतता राहण्यास मदत होणार आहे. परंतु प्रस्थापितांकडून अशी अपेक्षा करणे निरर्थक आहे. अशी संमेलने घेण्यासाठी समाजातील समर्थ, स्वावलंबी समुहांनी पुढाकार घेण्याची मोठी गरज आहे. समाजातील जबाबदार प्रतिनिधींनी ही जबाबदारी स्वीकारली तरच वंचित समाजाची जागृती होईल व समाजात अपेक्षित लेखक, इतिहासकार, कवी, नाटककार, चरित्रकार तयार होईल व वंचित बहुजन समाज हा प्रस्थापितांबरोबर येण्यास मदत होईल. आज बहुजन, वंचित समाजात, विद्वान, विचारवंत, इतिहासकार, लेखक, समिथक, जागृतीकार लोकसंख्येच्या प्रमाणात नसल्यामुळे लोकशाही अधिकारापासून प्रस्थापितांनी त्यांना दूर ठेवले असून त्यांचा वापर गुलामाप्रमाणे व मतदानासाठीच करीत आहे. 4) साहित्यिकापासून अपेक्षा - गोर बंजारा समाज हा सिंधू संस्कृतीकाळाचा असून जात, वर्णव्यवस्था, धर्म, देव, दैव, निरर्थक, शोषक कर्मकांड पूर्वीचा आहे. सिंधु संस्कृतीच्या काळात व आर्य वर्चस्वापूर्वी हा समाज ब्राह्मण, हिंदू, मुस्लीम, इसाई, पारसी जीवनशैली, ंसंस्कृतीमुक्त होता. हा समाज मेहनती, लढाऊ, स्वाभिमानी, स्वावलंबी, पशुपालन, शेती, व्यापार, कारागिरी करणारा, कशीदाकार, कापडनिर्माता, संगीतकार, नृत्यकार, रंगीत कपडे व अलंकार, शिकारप्रिय, निसर्गप्रिय, मातृवंदक गण संघात्मक, समाजवादी लोकतंत्री, पूर्वज, पशुवंदक, निसर्गवंदक होता. वर्तमानकालीन कोणत्याही देवाधर्माशी, कर्मकांडाशी, संस्कृतीशी त्याचा तीळमात्र संबंध नव्हता. उलट जातीधर्मवाद्यांनी गोर बंजारा व बहुजन, वंचित समाजाची संस्कृती मिटवून त्यांच्या धर्माची दीक्षा देऊन त्यांची संख्या वाढवून राजकीय व इतर सर्व फायदे घेण्याचा आजपर्यंत प्रयत्न करीत आहे. तात्पर्य आधुनिक धर्म व जातीवाद्यांशी गोर बंजारा व सर्व वंचितांचा कोणताच संबंध नव्हता व आजही नाही. म्हणून नवोदित सर्व गोर बंजारा व बहुजन, वंचित साहित्यिकांनी या जाती, धर्म, देव, दैव, कर्मकांड, यज्ञ, अवतार, मंत्र-तंत्र, मूर्तीपूजा, प्राणप्रतिष्ठा, मंदिर, मजीद, गिरजाघर, चर्च, धर्मग्रंथ, धर्मगुरू, धर्मक्षेत, मनुस्मृती, गीता भागवत, रामायण, महाभारत, उत्तरकालीन वेद, पुराण, धर्मसुत्रे, ब्राह्मण ग्रंथ उपनिषद, वेदांत वगैरेंचे वाचन, समिक्षण करून या संपूर्ण साहित्याचे कपट कारस्थान, षडयंत्र, फसवणूक, धोकेबाजी, स्वार्थीपणा, विकृती, अमानवियता इ. सर्व उघडकीस आणून कारस्थान्यांना उघडे पाडावे. विचार, चिंतन, मंथन, संशोधन करून षडयंत्रपूर्वीचा गोर बंजारांचा, बहुजन, वंचितांचा संपूर्ण इतिहास जगासमोर आणावा. वंचित, शोषितांना संघटित करून प्रस्थापितांशी दोन हात कसे करता येईल, सत्ता व साधने हातात कसे करता येईल, प्रस्थापितांच्या वैचारिक, मानसिक, बौद्धिक, शारीरिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक गुलामीतून सर्व वंचितांना मुक्त करून त्यांना त्यांचे पूर्व वैभव कसे प्राप्त करून देता येईल, असेच साहित्य निर्माण करण्याची, छ. शिवाजी, शाहू, फुले व आंबेडकर यांच्याच मार्गाने मार्गक्रमण करण्याची भीमप्रतिज्ञा करणे अनिवार्य आहे. यासाठी त्याग व बलिदानाची, सामाजिक बांधिलकी व निष्ठा बाळगल्याशिवाय शक्य नाही याची पक्की गाठ बांधावी. टिप - महाराष्ट्र राज्या व्यतिरिक्त पुढच्या वर्षी अन्य राज्यांनी साहित्य संमेलन घ्यावे, अशी साहित्य संघाची सर्व राज्यांना साहित्य संघाची विनंती आहे. जय भारत - जय भीम, जय गोर, जय वंचित, जय संविधान प्राचार्य ग. ह. राठोड, अध्यक्ष, अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संघ, भारत.

G H Rathod

162 Blog posts

Comments