धनवानांनो, धनाचा सदुपयोग करा

धनवानांनो, धनाचा सदुपयोग करा

धनवानांनो, धनाचा सदुपयोग करा धन ही वस्तु अथवा साधन माणसासाठीच असते. माणसं धनासाठी नसतात. धनाच्या माध्यामानी जी साधने निर्माण केली जातात, ही सर्व साधने मानवाच्या सोयी व सुखासाठीच निर्माण केली जातात. गैरसोय, गैर उपयोग व दु:ख, संकट निर्माण होण्यासाठी धनाचा सभ्य, सज्जन, परोपकारी त्यागी माणुस कधीच करीत नाही, जर धनाचा उपयोग गरजवंतासाठी व योग्य कामासाठी उपयोगात येत नसेल तर ते धन निरर्थक व कवडी किंमतीचे समजले जाते. दुर्बल, अपंग वगळून सबलासाठी, कर्तबगारासाठी जर धन साधनाचा उपयोग केला जात असेल तर हे खर्च अविचारीपणाचे, निरर्थक, व स्वार्थासाठी, मोठेपणासाठी खर्च केला जातो व अशाने समाजाचे हित होण्याऐवजी अहितच जास्त होते. अशा कामात, धन, वेळ, बळ सर्व वाया जाऊन देशाची प्रगती थांबते. जनता अनेक प्रकारच्या अडचणीत सापडते. म्हणून अशी निरोपयोगी कामे उपलब्ध धनाच्या माध्यमानी करणे हा देश व समाज द्रोह आहे, यात कोणीही शंका घेऊ नये. कारण जनतेला अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, संरक्षण, सुख, समाधान, शांतीची गरज असेल व त्याऐवजी, धनाच्या माध्यमानी भांडणाची, अंधश्रध्देची, अनुत्पादक, परोपजीवींना पोसण्याची, भेदभाव निर्माण करणारी साधने निर्माण केली गेली तर जनतेच्या पदरी सुख, समाधान, शांतता ऐवजी दु:ख व संकटच उभी राहणार व त्याचे भोग भोगावेच लागेल. याच धनाप्रमाणे धर्म हे साधन देखील माणसांसाठी असून माणुस धर्माचा साधन नाही. पण आज आपण पाहतो की, धर्म हे साधन माणसांसाठी नसून माणसे धर्मासाठी भांडत आहे, लढत आहे, मरत आहे व मारीत आहे. धर्माच्या नावाने निर्माण मंदिर, तीर्थक्षेत्र, धर्मतीर्थ, हे स्वार्थी, आयतखाऊ, भ्रष्टाचारी, व्याभिचारी समुहाचे केंद्र बनत असून या ठिकाणी निरक्षर, अज्ञानी, अंधश्रध्द, कष्टकरी समाजाचे शोषण व फसवणूक होत आहे. निर्धन समाज तर फक्त पोटाच्या चिंतेत राहतो. त्यांना योग्य काय व अयोग्य काय आहे हे काही समजतच नाही. कारण ते शिक्षणापासून, संस्कारापासून वंचित असतात. संततीच्या प्रगती-अप्रगतीला जसे त्यांचे आई-वडील व पालक जबाबदार असतात, तसेच निरक्षर समाजाच्या सुख-दु:खाला समाजातील शिक्षित व धन अथवा साधन संपन्न समुहच असतो. कारण या समुहाला पोटाची चिंता नसते. त्यांना दुसर्‍याच्या उपाशी पोटाची व शिक्षण व संस्काराची दखल घेऊन आपली जबाबदारीने कर्तव्य पूर्ण करणे ही सामाजिक बांधिलकी पार पाडणे अनिवार्य असते. पण शिक्षित व धनवान समुह जर किर्ती, स्वार्थासाठी, आपल्या बुध्दिचा व धनाचा उपयोग कष्ट न करणार्‍या भट-ब्राह्मण, पुरोहित, भगत-भोपे, बुवा-महाराज, जटाधारी, माळाधारी, टिळाधारी, टाळकुटे अशा परोपजीवींसाठी, मंदिर, देवळे, मठ, विहार, चर्च, गुरुद्वारा, मस्जीद, धर्मस्थळ निर्माण करुन त्यांना आयते बसून खाण्याची, भ्रष्टाचाराची, व्याभिचाराची, फसविण्याची व चमत्कार दाखवून लुटण्याची, दानदक्षिणाची व्यवस्था करुन देत असेल तर त्या देशातील जनतेसाठी यापेक्षा वाईट दुसरे काहीही नाही. जगात आई-वडील, शेतकरी, कामगार, सिमेवरील जवान, पोलीस, डॉक्टर, संशोधक, अभियंते, यांच्याशिवाय कोणताही देश व समाज जीवंत राहुच शकत नाही. देव-देव करणारे, मंदिर, तीर्थक्षेत्र, धर्मक्षेत्र, व कर्मकांडाच्या नावाने बोंबलणारे, धर्माच्या नावाने बोंबलणारे या सर्वांचा तारणहार वरील वर्गच आहे. देव, मंदिर, तीर्थक्षेत्र, धर्मक्षेत्रातून कोणाला काहीही मिळत नाही. येथील विश्‍वस्त, भट, पुरोहित, ब्राह्मण त्यांचे समर्थक बुवा, बाबा, महाराज, भोंदु, व्याभिचारी, परोपजीवी, साधु-संत हेच येथील धन व साधनाचे उपभोग घेणारे व विलासी जीवन जगणारे भामटे असतात. आज शेतकरी, कामगार, सीमेवर लढणार्‍या जवानांचे काय हाल होत आहे. संपूर्ण जगाचे शेतकरी, कामगार, जवान हेच खरे आई-वडील आहेत. पण देवा-धर्माला माननारा वर्ग आज निर्जीव दगडाचे मंदिर, मूर्त्या, क्षेत्र, धर्मक्षेत्राचे गल्ली-बोळात निर्माण कार्य करीत असून भारतीय मुर्खपणाचे प्रदर्शन करीत आहे, व श्रेष्ठत्वाचे गाजेवाजे करीत आहे. वस्तुत: हा अविचारीपणा, मूर्खपणा, स्वार्थीपणा, अमाणुसपणाचा कळस आहे. आपला अन्न, वस्त्र, संरक्षणदाता, कोणत्या परिस्थितीत जगत आहे, त्यांच्या कष्टाचे शोषण, शेतमालाचे भाव पाडून व महागाई वाढवून त्यांचे रक्त पिणे चालू आहे त्यालाच धार्मिकपणा, धर्मपणा, देवपणा अथवा देवत्व म्हणतात का? जो खरा शिक्षित व खरा धनपती असतो, धर्म व धार्मिकपणा जाणतो, तो सर्व वंचित वर्गांसाठी प्रथम शिक्षण, आरोग्य, रोजगार, अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण या बाबींवर विचार करील व धन खर्च करेल. शेतकर्‍यांच्या गुरांना चारा, वीज, पाणी, बी, खते, शेत औजारे, गोठे, गोदामे, बाजारपेठा, हमीभाव, बिनव्याजी कर्ज, वयस्कर शेतकर्‍यांना निवृत्ती वेतन, आरोग्य व्यवस्था, पिक विमा, ओला कोरड्या दुष्काळात मदत, अपघाती मदत, पीक व पशु संरक्षणाची हमी या सर्व क्षेत्रात शिक्षित व धनवानाची मदत अपेक्षित आहे. गांवात वाचनालय, व्यायामशाळा, मंगल कार्यालये, सभागृह, आरोग्यकेंद्र, पिण्याचे व शेतीला पाणी, रस्ते, शेत कुंपन, मजुरांच्या व शेतकर्‍यांच्या संततीचे शिक्षण, लग्न, आरोग्य, पोेलीसचौकी, स्मशानभूमी, वगैरे अनेक बाबींकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे. मंदिर व तीर्थक्षेत्र या लुटीच्या व आयतखाऊंच्या स्थळांचे उदारीकरण ऐवजी वरील बाबींकडे शिक्षित व धनवानांनी आपली बुध्दी व धनसंपत्ती खर्च केली तर देश महान बनायला वेळ लागणार नाही. आवश्यक तेथे शाळा, वस्तीगृह, वाचनालय, व्यायामशाळा, सभागृह, मंगलकार्यालय, क्रिडा मैदान, ग्रंथालय, शीतगृहे निर्माण करण्याची गरज आहे. परोपजीवींसाठी भ्रष्टाचार, व्याभिचार करण्यासाठी मंदिर क्षेत्राची निर्मिती, समाज व देशद्रोह आहे. अशा समाज व देशद्रोही कामाला विरोध करणार्‍याला आज ठार मारण्याच्या व सुतुन काढण्याच्या धमक्या धनपती, धनपतीचे चेले, चमचे, आयतखाऊ, बुवा, बाबा, महाराज देेत आहे. विरोधकाचा विरोध करण्यामध्ये कोणताही फायदा नाही. समाज दिशाहीन व अंधश्रध्द, शोषित बनू नये, समाज सुखी व वैज्ञानिक दृष्टीचा व्हावा. ब्राह्मणांच्या धार्मिक गुलामीतून तो बाहेर पडावा व त्यांच्या कष्टाची चीज व्हावी, असा सदहेतु आहे. स्वार्थ तर किंचितही नाही. शिक्षित व परिवर्तनवादाची एक वास्तव सामाजिक बांधिलकी याच भावनेने त्यांचा धर्मांधतेला, अंधश्रध्देच्या कार्याला विरोध आहे. कोणत्याही व्यक्तीला कोणाचाही विरोध नाही. शिक्षित व श्रीमंतांनी धर्मांध मार्ग सोडून लोककल्याणाची सर्जनाची कामे केली अथवा करीत असेल तर त्यांना विरोधकांचा कधीही विरोध राहणार नाही. उलट पाठिंबा राहिल. बहुजन समाज हा प्राचीन काळापासून धर्मनिरपेक्ष होता, व तो तसाच कायम राहावा व संविधानालाच आपला धर्म व धर्मग्रंथ मानावा व त्यांच्या संरक्षणात सतत अग्रेसर राहावे. तसेच आपल्या खर्‍या व प्राचीन शत्रु व साहित्य सर्वांपासून दूर राहून सर्व बहुजनाचे कल्याण साधावे एवढीच अपेक्षा आहे. धर्मांध, जात्यांध, देवांध लोकांनी प्राचीन काळापासून अनेक पुरोगामी, परिवर्तनवादी महापुरुषांची हत्या व खुन केलेले आहे. या यादीमध्ये संत तुकाराम, कबीर, रविदास, शिवाजी, संभाजी, डॉ. आंबेडकर अशा अनेक महापुरुषांचा समावेश आहे. अलीकडच्या काळात नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी, गोपीनाथ मुंडे, लंकेश गौरी, रोहित वेमुला व नक्षलवादी ठरवून अनेकांना जेलमध्ये टाकलेले आहे. हे सर्वांना माहीत आहे. आम्हालाही माहित आहे. पण सामाजिक परिवर्तन घडविण्याच्या कामात्र आम्हाला त्रास झाला तरी आम्हाला त्याची भीती नाही. म्हणुनच आम्ही हे कार्य सामाजिक बांधिलकी मानून व परमकर्तव्य मानून करीत आहोत. आम्ही कोणाकडून तुकडा मिळावा व खोटी प्रतिष्ठा मिळावी म्हणून संघर्षरत नाही. तर महापुरुषांचे स्वप्न पूर्ण करता यावे म्हणून आमचा वाईट कामाला विरोध आहे. व्यक्तिला कधीही विरोध करणार नसून आम्ही फक्त प्रतिगामी म्हणजेच मनुवादी विचाराला मरेपर्यंत विरोध करीतच राहणार हे त्रिकाल बाधित सत्य समजावे. जयभारत जयसंविधान प्रा.ग.ह. राठोड

G H Rathod

162 Blog posts

Comments