धार्मिक कर्मकांडाने भगवान, देव, ईश्वर, परमेश्वर, अल्ला, येशु, गॉड, वगैरे प्रसन्न होतात का?
दि. 17-3-2022
धार्मिक कर्मकांडाने भगवान, देव, ईश्वर, परमेश्वर, अल्ला, येशु, गॉड, वगैरे प्रसन्न होतात का?
कोणत्याही समाजात अनेक प्रकारची कर्मकांडे म्हणजे कामे असतात. या सर्व कर्मकांडांची आपणांस खालील प्रमाणे विभागणी करता येते. उदा. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, तांत्रिक, क्रीडा, गीत, नृत्य, अलंकार, पोशाख, उद्योग, व्यापार, शेती, शिल्पकारी (बलुतेदारी), पशुपालन, संरक्षण विषयक, बांधकाम, खोदकाम, संशोधन, जलसंचय व संधारण, धर्मशाळा, मंगलकार्यालय, सभागृह, ग्रंथालय, विश्रांतीगृह, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, वस्तीगृह, शिक्षण प्रशिक्षण संस्था, व्यायामशाळा, स्मशान भूमी, वगैरे वगैरे अनेक कामे, कर्मकांडे समाजात केली जातात. वरीलपैकी धार्मिक कामे ही अध्यात्म, ईश्वर, धर्म या क्षेत्रात येतात व इतर सर्व कामे ही भौतिक, लौकीक, ऐहिक या क्षेत्रात येतात. धार्मिक कर्मकांडांना अलौकीक, पारलौकीक ईश्वर विषयक असेही समजले जाते. धार्मिक कर्मकांडांचा, धर्माचा व जातियतेचा फायदा केवळ परोपजीवी भटजी, सेठजी, लाटजी व ढोंगी साधू- संत, बुवा-बाबा, साध्वी यांना होतो तर भौतिक, ऐहिक, लौकीक कर्मकांडांचा फायदा मात्र सर्व जाती-जमातींच्या जनसमुहाला होतो. या क्षेत्रात भटजी, सेठजी व लाटजीचे वर्चस्व वाढले तर धार्मिक-भौतिक क्षेत्रांचे सर्व लाभ तेच घेतात व इतरांचे शोषण करुन गुलाम बनवितात.
जगात सर्वत्र चेतन व अचेतन असे दोनच घटक आहेत. चेतन घटकांचे म्हणजे जिवंत जीवाचे परिस्थिती व संस्कारानुसार गुण, स्वभाव व वैशिष्ट्यांमध्ये बदल होतो, बदल केला जातो. पण अचेतन घटकांमध्ये, वस्तुंमध्ये त्यांच्या गुण, स्वभाव व वैशिष्ट्यांमध्ये बदल होत नाही, बदल करता येत नाही. मूळ अचेतन घटकांमध्ये त्यांचे गुण आणि वैशिष्ट्य कायम असते. कृत्रिमरीत्या रासायनिक प्रक्रियांद्वारे अचेतन वस्तुंमध्ये बदल होतो. पण त्या बरोबर त्यांचे मूळ गुण अथवा वैशिष्ट्य राहत नाही. चेतनमध्ये मात्र शिक्षण, प्रशिक्षण, सराव, संस्कार, दबाव, स्वार्थ, त्याग, प्रेम, सहकार्य, वगैरेमुळे परिवर्तन होतो. चेतन जीवामध्ये ज्ञान, समज, विरोध, सहयोग, प्रेम, सहजीवन असे विविध गुण असतात. परस्परांचे गुण-स्वभाव पुरक ठरल्यास जीव एकत्र राहतात व सहकार्य करतात. नसता विरोधही करतात. पण अचेतन घटक अथवा वस्तुंमध्ये ज्ञान, समज, विरोध, सहकार्य, प्रेम, संवेदना असे गुणवैशिष्ट्य नसतात. त्यांचा वापर चेतनजीव मन मानेल तसा करतो. तो कोणालाही विरोध करीत नाही. ते जड, संवेदनहीन असतात. धार्मिक क्षेत्रातील सर्व प्रतिमा, मूर्त्या, चित्रे हे मानव निर्मित आणि संवेदनाहीन असतात. मानव पंचेंद्रियांप्रमाणे ते चेतन, संवेदनशील नसल्यामुळे ते खाऊ-पिऊ शकत नाही, मल विसर्जन, वस्त्र, अलंकार वापरु शकत नाही. काही घेणे-देणे, बोलणे, स्वसंरक्षण, व्यवस्था करु शकत नाही. ते पूर्णत: परावलंबी असतात. त्यांच्याकडे श्रवण शक्ती, दृष्टी, वास घेण्याची, चव घेण्याची, स्पर्शानंद घेण्याची शक्ती नसते.
या वरील जड वा अचेतन गुणांमुळे मनुष्याने या प्रतिमा, मूर्त्या, पुतळे, छायाचित्रे वगैरे समोर उभे राहून प्रार्थना, पूजा, आरती, अभिषेक करणे, त्याच्याकडून कशाची तरी मागणी करणे, भजन, गुणगाण करणे, वाद्य, घंटा वाजविणे, अंघोळ घालणे, तेल, तूप, दूध, दही अर्पित करणे, ही सर्व कृती नादानपणाची, पोरखेळासारखी आहे, यात शंका नाही. कारण देव सर्वांचा निर्माता मानल्यास तो सर्वशक्तीमान आहे. त्याला कशाचीही गरज नसतांना त्यांच्या कृत्रिम प्रतिमा बनवून त्यांना खूष करण्याचा प्रकार वेडेपणाच मानावा लागेल. मंदिर, तीर्थक्षेत्रातील देव-देवीरुपी प्रतिमांनी आजपर्यंत कोणतेही परिवर्तन केले नसून तेथील पुजारी व विश्वस्तांनी सतत जनतेचे शोषण केले आहे. वस्तुत: ज्याच्या प्रतिमा, मूर्त्या, पुतळे उभे केले जातात किंवा मंदिरात बसविले जातात, त्यांचे विचार व कार्य पूर्ण करण्याचे कार्य हीच त्या देव-देवीची किंवा महापुरुषांची भक्ती असते. बाकी सर्व कर्मकांड हे थोतांड, धंदा, व्यापार व दिशाभूलीचा, लुटीचा प्रकार आहे, यात कोणीही शंका करु नये. फळझाड वाळल्यावर त्या फळझाडाला खत, पाणी, कुंपण घालणे निरर्थक असते. वाळलेल्या झाडाची कोय (बी) लावून त्या झाडाचे संवर्धन करणे व भविष्यात या झाडाच्या पाणी, फूल, फळ, त्याच्या सावलीचा सदुपयोग, भोग घेणे, करणे यात खरी बुद्धिमत्ता, विवेक व योग्य कार्य असते. मुक्याला बोलता ये नाही, आंधळ्याला दिसत नाही, बहिर्याला ऐकू येत नाही, म्हणून मृत जीवाच्या प्रतिमांला प्रतिमाशिवाय आणखी काही करणे म्हणजे नैवद्य चढविणे, त्याच्याभोवती फेर्या घालणे, वाद्य वाजविणे, पूजा, प्रार्थना, आरती, अभिषेक करणे हे सर्व अविचारीपणाचे लक्षण आहे, मृत जीवाच्या कार्यांचा, विचारांचा प्रचार, प्रसार करणे व नतमस्तक होऊन त्यांच्या कार्यांचा आणि विचारांचा सन्मान असतो. कार्याची वृद्धी व विचारांचा प्रसार व प्रचार करणे हेच त्यांच्या अनुयायी, वंशज, वारसदारांचे परमकर्तव्य असते. मंदिर, तीर्थक्षेत्र, प्रतिमा उभी केल्याने किंवा भजन, पूजन, किर्तन, प्रवचन व उपरोक्त कृति केल्याने कोणालाही कोणताही फायदा होत नसतो. कारण सर्व कृति पोरखेळ समान व अज्ञान , अविचार व पूर्वसंस्कारामुळे केल्या जातात, हा सर्व खेळ मानव कल्याण, प्रगती, संवर्धन याच्याविरुद्ध असतो.
वस्तुत: जो जीव म्हणजे महान विभूती, तो नर असो व नारी असो, ज्यांनी संपूर्ण मानव समुह कल्याणार्थ खूप मोठे कष्ट घेतलेले असते, त्याग समर्पण, सेवा, दिशादर्शन, मार्गदर्शन, कार्य व विचार दिलेले असते तोच देव, देवी, मार्गदर्शक, आदरणीय, वंदनीय मानला जातो. अशा महान विभूतीचे कार्य व विचार यांचा आदर करुन, याच्या कार्य व विचारांची आठवण कायमस्वरुपी रहावी, तेवत ठेवली जावी म्हणूनच प्रतिमा निर्माण करुन त्यांना वंदन करण्याची परंपरा अखंड चालू आहे. वंशज, अनुयायी, वारसदार यांनी प्रति वर्षी या महान त्यागी महामानवांचे कार्य व विचार आचरणात आणण्याची प्रतिज्ञा दरवर्षी करावी हाच वंदनेचा खरा हेतू असतो. मानव समुहाला महान विभूतींच्या विचार आणि कार्यांचाच फायदा होत असतो. म्हणून वंशज, अनुयायी व वारसदारांनी इतर सर्व निरर्थक, कर्मकांडांना बगल देणे हे संपूर्ण मानव समुहाच्या हिताचे ठरेल, असे मला वाटते.
जय भारत - जय संविधान
प्रा. ग. ह. राठोड